Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

राज्य

‘तंबी दुराई’सारखा लेखक दशकात एखादाच होतो!
भारतकुमार राऊत यांचे गौरवोद्गार
पुणे, ३१ मे / प्रतिनिधी
‘‘अनेक वर्षांत असंख्य कादंबरीकार निर्माण झाले असतील, पण गेल्या दहा वर्षांत ‘तंबी दुराई’सारखा एकच लेखक महाराष्ट्रात जन्माला आला’’, अशा शब्दांत गौरव करीत, अनेकांना ‘दोन फूल एक हाफ’ या स्तंभात आपली दखल घ्यावी असे जेव्हा वाटले त्याच वेळी हे लेखन यशस्वी ठरले, असेही मत खासदार भारतकुमार राऊत यांनी आज येथे व्यक्त केले.

पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या नद्या कोरडय़ा, तीव्र पाणीटंचाई
संगमेश्वर, ३१ मे/वार्ताहर

मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात सुरू होणारा पाऊस अद्यापही सुरू न झाल्याने कोकणातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे स्थगित केली असून, पाऊस लांबल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. राजापूरची गंगा आली की पाऊस लांबणीवर पडतो, ही अटकळ तंतोतंत खरी ठरली असून, कोकणात मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या पेरण्या आता तीन दिवसांनंतर थांबविण्यात आल्या असून, लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

नगरच्या विवेकने झळकाविली ‘एनडीए’त मराठी पताका!
पुणे, ३१ मे/खास प्रतिनिधी

खडतर मेहनत व बुद्धिमत्तेला ध्येयसिद्धीच्या निर्धाराची जोड देत अहमदनगर जिल्हय़ातील कर्जत तालुक्यामधील कौभळी गावच्या विवेक काळुखे याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) आज मराठी पताका फडकाविली! दीक्षान्त संचलनादरम्यान कांस्यपदकाचा मानकरी ठरत संस्थेतील सवरेत्कृष्ट कॅडेटमध्ये त्याने स्थान मिळविले. ‘माझ्या आई-वडिलांसमवेत झळकलेला फोटो पाहण्याची इच्छा आहे. त्यासाठीच मी आजपर्यंतचे सर्व परिश्रम घेतले आहेत,’ अशा भावपूर्ण शब्दांत त्याने हे यश कुटुंबाला अर्पण केले.

धुळे, नंदुरबारमधील पवनचक्क्या आजपासून बंद करण्याचा इशारा
लोकसंग्रामचे सुझलॉनविरूध्द रणशिंग
धुळे, ३१ मे / वार्ताहर
सुझलॉन कंपनीविरूध्द लोकसंग्राम पक्षाने रणशिंग फुंकले असून विविध मागण्यांसाठी एक जूनपासून धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील सर्व पवनचक्क्या ‘आयसोलेटर’ दाबून बंद करण्याचा इशारा पक्षाचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी शनिमांडळ येथे आयोजित शेतकऱ्यांच्या महामेळाव्यात दिला. सात जूनपूर्वी कोणताही तोडगा न निघाल्यास सुझलॉनच्या एकाही अधिकाऱ्याला या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये फिरू दिले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.

मुंबईतील नेत्रतज्ज्ञ कार्येकर यांचे निधन
पुणे, ३१ मे/खास प्रतिनिधी

मुंबईतील प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शरद दत्तात्रय कार्येकर (वय ७७) यांचे आज मूत्रपिंडाच्या विकाराने मुंबईत निधन झाले. त्यांच्या मागे अभिनेत्री पत्नी डॉ. ज्योत्स्ना, अभिनेता मुलगा यतिन, डॉ. चेतन व प्रफुल्ल अशी तीन मुले व परिवार आहे. मंगळवारी दादर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.पनवेलच्या रसायनी व चिपळूण येथील रुग्णालयांमधून चिकित्सेचे काम केल्यानंतर डॉ. कार्येकर मुंबईत कार्यरत झाले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या एन्ट्राऑक्युलर लेन्सेस या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय संशोधन व चिकित्सा केली. नेत्रतज्ज्ञांच्या राष्ट्रीय व राज्य मंडळांवरही डॉ. कार्येकर यांनी काम केले होते.

नाटळ गाव विकासासाठी १ कोटीचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
सावंतवाडी, ३१ मे/वार्ताहर

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सपत्निक जाऊन कणकवली तालुक्यातील नाटळ गावातील श्री देव रामेश्वरचा नवस फेडला. याप्रसंगी नाटळ गावच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली. कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या श्री देव रामेश्वरला मंत्री असताना एकदा अशोक चव्हाण आले असताना त्यांनी ‘मुख्यमंत्री बनलो तर सपत्निक तुझ्या दर्शनाला येईन’, असा नवस केला होता. तो फेड करण्यासाठी ते खास आले होते.शनिवारी रत्नागिरीत खासदार डॉ. नीलेश राणे यांचा सत्कार समारंभ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाटळ गावात आले. या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.नाटळ येथील श्री देव रामेश्वरचा नवस फेडल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या गावच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे घोषित केले. सरपंचांनी विकासकामांचा आराखडा बनवून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा. त्यासाठी निधी तात्काळ दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी हजेरी लावली होती. नारायण राणे यांचे समर्थक रत्नागिरीला गेल्याने ते उपस्थित नव्हते. प्रशासन तत्परतेने उपस्थित होते.

मुरुड-जंजिरा एसटी आगार राज्यात सर्वोत्तम
मुरुड-जंजिरा, ३१ मे/वार्ताहर

१२ वर्षांंपूर्वी युती शासन काळात सुरू झालेल्या मुरुड-जंजिरा एसटी आगाराने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. युती शासन काळात मनोहर जोशी यांच्या हस्ते या आगाराचे उद्घाटन झाले होते. कै. अरुंधती चोरघे यांनी त्यावेळी एसटी महामंडळ संचालिका म्हणून विशेष लक्ष या आगाराकडे दिले होते.आता २६४ कर्मचारी असणारे आगार राज्यातील सर्वंकष चाचणीत सर्वोत्तम ठरले आहे. आगार व्यवस्थापक पी.जी. ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली २०५ चालक-वाहक ४२ गाडय़ांच्या सहाय्याने आगाराचा कारभार चालवितात. त्यांना यांत्रिक विभागाचे ३४ व प्रशासकीय विभागाचे २५ कर्मचारी उत्तम साथ देतात. एकंदर हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे यश आहे, असे म्हणून कुणीही व्यक्तिश: याचे श्रेय घेत नाही.आगाराचे उत्पन्न, नियंत्रण, कर्मचारी उपस्थिती अशा विविध निकषांमधून प्रवासी व विविध अभियाने यशस्वी करणे, अशा सगळ्या कामांमधून हे यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात रायगड विभागाचा सहावा क्रमांक, तर राज्यामध्ये रायगडमधून मुरुड-जंजिरा राज्यात प्रथम, कर्जत द्वितीय, रोहा चतुर्थ, तर श्रीवर्धन आगाराचा १३ वा क्रमांक लागला आहे.

तरुणीवर बलात्कारप्रकरणी प्राथमिक शिक्षक गजाआड
राजूर, ३१ मे/वार्ताहर

अकोले तालुक्यातील शेंडी येथील एका तरुणीवर लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी बालात्कार केल्याप्रकरणी मच्छिंद्र बुधा खाडे या प्राथमिक शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. खाडे याने संबंधित मुलीबरोबर लग्नाचे आमीष दाखवून शरीरसंबंध ठेवले. तरुणी सहा महिन्यांची गर्भवती आहे. तसेच खाडे याने गुपचूप दुसरे लग्न केले. त्यामुळे अत्याचारग्रस्त तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी खाडेला गजाआड केले.

मेहुणीची हत्या, मेहुण्याची आत्महत्या
भुसावळ, ३१ मे / वार्ताहर

पत्नीच्या बहिणीची हत्या झाल्याच्या रात्रीच मेहुण्यानेही आत्महत्या केल्याची घटना शहरातील डॉ. आंबेडकरनगरमध्ये उघड झाली आहे. वत्सलाबाई तायडे (४५) यांची हत्या झाल्याचे ३० मे रोजी सकाळी स्पष्ट झाले. त्या रात्री गच्चीत झोपलेल्या असतानाच त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी वार करण्यात आल्याचे दिसून आले. तायडे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणारे त्यांचे मेहुणे डोंगर तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. वत्सलाबाई घटस्फोटित होत्या तर डोंगर तायडे हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात खून व आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्य़ात सचखंड एक्स्प्रेसने आठ गायींना चिरडले
जळगाव, ३१ मे / वार्ताहर

जळगाव ते शिरसोली रेल्वे स्थानकादरम्यान सचखंड एक्स्प्रेसखाली आठ गायी चिरडल्या गेल्या. आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हा अपघात झाला.शिरसोली स्थानकाजवळ गाई रूळ ओलांडत असतानाच जळगावहून पाचोऱ्याकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस धडाडत आली. रूळावर थबकलेल्या गायींना पाहून चालकाला ब्रेक लावण्याची इच्छा झाली, परंतु त्यात अधिक धोका असल्याने चालकाने गाडी न थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आठ गायी गाडीखाली चिरडल्या गेल्या. अपघातानंतर गाडी काही वेळ थांबली व मार्गस्थ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत रूळांवरील अडथळे बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळित झाली.

रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयात तोडफोड; चार प्रवाशांना अटक
मनमाड, ३१ मे / वार्ताहर

मनमाड ते औरंगाबाद लोहमार्गावर रोटेगाव ते परसुलदरम्यान मेगाब्लॉकमुळे गाडय़ांना खोळंबा होत असल्याने संतप्त प्रवाशांनी नगरसूल रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरच्या कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी चार प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मनमाड-औरंगाबाद हा एकेरी लोकमार्ग आहे. शुक्रवारी रात्री अकरानंतरही मेगा ब्लॉकचे काम सुरू राहिल्याने अनेक गाडय़ा विविध रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी अडकून पडल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. ज्या स्थानकात गाडय़ा थांबल्या तेथे रात्री अंधार होता. कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी नगरसूल स्थानकात स्टेशन मास्तरांच्या कार्यालयावर आपला राग काढला. या घटनेची फिर्याद स्टेशनमास्तर सुलतान रमजानी हुसेन यांनी दिली आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री नगरसूल रेल्वे स्थानकात थांबून राहिली. मेगाब्लॉकमुळे या गाडीला पुढे जाण्यास सिग्नल मिळत नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्या कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचांची व टेबलाची तोडफोड केली. या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी विजय सोनवणे, (रा. इंदिरानगर, नाशिक), रणबीर देवेंद्रसिंग (नांदेड), रफिक शबीर शेख, शेख अरिफ शब्बीर (शिवडी, मुंबई) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.