Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

२२८ प्रवाशांना घेऊन जाणारे एअर फ्रान्सचे विमान अटलांटिक महासागरात कोसळले
पॅरिस, १ जून/वृत्तसंस्था

ब्राझिल येथील रियो-दि-जानरो येथून २२८ प्रवाशांना घेऊन फ्रान्सकडे निघालेले एअर फ्रान्सचे विमान सोमवारी अ‍ॅटलांटिक महासागरात कोसळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. रियो येथून उड्डाण केल्यानंतर चार तासांमध्ये या विमानाला वादळी हवामानाशी सामना करावा लागला. त्यानंतर विमानातील विद्युत यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचा संदेश या विमानाने पाठवला होता. एअर फ्रान्स कंपनीचे प्रवक्ते फ्रॅन्कॉइस ब्रुसो यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानात अनेक तांत्रिक बिघाड निर्माण झाले होते आणि या साऱ्या अडचणींमुळेच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असावे.

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढा
विलासरावांचा पुनरुच्चार !
मुंबई, १ जून / प्रतिनिधी
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढावे, हे आपले वैयक्तिक मत असून त्यामागे असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे. ती भावना आपण पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली असून पक्षातील कटुता टाळण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्याबाबतचा निर्णय एका महिन्यांत घ्यावा, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. सोनिया गांधी यांनी आदेश दिला, वेगळी जबाबदारी सोपविली तर राज्याच्या राजकारणात परतू, असे सूचक उद्गारही या वेळी देशमुख यांनी काढले.

मीराकुमार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता
उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून मुंडा, बैस आणि नाईक शर्यतीत
नवी दिल्ली, १ जून/खास प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री मीराकुमार लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. येत्या बुधवारी, ३ जून रोजी होणाऱ्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस-युपीएने मीराकुमार यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्षपदासाठी मीराकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील, तर लोकसभेतील नेते प्रणव मुखर्जी त्यांच्या नावाचे अनुमोदन करतील. मीराकुमार यांच्या नावाला भाजप-रालोआकडून विरोध अपेक्षित नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

निंबाळकरांच्या मारेकऱ्यांना अण्णा हजारेंच्या हत्येचीही सुपारी
सीबीआयने दिलेल्या माहितीमुळे खळबळ

मुंबई, १ जून / प्रतिनिधी

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेले डोंबिवली येथील भाजप नगरसेवक आनंद शुक्ल आणि लातूर येथील व्यावसायिक सतीश मंदाडे या दोघांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्याचा कटही रचला होता, असा खळबळजनक खुलासा केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) करण्यात आला आहे. शुक्ल व मदांडे यांना आज पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

निंबाळकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे विभागाला भोवला?
२० अधिकाऱ्यांना गृहविभागाचा धक्का
मुंबई, १ जून / प्रतिनिधी
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बडय़ा नेत्याचा हात असल्याचे विधान करून या प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना दुवा देणाऱ्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाला धक्का देण्यासाठीच तब्बल २० अधिकाऱ्यांच्या कमी महत्त्वाच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्याचे कळते. हे सर्व अधिकारी गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त राकेश मारीया यांच्या नजीकच्या वर्तुळातील मानले जात होते.

दख्खनच्या राणीचा ८० वा वाढदिवस .. समवयस्काच्याच साक्षीने!
चलनाही जिंदगी हैं; चलतीही जा रही हैं!

मानसी होळेहुन्नूर

दिनांक १ जून , वेळ सकाळी ६:३० ची. स्थळ : पुणे स्टेशन. बँडवाल्यांचा ताफा फलाट क्र. १ वर येऊन थांबला. जरतारी साडीतील महिला स्वागतासाठी तबक घेऊन तयार होत्या.. निमित्त होतं 'दख्खनच्या राणीच्या' ८० व्या वाढदिवसाचं.दख्खनच्या राणीच्या वाढदिवसाचा हा योग विलक्षण होता. भारतामध्ये रोज असंख्य रेल्वेगाडया धावतात. पण त्यामध्ये असं भाग्य एखाद्याच सुदैवी गाडीच्या वाटय़ाला येतं. १ जून १९२९ रोजी सुरू झालेली पुणे-मुंबई २१२४ अप ही गाडी जेव्हा धाऊ लागली तेव्हा कदाचित तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्याला कल्पनाही नसेल की अजून काही वर्षांनंतर आपण सुरू केलेली ही दख्खनची राणी खरोखरीच लोकांच्या हृदयातील राणी होऊन जाईल.

तालिबानने केले ४०० विद्यार्थ्यांचे अपहरण
इस्लामाबाद, १ जून/पी.टी.आय.

पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातून तालिबानी दहशतवाद्यांनी ४०० विद्यार्थ्यांचे अपहरण केले असून या दहशतवाद्यांच्या ताब्यात नक्की किती मुले आहेत यावरून सध्या प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान पंतप्रधानांचे सल्लागार मिर्झा मोहोम्मद यांनी रझमक कॅडेट कॉलेजमधील १७ मुले वगळता बाकीच्या ५०० विद्यार्थ्यांना तालिबानींनी आपल्या ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी हा आकडा मात्र ६५ दिला आहे. उत्तर वझिरीस्तानमधील आदिवासी भागात झालेले हे अपहरण आहे.
एकूण ३० बसेसच्या ताफ्यातून शाळेतील मुले, शिक्षक चालले असता तालिबानी दहशतवाद्यांनी या बसच्या ताफ्याला रस्त्याच्या बाजूला रोखले व या मुलांना शाळेच्या प्राचार्यासह पळवून नेले. या दहशतवाद्यांच्या हाती रॉकेट लॉन्चर्स, कलाशनिकोव्ह रायफल्स, हॅन्ड ग्रेनेड्स व इतर शस्त्रे होती, असे निसटलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. पाकिस्तानातील कॅडेट कॉलेजेस् हे लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी चालवतात व लहान वयापासून त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते.

गोरेगाव येथे दोन बसमध्ये टक्कर; १६ जण जखमी
मुंबई, १ जून / प्रतिनिधी

गोरेगाव पश्चिम येथील बांगूरनगर परिसरात आज सायंकाळी दोन बेस्ट बसमध्ये टक्कर होऊन १६ प्रवासी जखमी झाले. सिग्नल सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून दोन्ही बस चालकांनी दाखविलेल्या बेपर्वाईमुळे हा अपघात झाल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास बांगूरनगर येथील सिग्नलवरील दोन विरुद्ध दिशेने येणाऱ्या बेस्ट बसमध्ये टक्कर झाली. त्यामुळे दोन्ही बसमधील १६ प्रवासी जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी १२ जणांना प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले, तर चौघांवर उपचार सुरू आहेत. बांगूरनगरजवळील सिग्नलजवळ नेहमीच निष्काळजीपणे वाहतूक केली जाते, असा स्थानिकांचा आरोप आहे.

पुरंदरे यांच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास कोण सांगणार?
राज ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता
मुंबई, १ जून / प्रतिनिधी

राजकारणात करिअर करायचे असेल तर महाराष्ट्राचा इतिहास माहित असायला हवा. याबाबतीत बाबासाहेब पुरंदरे हे एक उदाहरण आहे. पण त्यांच्यानंतर काय? महाराष्ट्राचा इतिहास कोण सांगणार ? छत्रपतींच्या थोरवीचे दाखले कोण देणार ? परदेशात इतिहास सांगणाऱ्या पिढय़ा तयार होतात, पण आपला इतिहास कोण सांगणार, अशी चिंता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन प्रंसगी ते बोलत होते. ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रात स्वत:ला झोकून द्यावे लागते. बाबासाहेब पुरंदरे हे त्याचे उदाहरण आहे. शिवचरित्र हेच त्यांचे करिअर आहे. त्यासाठी त्यांनी ८६ वर्षे खर्ची घातली, असेही ठाकरे म्हणाले. यश कशाला म्हणायचे ? जो माणूस इतरांना घेऊन मोठा होतो, तो खऱ्या अर्थाने यशस्वी. जिगर असेल तर पुढे जाता येते. तशी जिगर सर्वाना मिळावी आणि करिअरची दिशाही मिळावी अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

दगडाने ठेचून युवतीची हत्या
नाशिक, १ जून / प्रतिनिधी

युवतीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील मैदानात उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी सकाळी पोलीस अकादमी समोरील मैदानात एका युवतीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या युवतीचे वय साधारणत २२ ते २३ असून तिच्या उजव्या हातावर सचिन असे नाव लिहिलेले आहे. मृतदेहाच्या आजुबाजूला तीन ते चार मोठ मोठे दगड आढळून आले. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असण्याची शक्यता तपास यंत्रणेने वर्तविली आहे. संशयिताचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. संबंधित युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही.

‘जनरल मोटर्स’चा दिवाळखोरीसाठी अर्ज
न्यूयॉर्क, १ जून/वृत्तसंस्था

वाहननिर्मिती क्षेत्रातील वैभवशाली परंपरा असलेल्या अमेरिकेच्या जनरल मोटर्स या कंपनीने मंदीच्या तडाख्यामुळे दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी आज सरकारदरबारी अर्ज दाखल केला. त्या घडामोडीमुळे अमेरिकेसह जगातील आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारतातील व्यवहार मात्र आहे त्याप्रमाणेच सुरू राहातील, त्यावर काहीही परिणाम होणार नाही असे जनरल मोटर्सतर्फे स्पष्ट करण्यात आले. दिवाळखोरीतून सावरून आगामी ६० ते ९० दिवसांत नव्या कंपनीच्या रूपात सामोरे येण्यासाठी जनरल मोटर्सने एक योजनाही तयार केली आहे. कामगार कपात करणे, उत्तरदायित्व ५० टक्क्यांनी कमी करणे असे उपाय कंपनीने ठरविले आहे. त्याशिवाय अमेरिकी सरकारकडून आर्थिक मदत मिळविण्याकरिताही कंपनीने काही करार केले आहेत. यासंदर्भात अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेतील वाहन उद्योगातील क्रिस्लर ही दिवाळखोरीतून या आठवडय़ात बाहेर येण्याची शक्यता आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी