Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

गतविजेत्या नदाल, इव्हानोविचचा निकाल
पॅरिस, ३१ मे / वृत्तसंस्था

 

ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत एकाच दिवशी गतविजेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागण्याची घटना सतत घडत नसते. सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मात्र चौथ्याच फेरीत गतविजेता राफेल नदाल आणि अ‍ॅना इव्हानोविच या दोन्ही खेळाडूंना पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला. राफेल नदालने तर गेली चार वर्षे सलग फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले होते, त्यामुळे यावेळी पाचवे विजेतेपद मिळवून नवा विक्रम करण्याचा त्याचा मानस होता, पण स्वीडनच्या रॉबिन सॉडरलिन्गने त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. आपल्या वेगवान सव्‍‌र्हिस, ताकदीने मारलेले फोरहँड या जोरावर त्याने नदालला ६-२, ६-७, ६-४, ७-६ असे पराभूत केले. पहिला सेट गमाविल्यानंतर नदालने टायब्रेकपर्यंत रंगलेल्या दुसऱ्या सेटमध्ये विजय मिळवून सामन्यातील रंगत कायम ठेवली. पण आज नदालचा खेळ सूर हरविल्यासारखा होता. सॉडरलिन्गच्या वेगवान आक्रमणाचा सामना करताना तो कमी पडत असल्याचे जाणवत होते. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या सामन्यात अखेर सॉडरलिन्गने नदालची या स्पर्धेत २००५पासून सलग सामने जिंकण्याची मालिकाही खंडित केली. त्याशिवाय, गेल्याच महिन्यात रोम येथे नदालकडून स्वीकाराव्या लागलेल्या १-६, ०-६ अशा पराभवाची परतफेडही सॉडरलिन्गने केली. सॉडरलिन्गची पुढील फेरीत रशियाच्या निकोलाय डेव्हिडेन्को किंवा फर्नाडो व्हर्डास्को या स्पेनच्या खेळाडूंपैकी एकाशी होईल.
महिलांमध्ये गतविजेती अ‍ॅना इव्हानोविचला बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काने मात दिली. अझारेन्काने हा सामना ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये जिंकला. या सामन्यात मात्र अझारेन्काचे पूर्ण वर्चस्व राहिले. गुडघेदुखीमुळे बेजार असलेल्या इव्हानोविचला आपल्या गतविजेतेपदाचा प्रभाव पाडता आला नाही. अझारेन्काने स्वत:हून केवळ सातच चुका केल्या, त्या तुलनेत इव्हानोविचने २० चुकांची खैरात केली. तीच तिला महागात पडली.
फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकाविण्यात दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररला यश आलेले नाही. लाल मातीमध्ये खेळताना तो बऱ्याचदा अडखळतो हे गेले चार-पाच वर्षांपासून पहायला मिळत असून त्याचाच प्रत्यय आज पहायला मिळाला. तिसरी फेरी पार करून त्याने चौथ्या फेरीत स्थान मिळविले असले तरी त्याला यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. तर चौथ्या मानांकित नोवाक जोकोविकला मात्र पराभवाची चव चाखावी लागली असून त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आला आहे. फ्रान्सच्या पॉल- हॅन्री मॅथ्यूने आज फेडररला चांगलेच झुंजविले, पण त्याला विजय मात्र साकारता आला नाही. फेडररने त्याला ४-६, ६-१, ६-४, ६-४ असे नमविले. दुसऱ्या फेरीत फेडररला अर्जेटीनाच्या जोस अ‍ॅकासूसोने चांगले झुंजविले होते आणि जवळपास तसेच दृष्य तिसऱ्या फेरीतही पाहायला मिळाले.
नोवाक जोकोविला मात्र तिसऱ्या फेरीत पराभव टाळता आला नाही. त्याला जर्मनीच्या फिलीप कोल्क्राइबरने ६-४, ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवून साऱ्यांनाच धक्का दिला. यजमान देशाच्या मोनफिल्सने सुद्धा ऑस्ट्रीयाच्या जरगन मेल्झरचा ६-२, ४-६, ६-३, ६-१ असा पराभव करून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. १२ व्या मानांकित फर्नाडो गोन्झालेझने विक्टोर हेनेस्क्यूचा ६-२, ६-४, ६-२ असा पराभव केला असून त्याने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.
महिलांच्या एकेरीमध्ये व्हीनस विल्यम्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी दहा वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेनाने मात्र स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. त्याचबरोबर अव्वल मानांकित रशियाच्या दिनारा साफिनाने स्पर्धेतील विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. तर रशियाच्या चौथ्या मानांकित एलेना दिमेंतिएव्हाचा मात्र पराभव झालेला आहे.

सांचेझचा रडीचा डाव; सेरेना वैतागली
सेरेना विल्यम्सने तिसऱ्या फेरीतील सामन्यादरम्यान स्पेनच्या मारिया जोस सांचेझवर रडीचा डाव खेळल्याचा आरोप केला आहे. हा सामना सेरेनाने ४-६, ६-३, ६-४ असा जिंकला असला तरी तिने हा आरोप केला.
पहिल्या सेटमध्ये सांचेझने सेरेनाची सव्‍‌र्हिस मोडीत काढून ३-२ अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर सेरेनाचा एक परतीचा फटका सांचेझच्या दंडाला लागला. नियमानुसार चेंडू जर शरीराच्या कोणत्याही भागाला लागला तर त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण देण्यात येतो. यासंदर्भात सेरेना म्हणाली की, मी मारलेला एक परतीचा फटका सांचेझच्या दंडाला लागला. मी रॅकेट उंचावून ते सांगितले, पण सांचेझने या गोष्टीचा इन्कार केला. तिच्या अंगाला चेंडू लागल्याने तो गुण मला मिळायला हवा होता आणि हे तिलाही माहित होते, पण तसे झाले नाही. याबाबतीत सांचेझ म्हणाली की, मी फसवणूक केली हे म्हणणे मूर्खपणाचे असून यासंदर्भात मी काहीही भाष्य करू इच्छित नाही.