Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

अग्रलेख

कारण आणि मीमांसा

 

आणखी पाच वर्षांनी पुढची लोकसभा निवडणूक होईल. मध्यावधी निवडणुकांची शक्यता व भीती आता बऱ्याच अंशी दूर झाली आहे. त्यावेळचे म्हणजे २०१४ चे राजकीय चित्र कसे असेल याचा अंदाज करणे कठीण असले, तरी काही गोष्टींबाबतचा तर्क करणे शक्य आहे. उदाहरणार्थ, आज डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली असली तरी त्यांनी पुढील अडीच-तीन वर्षांत आपण स्वेच्छानिवृत्ती घेऊ, असे संकेत दिले आहेत. त्यांच्यानंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधान होऊ शकतील किंवा राहुल गांधीही! परंतु राहुल यांची ठाम भूमिका आहे की, त्यांना पक्षबांधणीचे काम करायचे आहे. दुसरा मोठा पक्ष असेल तो भाजप. लालकृष्ण अडवाणी यांचीच विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झालेली असली तरी त्यांनीही स्वेच्छानिवृत्तीचे संकेत दिले आहेत. भाजपची व्यूहरचना पुढील पाच वर्षांत कशी असेल याची योजना, २००९ च्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ ते कसा लावणार यावर ठरणार आहे. साधारणपणे तेच उद्दिष्ट ठेवून भाजपमधील अनुभवी मुत्सद्दी मंडळी विचार करू लागली आहेत. भाजपच्या एनडीए ऊर्फ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांनीही आपल्या दारुण पराभवाचा अर्थ लावायला सुरुवात केली आहे. जनता दल (युनायटेड)चे नेते शरद यादव यांनी असे म्हटले आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांनी आघाडीचे नेतृत्व केले तसे यावेळच्या निवडणुकीत नव्हते. (वस्तुत: २००४ चा पराभव वाजपेयींच्या नेतृत्वाखाली आघाडी असतानाच झाला होता. खासगीत काही जण प्रमोद महाजनांची ‘अनुपस्थिती’ भोवली असेही म्हणतात. परंतु मागच्या निवडणुकीची धुरा त्यांच्याचकडे होती आणि ‘शायनिंग इंडिया’चे उद्गाते महाजनच होते. त्यामुळे वाजपेयी वा महाजन असते तरी फरक पडला नसता.) भाजपच्या बऱ्याच मित्रपक्षांनी-शरद यादव, नितिशकुमार, चंद्राबाबू-पराभवाचे खापर नरेंद्र मोदी व वरुण गांधी यांच्या माथ्यावर मारले आहे. त्यांच्या आक्रस्ताळी आणि आक्रमक हिंदुत्त्वाच्या प्रचारामुळे मुस्लिम समाज बिथरला आणि मुलायम व मायावती यांची साथ सोडून काँग्रेसकडे गेला असे त्यांना वाटते. आता तर भाजपचे नेते वेंकय्या नायडू व इतरही मोदी व वरुण यांचे ओझे दूर करायचा विचार करू लागले आहेत. इतर काहींनी, विशेषत: महाराष्ट्रात, आपल्या पराभवाला राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना थोडय़ाफार प्रमाणात जबाबदार आहे असे म्हटले आहे; तर दिल्लीतील भाजपच्या पराभवाला मायावतीेंचा बहुजन समाज पक्ष कारण ठरला, असे निरुपण केले जात आहे. थोडक्यात, पराभवाचे कारण काय आहे, हे कठोर आत्मपरीक्षण करून ठरविण्याऐवजी वरवरची मीमांसा करण्यावरच भर दिला जात आहे. काही निश्चित आडाखे होते, ते सर्व उधळले गेले आहेत. उदाहरणार्थ, भाजपचे मतदार मुख्यत: शहरात राहणारे, मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि सवर्ण, त्याचप्रमाणे ओबीसींमधील नवमध्यमवर्ग आणि बीसींमधील महत्त्वाकांक्षी व नवसुशिक्षित असे आहेत, असे त्यांचे स्वत:चे मापन होते. प्रत्यक्षात सर्व शहरांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. मतदारसंघ नव्याने आखले गेल्यानंतर शहरी मतदारक्षेत्र वाढले होते, तरीही भाजपचा पराभव झाला. हा पराभव शहरांपुरताच मर्यादित नव्हता. ग्रामीण भागात, जेथे १९९० ते २००० च्या दशकात भाजपने झपाटय़ाने आपला जम बसविला होता तेथेही त्यांची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. पंतप्रधानपदाचे भाजपचे दावेदार लालकृष्ण अडवाणी स्वत:च्या गांधीनगर मतदारसंघात एक आठवडाभर अक्षरश: अडकून पडले. कारण तेही तेथेच पराभूत होऊ शकतात अशी स्थिती निर्माण झाली होती. अडवाणी गुजरातेत प्रचारासाठी जाऊच शकले नाहीत. त्यातही नरेंद्र मोदींचा गर्व असा की, त्यांचेच नाव थेट पंतप्रधानपदासाठी घेतले जाऊ लागल्यामुळे अवघा गुजरात एकवटून भाजपला निवडून देईल. गुजरातमधील २६ पैकी २०-२१ जागा मोदी नावाच्या हिंदू मसीहाला मिळतील असे भाजपचे भाकित होते. प्रत्यक्षात १५ जागा मिळाल्या आणि सुमारे एक टक्क्याने एकूण मतातही घट झाली. ही घट अत्यल्प वाटली तरी जेथे १० टक्के मत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता, तेथे एक टक्क्याने कमी होणे म्हणजे ११ टक्क्यांची गणिती तूट दिसते. मोदींच्या पंतप्रधानपदाचा फुगा फुटला (जसा पवारांच्या पंतप्रधानपदाचा प्रचार होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात दाणादाण उडाली). पुढील निवडणूक मुख्यत: राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी होईल, असे तमाम अमेरिकास्थित गुजराती समजाला वाटत होते. त्यांनी तर मोदींना पुन्हा अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यावर (आणि अर्थातच त्यापूर्वी सर्व खटल्यांमधून निर्दोष म्हणून सहीसलामत मोकळे झाल्यानंतर) सर्वत्र ‘महा-मोदीत्सव’ साजरा करायची तयारीच सुरू केली होती. ती सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. परंतु कुणीही कायमचे ऱ्हासग्रस्त राहात नाही. त्यामुळे भाजप पुन्हा भरारी घेऊ शकेल, असे मानणारेही अनेक जण आहेत. जनता पक्षाची शकले झाल्यानंतर त्यातून पूर्वीचा जनसंघ नव्याने भाजप हे रुप धारण करून १९८० साली जन्माला आला. एकाच वेळेस गोळवलकर गुरुजी आणि जयप्रकाश नारायण यांचा वारसा सांगणाऱ्या भाजपला ‘गांधीवादी समाजवादा’चा गणवेश धारण करून १९८४ च्या निवडणुकीत उतरावे लागले. त्या निवडणुकीत खुद्द वाजपेयींचाच ग्वाल्हेर मतदारसंघात पराभव झाला. २२९ जागा लढवून लोकसभेत भाजपचे फक्त दोनच उमेदवार निवडून आले. परंतु या पराभवाने खचून न जाता भाजपने आपले काम चालूच ठेवले. शहाबानो खटल्यानंतर राजीव गांधींनी व काँग्रेसने घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे आणि त्यानंतर बाबरी मशिदीची कुलुपे उघडल्यामुळे एका वेगळ्याच राजकारणाला देशात सुरुवात झाली. त्यातच बोफोर्स प्रकरण उद्भवले. राजीव गांधींना अचाट बहुमत असूनही ते स्वत: आणि काँग्रेस पक्ष बचावाच्या पवित्र्यात गेला. त्यावेळचे राष्ट्रपती झैलसिंग हे तर राजीव सरकार बरखास्त करायला निघाले होते. बोफोर्स आणि बाबरी या दोन मुद्दय़ांवर भाजप, डावे आणि काँग्रेसमधील विश्वनाथ प्रतापसिंग व त्यांचे सहकारी यांनी जे अराजक देशात माजविले, त्या पाश्र्वभूमीवर १९८९ च्या निवडणुका झाल्या. काँग्रेसचे संख्याबळ ४०४ वरून १९७ वर आले आणि भाजपची लोकसभेतील सदस्यसंख्या दोन वरून ८५ इतकी झाली. कुणालाही १९८५ साली, राजीव गांधींच्या तुफानी यशानंतर वाटले नसते की, १९८९ साली त्यांचा पक्ष विरोधी बाकांवर बसेल आणि भाजप इतका उसळून वर येईल. हिंदुत्त्वाचा तो उग्र अविष्कार पाहून भाजपने तेच आपल्या राजकारणाचे मुख्य सूत्र बनविले. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारला, डाव्यांच्या खांद्याला खांदा लावून भाजपने पाठिंबा दिला होता. अर्थातच डाव्यांचे आणि भाजपचे हेतू वेगवेगळे असले, तरी गणिताची पद्धत तीच होती. व्हीपींचे सरकार पडल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. काँग्रेसने तो पाठिंबा काढल्यावर चंद्रशेखर सरकार पडले. १९९१ च्या निवडणुकीत प्रचार काळात राजीव गांधींच्या हत्या झाली नसती तर भाजपचा वाढता जोर तेव्हाच दिसला असता. तरीही त्या निवडणुकीत ४७७ जागा लढवून त्यापैकी १२० जागा भाजपने जिंकल्या. म्हणजेच १९८५ ते १९९१ या सहा वर्षांत दोनच्या १२० जागा झाल्या आणि साडेसात टक्के मतांवरून भाजप २० टक्के मतांपर्यंत पोचला. १९८४/८५ साली भाजपला दोन कोटींच्या आत मते मिळाली होती. ती मतसंख्या सहा कोटींपेक्षा काहीशी कमी म्हणजे तिपटीने वाढली. त्यानंतरच्या वर्षी (१९९२) बाबरी मशिदीचा विध्वंस घडवून आणल्यानंतर भाजपचा उन्माद वाढला. तो उन्माद नसता तर १९९८ साली १८२ जागा, २४ टक्के मतदान (नऊ कोटी मते) भाजपला होऊ शकले नसते. २००४ साली पराभव होऊनही भाजपला २२ टक्के मतदान (सुमारे साडेआठ कोटी मते) मिळाली होती. यावेळेस मात्र त्यांचे मतदान १८ टक्क्यांवर (आठ कोटी मते) इतके उतरले आहे. म्हणजेच हिंदुत्त्वाचा उन्माद जसजसा ओसरत गेला तसतसा भाजपचा प्रभाव कमी होत गेला. १९८९ नंतरच्या दोन दशकात जनतेची मानसिकता पूर्ण बदलली आहे, हे भाजपच्या लक्षातच आले नाही. आता देशाला हवी आहे आधुनिकता, विकासाची हमी, तरुण नेतृत्व आणि मंदिर-मंडलवादी राजकारणाच्या वेढय़ातून मुक्तता. म्हणूनच डॉ. मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध केलेला अश्लाघ्य प्रचार त्यांना भोवला. राहुलचे तारुण्य आणि आधुनिकता, नि:स्पृहता आणि नेतृत्व जनतेला भावले. सोनिया गांधींची विश्वासार्हता अधिक खात्रीची वाटली. भाजपचा ऱ्हास हा त्यांच्या दिशाहीन, अराजकी आणि उन्मादी राजकारणामुळे झाला, हे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. आणखी पाच वर्षांनी त्यांनी पुन्हा तेच माथेफिरू धर्मवादाचे राजकारण केले आणि लोकांच्या बुनियादी प्रश्नांकडे व आकांक्षांकडे दुर्लक्ष केले तर ते आता होत असलेला ऱ्हास थोपवू शकणार नाहीत.