Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

विविध

पाकिस्तानातील धुमश्चक्रीत ५० अतिरेकी ठार, ९ सैनिक मृत्युमुखी
इस्लामाबाद, ३१ मे/वृत्तसंस्था

 

पाकिस्तानातील तणावग्रस्त दक्षिण वझिरीस्तानात काल रात्री झालेल्या धुमश्चक्रीत ५० तालिबानी अतिरेकी ठार झाले तर नऊ सैनिक मृत्युमुखी पडले. अतिरेक्यांनी पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या छावणीवर हल्ला चढविल्यानंतर ही धुमश्चक्री झाली. स्वात जिल्'ााचे मुख्यालय असलेले मिनगोरा शहर अतिरेक्यांच्या तावडीतून मुक्त केल्याचा दावा लष्कराने काल केला होता. त्यानंतर जिल्'ाात सर्वत्र गस्त व शोधमोहीम सुरू झाल्यानंतर ही धुमश्चक्री झाली. स्वातच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून लागू असलेली संचारबंदीही आज प्रथमच शिथिल करण्यात आली. स्वातमधील कारवाई नव्वद टक्के पूर्ण झाली असून येत्या दोन-तीन दिवसांत उरलेल्या अतिरेक्यांचा पूर्ण नायनाट होऊन ही कारवाई पूर्णत्वास जाईल, असे लष्करी गोटातून सांगण्यात आले.लष्कराने बुनेर, दिर आणि स्वात जिल्'ाात जोरदार कारवाई सुरू केल्यानंतर अतिरेक्यांनीही लष्करी तळांवरील हल्ले वाढविले आहेत. लष्कराने खैबर भागात लांडी कोटाल येथे तेहरिक ए तालिबान या संघटनेच्या सहा अतिरेक्यांनाही अटक केली असून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.दरम्यान, तालिबानी अतिरेक्यांचा हेतू पंजाब प्रांतात पाय रोवण्याचा आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी ‘द संडे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. संपूर्ण देश आज दहशतवादाविरोधात उभा ठाकला आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वात खोऱ्यातील लोकांचा तालिबान्यांना पाठिंबा असल्याचे मतही त्यांनी फेटाळले.

पंतप्रधानांवरील टीका, वरुणला पाठिशी घालणे भाजपला महाग पडले
व्यंकय्या नायडू यांची कबुली
नवी दिल्ली, ३१ मे/पी.टी.आय.
अलीकडेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना एकटय़ाना दोषी धरता येणार नाही, तर आम्ही प्रचारात घेतलेल्या काही मुद्यांचा लोकांच्या मनावर उलटच प्रभाव पडल्याचे भाजपचे नेते व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ या करण थापर यांच्या सीएनएन-आयबीएन वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना नायडू म्हणाले की, भाजपच्या पराभवाला अनेक कारणे होती, अनेक राज्यांत वेगवेगळे परिणाम दिसून आले; आमच्या काही विरोधकांनी अडवाणींची प्रतिमा ‘हार्डलाईनर’ म्हणून उभी केली, ती आमच्या पक्षविरोधात गेली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आमच्या काही नेत्यांनी केलेले सततचे शरसंधान आणि वरुण गांधी यांना पाठिशी घालणे हे लोकांना पटले नाही, त्यामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले.