Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

हरिश तावडे, लता पांचाळ आणि अनिल पाटील यांनी गाजविला दुसरा दिवस
राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी
पनवेल, ३१ मे/क्री.प्र.

 

हरिश तावडे, संदीप पाटील यांच्या तुफानी चढायांना संदीप घुरगेच्या भक्कम बचावाची मिळालेली साथ यांच्या बळावर महाराष्ट्र पोलिस संघाने आज आर्मी दिल्ली संघाचा ४०-१८ असा पराभव केला आणि राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेत मोठीच खळबळ उडवून दिली. हरिश तावडेने अफलातून चढाया केल्या.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने येथील सी.के.टी. मैदानावर या अखिल भारतीय निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या स्पर्धेचा दुसरा दिवस हरिश तावडे व विश्वशांतीच्या लता पांचाळने गाजविला.
महाराष्ट्र पोलिस संघाला विश्रांतीपर्यंत बरोबरीत (१०-१०) रोखणाऱ्या दिल्ली आर्मी संघाला चकित करताना पाच फूट नऊ इंच उंचीच्या हरिष तावडेने विविधढंगी चढाया केल्या. त्याने मध्यंतरानंतर एकाच चढाईत चार बळी घेतले. पाठोपाठ दुसऱ्या हल्ल्यात दोन गुण मिळविले. शिलकी खेळाडूला बाद करून त्याने आर्मी संघावर लोण चढविला. हरिशला आज अनिल पाटीलने सुरेख साथ दिली. त्याने नऊ गुण मिळविले. कोपरारक्षक संदीप घुरगेने उजव्या बाजूने अप्रतिम डाईव्ह मारून उत्कृष्ट पकडी केल्या. महाराष्ट्र पोलिसांच्या या यशाचे खरे शिल्पकार ठरले ते हरिश, अनिल, संदीप हे तीन शिलेदार. पोलिस संघाचे क्षेत्ररक्षणही अव्वल दर्जाचे ठरले.
महिला विभागात अशाच तऱ्हेचा दणका विश्वशांती संघाने पालम स्पोर्टस् क्लब, दिल्ली संघाला दिला. या लढतीत पालम क्लबने मध्यंतराला १७-१२ अशी सहा गुणांची आघाडी घेतली होती. ती लता पांचाळने तोडताना एका झटक्यात ४, दुसऱ्या हल्ल्यात तीन असे सात गुण घेत पालम संघावर लोण चढविला. लताने एकूण चौदा गुणांची कमाई केली. जयश्री सुवर्णानेही पल्लेदार चढाया केल्या. प्रणाली गावडेने सुंदर पकडी केल्या.
मुंबईच्या अंकुर स्पोर्टस् क्लबला लागोपाठ दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशी हैद्राबादच्या ज्योती क्लबने पराभवाचा पहिला झटका दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंजाब महिला संघाने अंकूरचा २४-१३ असे पराभव केला. ‘अ’ गटातील पहिले दोन्ही सामने गमाविणारा अंकुर संघ साखळीतच गडगडणार हे दुसऱ्या दिवशीच जवळजवळ स्पष्ट झाले.
पुण्याच्या राजमाता जीजाऊ संघाने साताऱ्याच्या उदय क्रीडा मंडळाला ४९-२० असे हरवितांना स्नेहल शिंदे, सोनाली अंजुले यांनी यशस्वी चढाया केल्या.
गौरव शेट्टी, प्रशांत चव्हाण व दीपक झझोट या तिन्ही अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिस संघाविरुद्ध लढतांना चौफेर चढाया केल्या. त्यांच्या यशस्वी खेळाच्या बळावर एअर इंडियाने मुंबई पोलिसांवर ३९-१५ असा सहज विजय नोंदविला.