Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

व्यक्तिवेध

उद्योजक हा व्यावसायिक आणि व्यावहारिक धबडग्यात गुंतलेला असतो तर संशोधक हा देवदत्त प्रतिभेच्या जोरावर ज्ञानाच्या क्षेत्रात स्वतलाही विसरून रममाण झाला असतो. संशोधकाचा शोध हा भौतिक जगासाठी उपयोगी ठरतो खरा, पण प्रत्यक्ष संशोधनाच्या प्रक्रियेत संशोधक जणू बाह्य जगालाही विसरलेला असतो. त्यामुळेच एकच व्यक्ती उद्योजकही असणे आणि संशोधकही असणे, ही गोष्ट अतिशय दुर्मिळ. अशक्यप्रायच म्हणा ना! पण हा आगळावेगळा योग साधला आहे तो डॉ. अशोक जोशी यांनी. ‘सिरॅमॅटेक’ कंपनीचे अध्यक्ष

 

असलेले डॉ. अशोक जोशी हे जसे उद्योजक आणि संशोधक आहेत तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे समाजधुरीणही आहेत, हेदेखील विशेष. वेणीमाधवशास्त्री जोशी यांचे पुत्र असलेल्या अशोक जोशींकडे संस्काराचा वारसा ओघाने व स्वाभाविकपणे आला होता. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात १९६६ साली मेटलर्जी इंजिनिअरिंगमधील पदवी मिळाल्यानंतर उच्च शिक्षणाकरिता ते अमेरिकेला गेले. त्याच विषयात तेथे त्यांनी मास्टर्स डिग्री मिळविली आणि १९७२ साली डॉक्टरेट मिळविली. त्यानंतर साधारणत: १९८० पर्यंत त्यांनी अमेरिकेतील विविध कंपन्यांमध्ये संशोधक म्हणून काम केले. या कंपन्यांत ‘रे-ओ-व्हॅक’सारख्या मातब्बर कंपनीचाही समावेश होता. १९८० च्या सुमारास त्यांनी सॉलीड स्टेट लिथियम बॅटरीची एक संपूर्ण अनोखी पद्धती विकसित केली. पुढे भारतात परतून त्यांनी लघुउद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. ‘एनर्जी सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी त्यांनी स्थापन केली. देशाची संरक्षणविषयक गरजा भागविणारी अनेक अभिनव उत्पादने त्यांनी तयार केली. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही त्यांनी अनेक उत्पादनांची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याचा केंद्र सरकारनेही गौरव केला. १९८४ च्या सुमारास अमेरिकेतील ‘सिरॅमॅटेक’ कंपनीने त्यांना सॉलिडस्टेट इलेक्ट्रोकेमिकल्स सिस्टिम्सचा उत्पादन प्रकल्प स्थापित व विकसित करण्याकरिता आमंत्रित केले. या कंपनीसाठी डॉ. जोशी यांनी विपुल संशोधन केले. तब्बल ७५ पेटंट्स त्यांनी कंपनीला मिळवून दिली! सध्या त्यांची ४० पेटंट्स नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. यावरून त्यांच्यातील संशोधकाची व्याप्ती सहज लक्षात यावी! त्यांच्याच संशोधनातून निर्माण झालेली ‘ऑक्सिजन अ‍ॅनॅलायझर्स’ आणि ‘सेन्सर्स’ ही उपकरणे जगभर मोठय़ा प्रमाणात वापरात आहेत. या कंपनीच्या अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत त्यांनी वाटचाल केली. त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ‘सिरॅमॅटेक’ कंपनी करीत असलेल्या दिमाखदार प्रगतीकडे पालक कंपनीचे लक्ष होते. या पालक कंपनीनेच त्यांच्यासमोर ‘सिरॅमॅटेक’ची संपूर्ण मालकी स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला. डॉ. जोशी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि १९९९ मध्ये जगातील एका मातब्बर कंपनीवर मराठमोळ्या डॉ. अशोक जोशी यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. कंपनीचा नावलौकिक भरपूर होता तरी आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. वित्तीय शिस्त, औद्योगिक दृष्टीकोन आणि कार्यसंस्कृती रुजवून डॉ. जोशी यांनी २००० ते २००८ या कालावधीत कंपनीचा नफा १० लाख अमेरिकन डॉलरवरून तब्बल ४० लाख अमेरिकन डॉलरवर नेला! उद्योग आणि संशोधन या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या आणि अमेरिकेसारख्या संपन्न व व्यक्तिकेंद्रित वातावरणात राहात असलेल्या डॉ. जोशी यांना मायदेशाच्या विकासाचेही तितकेच भान आहे. वाई आणि केंजळ या आपल्या गावांना शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी भरभरून मदत केली आहे. या भागात त्यांनी दोन शाळा व मतिमंद मुलांसाठी एक शाळा काढली आहे. या शाळा व काही संस्थांना मिळून त्यांनी एक कोटी रुपयांच्या घरात साह्य केले आहे. सामाजिक भान व जाण असणाऱ्या या संशोधक उद्योजकाचा ‘इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या जागतिक संस्थेने प्रतिष्ठेचा ‘आयआरआय अचिव्हमेन्ट अ‍ॅवार्ड’ देऊन गौरव केला आहे.