Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करणार ऑस्ट्रेलियाचे पथक
स्पर्धेला जाणवते पुरस्कर्त्यांची उणीव
नवी दिल्ली, ३१ मे / पीटीआय

 

हैदराबाद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता ऑस्ट्रेलियाचे एक सुरक्षा पथक भारतात येणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तसेच जागतिक बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त उपाध्यक्ष व्ही. के. वर्मा यांनी ही माहिती दिली. वर्मा म्हणाले की, ऑस्ट्रेलियातून एक सुरक्षा पथक भारतात १ ते ५ जून या कालावधीत येणार आहे. हे पथक पोलिस आयुक्तांशी तसेच हैदराबादमधील सुरक्षाव्यवस्थेचे पूर्ण अधिकार असलेल्या मंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करील.
विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा १० ते १६ ऑगस्ट या कालावधीत हैदराबादच्या गच्चिबोली स्टेडियमवर होत आहे. अशाप्रकारची स्पर्धा प्रथमच भारतात आयोजित केली जात आहे. वर्मा यांनी पुढे सांगितले की, या स्पर्धेसाठी कशापद्धतीची सुरक्षाव्यवस्था हवी त्याचा एक आराखडा हे पथक देईल. त्यासाठी हे पथक स्पर्धा आयोजन समिती व सुरक्षातज्ज्ञांशी समन्वय साधेल.
या स्पर्धेबद्दल बोलताना वर्मा म्हणाले की, स्पर्धेसाठी आवश्यक असलेला आर्थिक स्रोत ही मोठी समस्या आहे. कारण आयोजनासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. त्यातील तीन कोटी रुपये जागतिक बॅडमिंटन संघटनेला हमी म्हणून द्यावी लागणार आहे. वर्मा म्हणाले की, आम्ही आतापर्यंत केवळ अर्धी रक्कम उभी करू शकलो आहोत. त्यातील काही भारत सरकारने आम्हाला दिली आहे. उरलेली रक्कम उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही मार्केटिंग करीत आहोत. या स्पर्धेचा अहवाल तयार करून आम्ही विविध प्रायोजकांकडे पाठविला आहे. पण सद्यस्थितीत बाजारात नकारात्मक वातावरण आहे. प्रतिसाद अल्प आहे, तरीही उरलेली रक्कम उभी करण्यात यश येईल, अशी आशा वाटते. या स्पर्धेला केवळ दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना भारतीय बॅडमिंटन संघटनेने भारतातील आघाडीच्या खेळाडूंसाठी जुलै महिन्यात इंडोनेशिया येथे विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी आम्ही इंडोनेशियाच्या बॅडमिंटन संघटनेला प्रस्तावही पाठविला आहे. त्या अंतर्गत सायना नेहवाल, चेतन आनंद अशा सीनियर खेळाडूंना पाठविण्याचा आमचा विचार आहे. भारतीय संघातील रूपेश आणि थॉमस व ज्वाला-दिजू या जोडीलाही तेथे सरावासाठी आम्ही पाठवू.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उपान्त्यपूर्व तसेच उपान्त्य फेरीत प्रवेश करावा, अशी आमची इच्छा आहे. सायनाने जर उपान्त्य फेरीत प्रवेश केला तर चेतन आनंदने उपान्त्यपूर्व फेरी गाठली तसेच दुहेरीतील एका जोडीने उपान्त्यपूर्व किंवा उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली तरी आम्ही समाधानी असू.