Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

लोकमानस

दोस्तहो, परीक्षकांची ऐशी की तैशी!
‘झी टी.व्ही. मराठी’वरील ‘सारेगमप’ आणि ‘ई.टी.व्ही. मराठी’वरील ‘गौरव महाराष्ट्र’चा दोन्ही कार्यक्रमाचे मुख्य सूत्र म्हणजे नवीन कलाकारांना उत्तेजन देणे आणि त्या कलाकारांच्या गुणांना वाव देतानाच रसिकांना नवीन आवाज ऐकावयास मिळणे, हे आहे. या अर्थाने दोन्ही वाहिन्यांवरील कार्यक्रम निर्मात्यांचे रसिकांच्या वतीने मी अभिनंदन करतो.

 


परंतु कलाकारांना गाण्याची वेळ कमीतकमी साडेतीन मिनिटे दिली पाहिजे. तीन अंतरे गाऊ दिल्याखेरीज कलाकार खुलणार कसा? तीन अंतरे गाण्याचा अधिकार प्रत्येक कलाकारांस दिलाच पाहिजे व त्यासाठी तीन मिनिटे लागोत वा चार मिनिटे लागोत. या अधिकारांवर परीक्षकांनी/ संयोजकांनी आक्रमण करू नये.
दोन परीक्षक अधिक एक अतिथी परीक्षक व एक सूत्रसंचालक हे त्यांच्या मतांचा भडीमार गायकावर करतात. अर्थात परीक्षक हे संगीतातील श्रेष्ठ व अनुभवी आहेत हे निर्विवाद. तरी प्रत्येकाचं गाणं झाल्यावर सूत्रसंचालकाचे मतप्रदर्शन,‘छान झालं. पण.’ त्यानंतर परीक्षकांचे तांत्रिक गोष्टींबाबत मतप्रदर्शन आणि मग प्रत्येक गायकाचे मूल्यमापन हा साचा आता बदलावयास हवा. ई टी.व्ही.चे अमेय दाते व झीच्या पल्लवी जोशी यांनी कमीतकमी बोलण्याची प्रतिज्ञा करावी.
पं. हृदयनाथ मंगेशकर याचे मराठीप्रेम, संतसाहित्याचा गाढा अभ्यास स्तुत्य. त्यांनी लावलेल्या चालींची गाणी कशी झाली याचा इतिहास ते सांगतात तोही मनोरंजक आहे. पण दर वेळेस असा इतिहास सांगू नये व तांत्रिक परीक्षण जाहीरपणे देऊ नये. अतिथी परीक्षक श्रीधर फडके व पद्मजा फेणाणी यांच्यासारखे सौम्य व मितभाषी परीक्षक असावेत. सुरेश वाडकर धड ना हिंदी ना मराठी, धड ना कोल्हापूरचे ना मुंबईचे. त्यांच्या परीक्षणांच्या कसोटय़ा नेमक्या कोणत्या आहेत हे मला तरी कळले नाही. त्याचप्रमाणे परीक्षकांनी एकमेकाची स्तुती करू नये- आता अजीर्ण होते.
सर्वसामान्य रसिकांना गाण्यातील तांत्रिक गोष्टी कळत नाहीत व त्यांना त्यात रसही नसतो. दोन मिनिटांच्या गाण्यानंतर लगेच टीका करणे, हे कोणत्याही कलाकारास नाउमेद करणारे असते आणि हे परीक्षक बोलायला लागले त्यांच्या तोंडाला आवर घालण्याची कोणाचीच हिंमत नाही. रसिकांना सूर, लय, ताल आणि त्या विशिष्ट रागामुळे निर्माण केलेले वातावरण किंवा ललत किंवा तोडी या रागातील आर्तता, व्याकुळता व सौंदर्य हे निश्चित कळते व रसिकांची उत्स्फूर्त दादही असते.
एखाद्या कलाकाराचा आवाज विशिष्ट प्रकारच्या गाण्याला योग्य असतो. मृदू आवाज असलेल्या गायकाला पहाडी आवाजात गाण्यास सांगणे हा अन्यायच. उलटपक्षी उदेश उमपसारख्या कलाकारांचा आवाज पहाडी आहे. त्याला हळुवार भावगीत गाण्यास सांगणे हे कितपत शहाणपणाचे आहे? अरुण दाते यांना पोवाडा गाण्यास सांगणे योग्य होईल का? पण अरुण दाते यांनी प्रत्यक्ष भाग घेतला असता तर त्यांनासुद्धा तुम्ही सुरांशी एकनिष्ठ आहात पण सकाळी उठून एक तास खर्ज लावायास शिका असा सल्ला परीक्षकांनी दिला असता! लता मंगेशकर यांचा आवाज पातळ आहे, हे कोणाला नाकारता येईल? पण म्हणून लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका नाहीत असे कोण म्हणेल का? सुमारे ३५ वर्षांपूर्वी TIME या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साप्ताहिकामध्ये लता मंगेशकर यांच्या आवाजाचे वर्णनो Frail voice that fries to rise above the accompaniment.. असे केले आहे. मग लता मंगेशकरांकडून शमशाद बेगमचा आवाज अपेक्षित करणे व या कसोटीवरून मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे?
प्रत्येक गायकाची, प्रत्येक कलाकाराची त्याच्या आवाजाची व गाणं म्हणण्याची खास शैली असते. ती शैली वृद्धिंगत करणे, जोपासणे आणि गरज असल्यास त्यामध्ये थोडा बदल करणे हा अधिकार त्या गायकाचा व संगीत दिग्दर्शकाचा आहे. एका गायकाची शैली दुसऱ्या गायकावर लादण्याचा आग्रह धरणे, हा त्या कलाकारांवर फार मोठा अन्याय आहे. यापुढे परीक्षकांनी त्यांची मते कलाकारांना जरूर द्यावीत पण स्पर्धा संपल्यावर. स्पर्धा संपल्यावर तांत्रिक समीक्षण दिले तरी चालेल.
गेल्या ४० वर्षांत असंख्य चांगले संगीत दिग्दर्शक झाले. वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, अनिल मोहिले, वसंत देसाई, दत्ता कोरगांवकर, दशरथ पुजारी इ. असे असताना फक्त हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या कुटुंबियांनी गायलेल्या गाण्यालाच प्राधान्य देणे हा पक्षपात आहे. सुमन कल्याणपूर, कृष्णा कल्ले, सुधा मल्होत्रा यांनीही मराठी भावगीतविश्वात स्वत:चा ठसा उमटविला. कुमार गंधर्वानी ‘अजून रुसून आहे,’ सारखी गोड गाणी मराठीला दिली. हे ध्यानात घेता प्रत्येक संगीत दिग्दर्शकाची चांगली गाणी वाहिन्यांनी स्पर्धेत घ्यावीत.
‘सारेगमप’ मधील आणि ई टी.व्ही.वरील सर्व कलाकारांना रसिक या नात्याने माझे एकच सांगणे आहे, प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीप्रमाणे, आवडीप्रमाणे, मूडप्रमाणे गावे. मनमोकळे गावे. खुल्या आवाजात गावे पण असे गा की गाताना तुम्ही स्वत:ला विसराल आणि ऐकणाऱ्यांना वेळेचे भान राहणार नाही! असे गा की, तुमचे गाणे श्रोत्यांच्या शरीराच्या कणाकणांत गुणगुणतच राहील! अरे दोस्तहो, परीक्षकांची ऐशी की तैशी!
अ‍ॅड. श्रीकान्त भट, शीव, मुंबई

म्हाडाने नॅनो घरे उभारावीत
राज्य शासनाने यूएलसी कायदा रद्द केल्याने मुंबई शहर आणि उपनगरात असलेली हजारो एकर जमीन खासगी मालकांना परत केल्याने गरीब, मध्यमवर्गीयांना घरे मिळणे अवघड होऊन खासगी विकासकांना रान मोकळे झाले आहे. या मोकळ्या झालेल्या जागांवर खासगी मालक घरे बांधणार नसतील तर शासनाने त्यांच्यावर छोटी घरे बांधण्याची सक्ती करावी. यासाठी म्हाडाने टाटा उद्योग समूहाप्रमाणे मुंबई शहरात जुन्या चाळींचा व म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करताना अधिक चटई क्षेत्रावर नॅनो घरांची निर्मिती करावी. जेणे करून म्हाडाच्या सोडतीमध्ये चार लाख घरांच्या प्रतीक्षेत असलेले व नागरी निवारा व बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेकडे अर्ज केलेले सात लाख लोक यांच्या घरांचा प्रश्न सोडविता येईल.
टाटा उद्योग समूहाला गरींबाना स्वस्तात घरे देणे परवडते, मग म्हाडाला स्वस्तात घरे देणे का परवडू नये? म्हाडाची स्थापना गरीबांना घरे मिळावी म्हणूनच झाली आहे, हे विसरून चालणार नाही. म्हाडाने स्वत: किंवा टाटा उद्योग समूहाबरोबर करार करून गरीब जनतेच्या घरांची पूर्तता करावी. म्हणजेच खासगी विकासकांचा प्रचंड किमती ठेवून मध्यमवर्गीयांना घरे घेणे मुश्किल करण्याचा धंदा बंद होईल. निवारा हा धंदा न होता माणसाची गरज म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच म्हाडाने नॅनो घरांची निर्मिती करावी.
कॉ. नारायण घागरे,
अध्यक्ष, बृहन्मुंबई भाडेकरू परिषद, काळाचौकी, मुंबई

पाण्याची काटकसर करायची तर बिल्डरांची बांधकामे थांबवा
कित्येक वर्षांत नव्हती एवढी या वर्षी तीव्र पाणीटंचाई मुंबई उपनगर व परिसरात जाणवत आहे. जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पाणी बंद करण्याचे ठरविले आहे.
वास्तविक या टंचाईकाळात शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनासाठी जादा पाणी देण्याची व्यवस्था व्हायला हवी. कारण कृषीउत्पन्न हे देशाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहे; परंतु पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांचे पाणी बंद करणे सयुक्तिक वाटत नाही. त्यासाठी सर्वानीच पाण्याचा वापर अगदी काटकसरीने करून जास्त पाणी कसे उपलब्ध करता येईल हे पाहावे!
हल्ली सर्वत्र गृहसंकुलांची बांधकामे मोठय़ा प्रमाणात चालू आहेत. त्यासाठी पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात होत असतो. आज एकीकडे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी जनता तडफडत आहे. त्यांना प्रसंगी दूषित पाणी प्यावे लागते. मात्र विकासक पाण्याचा बांधकामासाठी वाटेल तसा वापर करीत आहे. ही मोठी विसंगती आहे! प्रशासनाला जनता महत्त्वाची असेल, तर जनतेला वाचविण्यासाठी कठोर उपाययोजना करून बिल्डरची बांधकामे त्वरित थांबविली पाहिजेत.
हिराजी पाटील, वडवली, वसई