Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

कूपनलिकेच्या खड्डय़ात पडून गुदमरून बालकाचा अंत
कराड, १ जून / वार्ताहर

शेतात कूपनलिकेसाठी काढलेल्या सुमारे पंधरा फूट खोल खड्डय़ात खेळ खेळताना पडलेल्या रोहित ऊर्फ जगन्नाथ संजय शिकारी या शेतमजूर कुटुंबातील चार वर्षांच्या चिरमुरडय़ाचा गुदमरल्याने अंत झाल्याची दुर्दैवी घटना आज कराड तालुक्यातील शेणोली येथे घडली. दरम्यान, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व प्रशासनाने रोहितला वाचविण्यासाठी दिलेली चार तासांची झुंज व्यर्थ ठरली. रोहितला खड्डय़ातून बाहेर काढण्यात यश आले, पण या चिमुरडय़ावर काळाने झडप घातल्याने सर्वत्र कमालीची हळहळ व्यक्त होत आहे.

मराठा समन्वय समितीत फूट?
सोलापूर, १ जून/प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर स्थापन झालेली मराठा समन्वय समिती बरखास्त केल्याची घोषणा अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी केली असली तरी या घटनेशी मराठा समन्वय समितीचा काहीही संबंध नसल्याचा दावा समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेने केला आहे. यामुळे आता मराठा समन्वय समितीमध्येच फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पावणेदोन कोटी निधीचा प्रस्ताव
कोल्हापूर, १ जून / विशेष प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शेंडा पार्क परिसरात नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. याबाबत अनेक बैठका झाल्या असून, येत्या अर्थसंकल्पात हॉस्पिटलच्या जागेस कंपाऊंडसाठी एक कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती टोपे यांनी खानविलकर यांना या वेळी दिली.

काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांच्या विरोधात काँग्रेसचाच आंदोलनाचा निर्णय
इचलकरंजी १ जून/ वार्ताहर

नगराध्यक्ष निवडीच्या पाश्र्वभूमीवर सत्तारूढ काँग्रेस पक्षातून फुटून जाणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध जनआंदोलन छेडण्याचा निर्णय काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. फुटीर नगरसेवकांच्या प्रभागात निदर्शने, निषेध, घोषणा, निषेध सभा या मार्गानी आंदोलन तापवत नेले जाणार आहे. एखाद्या पक्षाच्या वतीने पक्षाच्याच नगरसेवकांविरुद्ध आंदोलन करण्याचा हा शहरातील पहिलाच प्रकार आहे. मात्र फुटीर प्रवृत्ती रोखण्यासाठी ही पावले टाकण्यात येत असल्याचे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे.

साताऱ्यात शिवराज्याभिषेक सोहळ्यास आजपासून प्रारंभ
सातारा, १ जून/प्रतिनिधी

युगपुरुष शिवरायांना ‘छत्रपती राजा’ म्हणून घोषित करून मराठी साम्राज्याची स्थापना करणारा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक! मराठी वर्षांमध्ये शिवजयंतीइतकी महती असलेल्या या ऐतिहासिक घटनेला ३३६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मराठय़ांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरीत शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर व कार्याध्यक्ष विश्रांत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिरज तालुक्यातील दहा गावे ‘जवाहर योजने’पासून वंचित
भूजल सर्वेक्षण विभागातील अनागोंदी
सांगली, १ जून / प्रतिनिधी
भूजल सर्वेक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा मिरज तालुक्यातील दहा गावांना फटका बसला असून या गावांना जवाहर योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमानही वाढल्याने ओढय़ा- नाल्यातून पाणी वाहण्याचा कालावधी वाढला आहे.

सांगली महापालिकेपुढे व्यावसायिकांची निदर्शने
सांगली, १ जून / प्रतिनिधी

सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील विविध व्यावसायिकांनी नागरी सुविधांसाठी सांगली महापालिकेवर सोमवारी मोर्चा काढून निदर्शने केली. या मोर्चाचे नेतृत्व युनूस महात यांनी केले.
शंभर फुटी रस्त्यावर प्रामुख्याने मोटार मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, बॉडी मेकर, फॅब्रिकेटर्स आदी व्यवसाय मोठय़ाप्रमाणात असून गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावर हा व्यवसाय सुरू आहे. नुकतेच महापालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविताना या कारखानदारांनी केलेले अतिक्रमण काढून टाकले होते. त्यामुळे या व्यावसायिकांनी आज महापालिकेवर मोर्चा काढून महापालिकेने शंभर फुटी रस्त्यावर पार्किंग पट्टा आखून द्यावा, अशी मागणी केली. पार्किंग पट्टा आखल्याने दुरूस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होणार नाही. पार्किंग पट्टय़ाचे उल्लंघन करणाऱ्यावर महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी भूमिका घेतली होती. याबाबत आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी या रस्त्याची पाहणी करून योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

ग्रामरोजगार सेवकांना अद्याप नियुक्तिपत्रे नाहीत
सांगली, १ जून / प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतील ग्रामरोजगार सेवकांना राज्य शासनाने अद्यापही नियुक्तिपत्र दिलेले नाही. तसेच तुटपुंज्या पगारावर त्यांना राबवून घेतले जात आहे. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांच्या यासह अन्य विविध मागण्यांसाठी जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी दिला. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतील ग्रामरोजगार सेवकांच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सांगली येथे झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना क्षीरसागर बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माकपचे जिल्हा सचिव शंकर पुजारी होते.

वीस रुपयांचा रेल्वे पास म्हणजे गरिबांची क्रूर चेष्टाच- कारमपुरी
सोलापूर, १ जून/प्रतिनिधी

नूतन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी गरिबांसाठी २० रुपयांच्या रेल्वे मासिक पासाची घोषणा करून कामगार आणि गरिबांची क्रूर चेष्टाच केली आहे, अशी टीका शिवसेना जिल्हा उपप्रमुख व कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी केली आहे. असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांचे मासिक उत्पन्न दरमहा ५०० रुपये एवढे मर्यादित ठरवून २० रुपये मासिक पासाची योजना जाहीर केली आहे. आज संघटित क्षेत्रातील अगदी गरिबातील गरीब कामगाराचे मासिक उत्पन्न ५०० रुपयांपेक्षा अधिक असते हे सर्वश्रुत आहे. मग ही २० रुपये मासिक पासाची आकर्षक घोषणा कोणासाठी केली हा प्रश्न निर्माण होतो. ही एक प्रकारे गरिबाची क्रूर चेष्टाच केली आहे. तेव्हा मासिक उत्पन्न ५०० रुपयांऐवजी दरमहा ३००० रुपये केल्यास त्याचा लाभ असंघटित गरीब कामगारांना होईल, असेही श्री. कारमपुरी यांनी म्हटले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची सांगलीत निदर्शने
सांगली, १ जून / प्रतिनिधी

राज्य शासनाने सहावा वेतन आयोग त्वरित द्यावा, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. केंद्राप्रमाणे सहाव्या वेतन आयोगात सुधारित भत्ते, घरभाडे, वाहतूकभत्ता इत्यादी तात्काळ लागू करावा, दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू करावी, २८ महिन्यांचा महागाईभत्ता थकबाकी विनाविलंब द्यावा, विविध संवर्गाचे वेतनत्रुटीचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत, आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष डी. जी. मुलाणी, उपाध्यक्ष शरद पाटील, सरचिटणीस पी. एन. काळे, बजरंग कदम, बजरंग घोरपडे, शिवाजी कोळी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

शाळा प्रवेश समितीवर विद्यार्थी प्रतिनिधी नाहीत
सांगली, १ जून / प्रतिनिधी

शाळा प्रवेशाबाबत नोडल समितीवर विद्यार्थी संघटनेचा एकही पदाधिकारी न घेता ही प्रवेशप्रक्रिया गुंडाळण्याचा डाव अधिकाऱ्यांनी रचल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक शंभोराज काटकर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. भारतीय विद्यार्थी सेनेने गेल्या दोन वर्षांपासून बालवाडी ते महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेत लक्ष घालून पालकांची होणारी लूट थांबवली आहे. प्रवेशासाठी मोठय़ा प्रमाणात अर्ज येतात, असे भासवून जादा तुकडय़ा मंजूर करून घ्यायच्या किंवा बेकायदेशीररीत्या जादा प्रवेश देऊन या मुलांचे शैक्षणिक नुकसान करायचे, असे प्रकार सुरू आहेत. यंदा प्रवेशासाठी देणगी घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असली तरी केवळ इशारे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न विद्यार्थी सेना हाणून पाडेल, असा इशाराही काटकर यांनी दिला. प्रवेशासाठी नोडल समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीवर सर्व शिक्षण संस्थाचालकांनाच घेण्यात आले आहे. या समितीत विद्यार्थी संघटनेचा एकही पदाधिकारी नाही.