Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

क्रीडा

गतविजेत्या नदाल, इव्हानोविचचा निकाल
पॅरिस, ३१ मे / वृत्तसंस्था
ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत एकाच दिवशी गतविजेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागण्याची घटना सतत घडत नसते. सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मात्र चौथ्याच फेरीत गतविजेता राफेल नदाल आणि अ‍ॅना इव्हानोविच या दोन्ही खेळाडूंना पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला. राफेल नदालने तर गेली चार वर्षे सलग फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले होते, त्यामुळे यावेळी पाचवे विजेतेपद मिळवून नवा विक्रम करण्याचा त्याचा मानस होता, पण स्वीडनच्या रॉबिन सॉडरलिन्गने त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. आपल्या वेगवान सव्‍‌र्हिस, ताकदीने मारलेले फोरहँड या जोरावर त्याने नदालला ६-२, ६-७, ६-४, ७-६ असे पराभूत केले. पहिला सेट गमाविल्यानंतर नदालने टायब्रेकपर्यंत रंगलेल्या दुसऱ्या सेटमध्ये विजय मिळवून सामन्यातील रंगत कायम ठेवली.

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करणार ऑस्ट्रेलियाचे पथक
स्पर्धेला जाणवते पुरस्कर्त्यांची उणीव
नवी दिल्ली, ३१ मे / पीटीआय
हैदराबाद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता ऑस्ट्रेलियाचे एक सुरक्षा पथक भारतात येणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तसेच जागतिक बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त उपाध्यक्ष व्ही. के. वर्मा यांनी ही माहिती दिली. वर्मा म्हणाले की, ऑस्ट्रेलियातून एक सुरक्षा पथक भारतात १ ते ५ जून या कालावधीत येणार आहे. हे पथक पोलिस आयुक्तांशी तसेच हैदराबादमधील सुरक्षाव्यवस्थेचे पूर्ण अधिकार असलेल्या मंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करील.

भारत, विंडीज, आफ्रिका यांचे आव्हान मोठे - युनूस
कराची, ३१ मे/ पीटीआय

येत्या शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टे्वन्टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका हे देश मोठे आव्हान उभे करतील, असे मत पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार युनूस खान याने व्यक्त केले आहे. आफ्रिका व इंग्लड यांच्यविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. त्याचाही परिणाम खेळावर होण्याची भीती युनूसने व्यक्त केली आहे. भारत व दक्षिण आफ्रिका विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण मोक्याच्या क्षणी सामना फिरवण्याची क्षमता वेस्ट इंडिजमध्येही आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही.

वेंगसरकर अ‍ॅकॅडमीचा फेटाळलेला प्रस्ताव मान्य करण्याचे आयुक्तांचे संकेत
स्थायी समितीची आज बैठक
पिंपरी, ३१ मे/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील कुरघोडीच्या राजकारणातून दिलीप वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीला इनडोअर क्रिकेटसाठी भाडेदराने जागा देण्याच्या मागणीचा प्रस्ताव िपपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीने फेटाळण्यात आल्याचे तीव्र पडसाद उमटले. त्याचाच परिणाम म्हणून पालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी मध्यस्थी करीत हा प्रस्ताव पुन्हा मान्य करण्याची भूमिका घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सोनियाचा दिन
कविता राऊत पुन्हा एकदा अव्वल तर मोनिका आथरेचा राष्ट्रीय विक्रमासह ‘डबल धमाका’
अविनाश पाटील
नाशिक, ३१ मे

‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू कविता राऊतच्या कामगिरीमुळे नाशिक नगरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीच पोहोचले असताना तिच्यापासून प्रेरणा घेत कठोर परिश्रम करणारी छोटय़ा चणीची मोनिका आथरेहीे आता राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटू लागली आहे. एकिकडे मदुराई येथे राष्ट्रीय युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मोनिका नव्या राष्ट्रीय विक्रमासह ‘डबल धमाका’ उडवित असताना बंगळुरू येथे रविवारी कविताने ‘सनफिस्ट वर्ल्ड टेन के’ स्पर्धेत अव्वल स्थान पटकावित आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मोनिका व कविताच्या या यशामुळे नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात आनंदाला भरते न आले तरच नवल.

हरिश तावडे, लता पांचाळ आणि अनिल पाटील यांनी गाजविला दुसरा दिवस
राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी

पनवेल, ३१ मे/क्री.प्र.

हरिश तावडे, संदीप पाटील यांच्या तुफानी चढायांना संदीप घुरगेच्या भक्कम बचावाची मिळालेली साथ यांच्या बळावर महाराष्ट्र पोलिस संघाने आज आर्मी दिल्ली संघाचा ४०-१८ असा पराभव केला आणि राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेत मोठीच खळबळ उडवून दिली. हरिश तावडेने अफलातून चढाया केल्या. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने येथील सी.के.टी. मैदानावर या अखिल भारतीय निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी २१० कोटी
लंडन, ३१ मे/पीटीआय

ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुरक्षाव्यवस्थेवर सुमारे २१० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. जगावर दहशतवादाचे सावट असल्याने त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली आहे. येत्या शुक्रवारपासून क्रि केटची जननी मानल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये हा कुंभमेळा सुरू होत आहे. लॉर्ड्स, ओव्हेल व ट्रेन्ट ब्रिज या मैदानांवर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षित कुत्र्यांना या मैदानांभोवती तैनात करण्यात आले आहे. सामना बघायला येणाऱ्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याला या सुरक्षा चाचण्यांमधूनच मैदानात प्रवेश मिळणार आहे. सुमारे एक हजार स्वयंसेवकांकडे स्पर्धेदरम्यान व्यवस्था देण्यात येणार आहे. मात्र या सर्वच स्वयंसेवकांना अनेक चाचण्यांमधून जावे लागले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, तसेच पाकिस्तानमध्ये श्रीलंकन क्रिकेट खेळाडूंवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले होते. याचा परिणाम क्रिकेटवरही झाला. विश्वचषक स्पर्धेलाही दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कसूर केली जाणार नसल्याचे स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एलवर्दी यांनी सांगितले.

विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेन - गुल
कराची, ३१ मे, वृत्तसंस्था
आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखविण्यास आपण सज्ज आहोत, असे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल याने म्हटले आहे. माझी गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली तर आमचा संघ ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत नक्कीच विजेतेपद मिळवेल, असा विश्वासही गुल याने बोलून दाखविला आहे.ट्वेंटी-२० सामन्यांत उमर गुल हा पाकिस्तानचा सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने १४ सामन्यांत २४ बळी मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुबई येथे नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यांत गुल याने आठ धावांत चार बळी घेतले होते. त्याच्या या कामगिरीमुळेच पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविता आला. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या ट्वेंटी- २० विश्वचषक स्पर्धेत गुल याने सात सामन्यांत १३ गडी बाद केले होते. या वर्षी मला पहिल्या स्पर्धेपेक्षा सरस कामगिरी करावयाची आहे, असे त्याने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

उत्तेजक औषध चाचणी न करताच पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी रवाना
कराची, ३१ मे, वृत्तसंस्था

येत्या शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या ट्वेन्टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ उत्तेजक औषध विरोधी चाचणी न करताच रवाना झाला. दरम्यान अशा प्रकारची कोणतीही चाचणी या वेळी घेण्यात आली नसल्याच्या वृत्ताला पीसीबीच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. मात्र आम्ही सातत्याने खेळाडूंना उत्तेजक औषध विरोधी नियमांची माहिती देत होतो. तसेच उत्तेजक औषधांच्या वापरावर आयसीसीने कडक र्निबध घातल्याचीही जाणीव आमच्या खेळाडूंना असल्याचे पीसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच क्रि केट मंडळाने खेळाडूंची चाचणी केली होती. त्या चाचणीत कोणीही दोषी आढळले नाही, याकडे सूत्रांनी लक्ष्य वेधले. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत कुठलीही समस्या उद्भवणार नाही, असा विश्वासही पीसीबीकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान डोपींग प्रकरणात अडकलेल्या शोएब अख्तर व मोहम्मद आसिफ यांचा टी- २० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास गगनाला- शेखर
चेन्नई, ३१ मे/पीटीआय

नुकत्याच संपलेल्या आयपीएल क्रि केट स्पर्धेचा अनुभव भारतीय क्रिकेटपटूंसाठी येत्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत मोलाचा ठरेल, असे मत माजी खेळाडू टी.ए. शेखर यांनी व्यक्त केले आहे.
आयपीएल स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम होती. तेथील अनुभव भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास वाढवणारा असेल, असे शेखर यांनी सांगितले.सुरेश रैनाने आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी केली, याकडे लक्ष वेधत शेखर म्हणाले, हरभजन व प्रग्यान ओझा यांनी गोलंदाजीत प्रभाव टाकत सर्वाचे लक्ष वेधले. केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक युवा भारतीय खेळाडूसाठी ही स्पर्धा भरपूर काही शिकवणारी होती. विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय संघाबद्दल समाधान व्यक्त करीत ते म्हणाले, संघातील प्रत्येक खेळाडूने चांगल्या कामगिरीच्या जोरावरच संघात स्थान पटकावले आहे. त्यांच्या चांगल्या प्रदर्शनामुळेच अशा चांगल्या खेळाडूंना समितीला निवडता आले.

ओपन व्होलान्ट डीओर स्पर्धेत कश्यप अंतिम फेरीत
नवी दिल्ली, ३१ मे / पीटीआय

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पी. कश्यप याने स्पेनच्या पाब्लो अ‍ॅबियनला पराभूत करीत फ्रान्स (टोलोऊज) येथे सुरू असलेल्या ओपन व्होलान्ट डीओर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिसऱ्या मानांकित कश्यपने पाब्लोवर १६-२१, २१-१९, २१-९ अशी मात केली. कश्यपची अंतिम फेरीत इंग्लंडच्या राजीव औसेफ याच्याशी गाठ पडणार आहे. औसेफने पाचव्या मानांकित पीटर मिकेलसन या डेन्मार्कच्या खेळाडूला २१-१७, २१-१६ असे नमविले. महिला गटात भारताच्या सायली गोखलेने पहिला गेम जिंकून घेतलेली आघाडी नंतर मात्र गमावली व उपान्त्य फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. द्वितीय मानांकित जिल पिटार्डकडून ती २१-१९, १५-२१, १६-२१ अशी पराभूत झाली. उपान्त्यपूर्व फेरीत सायलीने इंडोनेशियाच्या अ‍ॅटू रोझालिनाला नमविले होते. भारताच्या आदित्य प्रकाश व नेहा पंडित यांना उपान्त्यपूर्व फेरीत पराभव सहन करावा लागला. तरुण कोना व अरुण विष्णू या दुहेरीतील भारतीय जोडीलाही उपान्त्यपूर्व फेरीत हार मानावी लागली.

बंगलोरच्या मॅरेथॉनवर इथियोपिया व केनियन खेळाडूंचे वर्चस्व
बंगलोर, ३१ मे / पीटीआय

येथे झालेल्या १ लाख ५५ हजार अमेरिकन डॉलर इतक्या बक्षिसाच्या रकमेच्या सनफिस्ट विश्व १० हजार किलोमीटर बंगलोर मॅरेथॉनमध्ये इथियोपियाच्या देरिबा मर्गाने पुरुषांमध्ये विजेतेपद पटकाविले. देरिबाने २८ मिनिटे व १३ सेकंद अशी वेळ देत ही शर्यत जिंकली. केनियाच्या मार्क किपटूने २८ मिनिटे व १५ सेकंद अशी केवळ दोन सेकंद मागे राहात दुसरा क्रमांक पटकाविला तर केनियाच्याच बर्नार्ड किप्येगोने २८ मिनिटे व २४ सेकंदांसह तिसरे स्थान मिळविले. या शर्यतीत जवळपास २३ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात सर्व वयोगटातील लोकांनी उत्स्फूर्तपणे नावनोंदणी केली होती.मर्गाने याआधी, बोस्टन व हॉस्टन येथील मॅरेथॉनही जिंकली होती. दिल्लीतील अर्थमॅरेथॉनचाही तो विजेता होता. मर्गाचा कट्टर प्रतिस्पर्धी विल्सन किपसँग हा केनियाचा खेळाडू मात्र चौथ्या स्थानावर फेकला गेला. महिलांच्या गटात इथियोपियाच्या मर्जिया अ‍ॅलेसफेकने ३२ मिनिटे व ८ सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या मेरी किटानीने ३२ मिनिटे व ९ सेकंदांसह दुसरे स्थान मिळविले. केनियात जन्मलेल्या हिल्डा किबेट या नेदरलॅण्ड्सच्या खेळाडूने ३१ मिनिटे व १ सेकंद अशा वेळेसह तिसरे स्थान मिळविले.

पॉन्टींगला दुखापत
नॉटींगहॅम, ३१ मे/ पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी येथे नेट्समध्ये सराव करताना रिकी पॉन्टींगच्या उजव्या हाताच्या मनगटाला चेंडू लागल्याने दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर स्वरूपाची नसून तो पूर्णपणे फिट आहे आणि या दुखापतीचा त्याच्या खेळावर कोणताही परीणाम होणार नाही, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.