Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सोनियाचा दिन
कविता राऊत पुन्हा एकदा अव्वल तर मोनिका आथरेचा राष्ट्रीय विक्रमासह ‘डबल धमाका’
अविनाश पाटील
नाशिक, ३१ मे

 

‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू कविता राऊतच्या कामगिरीमुळे नाशिक नगरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीच पोहोचले असताना तिच्यापासून प्रेरणा घेत कठोर परिश्रम करणारी छोटय़ा चणीची मोनिका आथरेहीे आता राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटू लागली आहे. एकिकडे मदुराई येथे राष्ट्रीय युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मोनिका नव्या राष्ट्रीय विक्रमासह ‘डबल धमाका’ उडवित असताना बंगळुरू येथे रविवारी कविताने ‘सनफिस्ट वर्ल्ड टेन के’ स्पर्धेत अव्वल स्थान पटकावित आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मोनिका व कविताच्या या यशामुळे नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात आनंदाला भरते न आले तरच नवल.
भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात ‘साई’ चे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक असलेले विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनामुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेली कविता नाशिकच्या युवा धावपटूंची ‘आयकॉन’ बनली आहे. कवितासारखी आदिवासी पाडय़ातील मुलगी परिश्रम व जिद्दीच्या जोरावर ‘हाफ मॅरेथॉन क्वीन’ म्हणून प्रसिध्द होऊ शकते, तर आपण का नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानामध्ये सरावादरम्यान सकाळ व सायंकाळ अक्षरश: घाम गाळणाऱ्या मोनिकाने मदुराईच्या स्पर्धेत अनोखी कामगिरी केली. १८ वर्षांआतील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन किलोमिटर अंतर १०:०९:०२ यावेळेत कापत मोनिकाने नवीन विक्रमाची नोंद केली. याआधीचा विक्रम आंध्र प्रदेशच्या उमा महेश्वरीच्या नावावर १०:०९:०५ असा होता. हा विक्रम करताना मोनिकाने पुण्यात झालेल्या कनिष्ठ राष्ट्रकुल स्पर्धेमधील पदक विजेत्यांनाही मागे टाकले. शुक्रवारी झालेल्या या विक्रमानंतर रविवारी मोनिकाने १५०० मीटरमध्येही प्रथम स्थान पटकावित दुहेरी मुकुट मिळविला.
दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी हे यंदा बारावीत प्रवेश करणाऱ्या मोनिकाचे गाव. अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकिर्द घडविण्याची मनिषा असलेल्या मोनिकाकडे कवितानंतरची नाशिकची आशा म्हणून बघितले जात आहे. कविताप्रमाणेच छोटय़ा गावातून पुढे आल्याने परिस्थितीने निर्माण करून ठेवलेले अडथळे कसे ओलांडावेत, हे कोणी शिकविण्याची तिला गरज भासली नाही. वसतीगृहात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या मोनिकाला मैदानावर एक धावपटू म्हणून घडवितांना विजेंद्र सिंग यांनी घेतलेली मेहनतही दुर्लक्षित करून चालणार नाही. सिंग यांच्या मेहनतीला धावपटूंकडून मिळणारी योग्य साथ, यामुळेच नाशिकने मिनी सुवर्णापासून कविता राऊतपर्यंत अनेक उत्तमोत्तम धावपटू दिले आहेत.
मोनिकाच्या मदुराईमधील यशाची चर्चा सुरू असतानाच रविवारी कविताच्या कामगिरीमुळे नाशिककरांच्या आनंदात अधिकच भर पडली. बंगळुरूत झालेल्या सनफिस्ट वर्ल्ड टेन के स्पर्धेत कविता भारतीयांमध्ये पहिली आल्याची बातमी कळताच हरसुलमध्ये नवदुर्गा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उज्ज्वल भविष्य असणाऱ्या नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्राला सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढे येण्याचे काम आता नाशिकच्या लोकप्रतिनिधींसह सर्वानाच करावे लागणार आहे.