Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

बियाणे व खतांचा तुटवडा
विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट
अकोला, ३१ मे/ प्रतिनिधी
मान्सून जवळ येत असल्यामुळे बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही बियाणे आणि खतांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कृषी खात्याचे नियंत्रण नसल्यामुळे विक्रेत्यांची मनमानी सुरू असून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. मान्सून वेळेवर असल्याच्या सुखद चिन्हांमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राशी कापूस बियाण्यांसाठी शोधाशोध करूनही हे बियाणे शेतकऱ्यांना बाजारात मिळेनासे झाले आहे.

डॉ. विकास आमटेंच्या पुढाकाराने आदिवासी पाडय़ांमध्ये शेतीची मान्सूनपूर्व मांडणी
चंद्रपूर, ३१ मे/ प्रतिनिधी

तापमान ४७ अंशापर्यंत पोहोचलेले, आत्महत्यांमुळे साऱ्या जगात नाव पोहोचलेल्या यवतमाळ जिल्हय़ातील आदिवासी पाडय़ांमधील तीनशे शेतकरी या हंगामात शेती कशी करावी यावर चर्चा करीत बसलेले.. हे दृश्य होते आनंदवनच्या मुळगव्हाणच्या ग्रामीण विकास प्रकल्पातील एका बैठकीचे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलेली दुसरी सभा यंदा गच्च भरली होती.

गड राखण्याचे आव्हान पण, प्रश्न कायमच
क्रांतिकुमार ओढे

अकोला विधानसभा मतदारसंघावर गेली पंधरा वष्रे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे वर्चस्व आहे. काँग्रेस, भारिप-बमंस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षाना धूळ चारत त्यांनी त्यांचा झेंडा या मतदारसंघावर गेल्या सलग तीन विधानसभा निवडणुकीत रोवला आहे. त्यांची साधी राहणी मतदारांना नेहमी आकर्षित करीत आली आहे. पद आणि सत्ता ताब्यात येताच अन्य नेते गाडय़ांचे ताफे बाळगताना दिसतात परंतु शर्मा गेली पंधरा वर्ष त्याच जुन्या स्कूटरवर शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेताना दिसतात.

भाजपच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलणार
नगराध्यक्षाची निवडणूक
चंद्रपूर, ३१ मे / प्रतिनिधी

जूनमध्ये होणाऱ्या येथील नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवार रिंगणात उतरविण्याचे जाहीर केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
येथील पालिकेचे अध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर यांचा अडीच वषार्ंचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपत आहे. त्यामुळे नवीन नगराध्यक्षासाठी पालिकेच्या वर्तुळात सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

४८ तासात गॅस सिलेंडर घरपोच देण्याची मागणी
बुलढाणा जिल्ह्य़ातील गॅस वितरकांची बैठक
बुलढाणा, ३१ मे / प्रतिनिधी
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जिल्ह्य़ातील गॅस वितरकांची बैठक पार पडली. यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे जिल्हा संघटक नीलेश भुतडा प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत गॅस वितरणाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ग्राहकांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून विविध सूचना दिल्या.

सहकारमध्ये संस्कारच्या शिबिरार्थीची नृत्य स्पर्धा
बुलढाणा, ३१ मे / प्रतिनिधी

सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये सुरू असलेल्या ‘संस्कार २००९’ मधील शिबिरार्थीची वैयक्तिक नृत्य स्पर्धा नुकतीच पार पडली.
संस्कार २००९ हे उन्हाळी यक्तिमत्त्व विकास शिबीर सहकार विद्या मंदिरामध्ये सुरू असून बुलढाणा व परिसरातील शिबिरार्थीनी यामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. चिमुरडय़ा शिबिरार्थीसाठी सहकारमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये स्पोकन इंग्लिश, स्विमिंग, हस्ताक्षर सुधार वर्ग, कॉम्प्युटर, चित्रकला, हस्तकला, अॅरोबिक्स, योगा इ. गोष्टींचे प्रशिक्षण शिबिरार्थीना दिल्या जात आहे. याच दरम्यान शिबिरार्थीमध्ये चुरस निर्माण होण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्यापैकी नुकतीच वैयक्तिक नृत्य स्पर्धा पार पडली. जवळजवळ चाळीस स्पर्धक सहभागी झाले होते.

डोमाजी कापगते यांना समाजप्रबोधन पुरस्कार प्रदान
साकोली, ३१ मे / वार्ताहर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी निमित्ताने जळगाव येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय सेवा केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागवण्यात आले. २५० पैकी ४४ जणांची विविध पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात भंडारा जिल्ह्य़ातील दोघांची निवड करण्यात आली. उमरी येथील साहित्यिक व प्रवचनकार संतकवी डोमाजी दुधराम कापगते यांना संत साहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ. यु.म. पठाण यांच्या हस्ते समाजप्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. भंडारा येथील प्रा. विनोद मेश्राम यांना साहित्य पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कारामुळे माझ्या समाज प्रबोधनाच्या कार्यास आणखी बळ मिळेल, असे मत डोमाजी महाराज यांनी व्यक्त केले.

वर्धा नदीपात्रातही इकार्निया वनस्पती
बल्लारपूर, ३१ मे / वार्ताहर

बल्लारशा शहराला लागून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातही इकार्निया या वनस्पतीचा फैलाव वाढला असून त्यामुळे या नदीच्या जैवविविधतेवर संकट निर्माण झाले आहे. नदीपात्रातील पाण्यात या वनस्पतीची लहान लहान बेटे निर्माण झाली आहेत. त्याचप्रमाणे बल्लारपूर पेपर मिलच्या रसायनयुक्त पाण्यामुळेही ही नदी दूषित झाली आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्याचे दुष्परिणाम येथील समाजजीवनावर होताना दिसून येते. या पाण्याच्या वापराने त्वचारोग, खाज आदी रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून नदीतील नैसर्गिक पाण्याचे प्रमाण कमी होऊन ठिकठिकाणी पात्रातील डोहात दूषित पाणीच साचले आहे. मासळ्यांची उपजही कमी होण्याच्या मार्गावर आहे. जलचर, जीवजंतू व वनस्पती दूषित पाण्यामुळे नष्ट होण्याची शक्यता जाणवायला लागली आहे. या नदी परिसरात दिसून येणारे बगळे, करकोचे, पाणकोंबडी, किंगफिशर यांच्याही अस्तित्वावर तसेच भाजीपाला, टरबुजांच्या वाडय़ातील उत्पादन घटल्याचे दिसून येते. राज्य व केंद्रीय जलप्रदूषण नियंत्रण मंडळाने जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रणाबाबत त्वरेने कारवाई करावी, अशी मागणी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे पर्यावरण वाहिनीचे अध्यक्ष मो. शरीफ यांनी केली आहे.

उष्माघाताने पक्ष्यांचा मृत्यू
साकोली, ३१ मे / वार्ताहर

दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्याने पक्षी व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावात यावे लागत आहे. तलाव, नाले आटल्याने पाणी मिळत नसल्याने रस्त्याच्या कडेला पक्षी मृतावस्थेत दिसत आहेत. येथील महामार्गाच्या रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असलेली ४०-५० वर्षे वयाची झाडे तोडण्यात आली. तापमान ४५ अंश सेल्सिअस असताना पक्ष्यांना थांबण्यासाठी रस्त्याच्या बाजूला झाडेच नाहीत. सावलीचा अभाव व पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे पक्षी रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडलेले दिसत आहेत. यात चिमणी, कोकीळ, साळुंखी, मैना, राखी, धनेश, तांबट पक्षी यांचा समावेश आहे. सिलेझरी, सानगडी, बोंडगावदेवी या भागातील रस्त्यांवर पक्षी वाहनांच्या चाकाखाली येऊन चिरडले जात आहेत. वनविभागाने याबद्दल उपाय करावे, अशी मागणी पक्षीमित्रांनी केली आहे.

उज्ज्वल भविष्य निर्माण शिबिराला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
साकोली, ३१ मे / वार्ताहर

आसाराम बापू यांच्या प्रेरणेने येथील श्री योग वेदांत सेवा समितीद्वारे नंदलाल पाटील कापगते विद्यालयामध्ये २४ ते २८ मे दरम्यान, आयोजित विद्यार्थी उज्ज्वल भविष्य निर्माण शिबिराचा १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना योगासन, प्राणायाम, प्रार्थना, ध्यान स्मरणशक्ती वाढवण्याचे विविध उपाय, सद्गुणांचा विकास, आहार, विहार यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आली. या शिबिरातील विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प यावेळी घेतला. विद्यार्थ्यांची भव्य संकीर्तन यात्रा साकोली नगरामध्ये काढण्यात आली. ज्यामध्ये शिबिरार्थ्यांनी विविध संदेश देणारे फलक हाती घेतले होते. शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी भजन, वक्तृत्व, ध्यान, स्मरणशक्ती तसेच खेळांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

नंदलाल भट्टड यांचा सत्कार
दर्यापूर, ३१ मे / वार्ताहर

स्वत:बरोबरच दुसऱ्यांकरिता जगण्यासाठी रतनलाल मथुरादास राठी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे काम नंदलाल भट्टड करीत आहेत. ५१ हजार रुपये ट्रस्टला देऊन त्याच्या व्याजावर ट्रस्टचे समाजकार्य सुरू आहे. भट्टड यांच्या सेवाकार्याचा आदर्श इतरांनी घेण्याजोगा असल्याचे प्रतिपादन दर्यापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजयराव बरगट यांनी केले. ते गाडगेमहाराज मिशन मुंबईद्वारा संचालित समारंभात निराधार बालक आश्रम दर्यापूरतर्फे नंदलाल भट्टड यांच्या वाढदिवसाला त्यांच्या आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विजयराव बरगट यांच्या हस्ते नंदलाल भट्टड यांचा शाल-श्रीफळ-पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर किशोर रहाटे, अजयकुमार वर, रामेश्वर मालपाणी यांनीसुद्धा पुष्पहार घालून नंदलालजी यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व आभार आश्रमाचे व्यवस्थापक गजानन देशमुख यांनी मानले त्याप्रसंगी यशोधा भट्टड, रोहिणी देशमुख, आदी उपस्थित होत्या. रतनलाल मथुरादास राठी ट्रस्टतर्फे गोरगरीब, होतकरू १०० विद्यार्थ्यांना नोटबुक सेट तर १२ ऑगस्ट २००९ ला ६० गरीब विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप करण्याचे नंदलाल भट्टड यांनी जाहीर केले.

ग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांना गृहरक्षक दलात संधी
वर्धा, ३१ मे / प्रतिनिधी

गृहरक्षक दलात ग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांनाही संधी मिळावी म्हणून शुल्कविरहित भरती मोहीम राबविण्याचा निर्णय जिल्हा गृहरक्षक दलाने घेतला आहे. शहरी गृहरक्षकांसाठी दहा दिवसाचे प्रशिक्षण असले तरी ग्रामीण भागातील इच्छुकांना मात्र ४२ दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक आहे. तीन वर्षांची सेवा दिल्यानंतर पोलीस भरतीत शिपाई व वन विभागात गार्ड म्हणून या गृहरक्षकांना मागणीनुसार सामावून घेतले जाते. त्यासाठी पाच टक्के आरक्षण दोन्ही खात्यात आहे. जिल्हा गृहरक्षक दलाने अशा माध्यमातून शंभरावर गृहरक्षकांना शासकीय सेवेची संधी मिळवून दिल्याचे जिल्हा समादेशक प्रवीण हिवरे यांनी नमूद करीत ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांना संधी घेण्याचे आवाहन केले. वर्धा, सेलू व देवळी तालुक्यातील पुरुष व वर्धा शहराच्या आठ किलोमीटर परिघातील महिलांना भरती होण्याची संधी उपलब्ध आहे. ४ जूनला सकाळी ८ वाजता गृहरक्षक दलाच्या इमारतीत भरती प्रक्रिया प्रारंभ होईल. १८ ते ३५ वयोगटातील किमान दहावी अनुत्तीर्ण युवक-युवतींना भरतीत सहभागी होता येईल. उचित शारिरिक क्षमतेसह रहिवासी व जन्मतारखेचा दाखला. गुणपत्रिका व इतर प्रमाणपत्र घेऊन हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याची मागणी
खामगाव, ३१ मे / वार्ताहर
शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता पीक कर्जाची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांची बँकाकडे गर्दी वाढली आहे. मात्र, या बँका शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देतात. तेव्हा पीककर्ज ही भीक नसून शेतकऱ्यांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर येईल, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वावगे यांनी दिला. बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नाहक त्रास देऊ नये. बँकांनी शेतकऱ्यांना मानसन्मानाने पीक कर्ज वाटप करावे, अन्यथा शेतकऱ्यांना त्रास झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जुगार अड्डय़ावर धाड
मासोळी बाजार मस्तान चौकात वरली मटका सुरू असल्याच्या माहितीवरून शिवाजी नगर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यात मसुदखान शहमातखान यास ताब्यात घेतले.
यावेळी त्याच्याकडून रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

अकोल्यात विनयकुमार पाराशरांचा पुतळा उभारणार
अकोला, ३१ मे / प्रतिनिधी

अकोल्याचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष दिवंगत विनयकुमार पाराशर यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर मदन भरगड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पाराशर यांचे अकोला शहराच्या विकासकार्यात मोठे योगदान आहे परंतु, त्यांच्या स्मृती महापालिकेने जपल्या नसल्याची खंत आहे. त्यामुळे त्यांचा अर्धाकृती पुतळा कारागृह चौकात उभारण्यात येणार असल्याचे महापौर भरगड यांनी सांगितले.

घाटपुरी-पंढरपूर पदयात्रेचे आयोजन
खामगाव, ३१ मे / वार्ताहर

घाटपुरी येथील श्रीधर महाराज सेवा मंदिराच्यावतीने यावर्षीही घाटपुरी-पंढरपूर पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रा ७ जूनला घाटपुरी येथील सद्गुरू श्रीधर महाराज मंदिर येथून निघणार आहे. या दिंडीसोबत येणाऱ्यांनी नावाची नोंदणी करावी. भाविकांनी या दिंडी सोहोळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय मालमत्तेचे कंत्राटदाराकडून नुकसान
खामगाव, ३१ मे / वार्ताहर

निकृष्ट कामासोबतच आता कंत्राटदाराकडून शासकीय मालमत्तेचे सुद्धा नुकसान होऊ लागले आहे. हा प्रकार पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत होत असलेल्या लोंखडा फाटा ते जयरामगढ या रस्त्याच्या कामात घडला. कंत्राटदार हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करत आहे, अशी तक्रार संबंधित गावकऱ्यांनी केली आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून याची काहीच दखल घेतली नाही.