Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

जि.प. कर्मचाऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन
औरंगाबाद, १ जून /प्रतिनिधी

केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा, पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात यासह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. दुपारच्या सुटीत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले.

सहाव्या वेतन आयोगासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
औरंगाबाद, १ जून /खास प्रतिनिधी

एक जानेवारी २००६ पासून सहावा वेतन आयोग केंद्र शासनाने मंजूर केलेल्या अहवालानुसार तात्काळ लागू करावा या मागणीसाठी औरंगाबाद शहरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने सोमवारी वेगवेगळी आंदोलने केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले.

कोंडावार हत्येप्रकरणी एकाला पोलीस कोठडी; मुख्य आरोपी निसटला
औरंगाबाद, १ जून /प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन कार्यालयात घुसून लेखापाल डी. एस. कोंडावार यांच्यावर गोळ्या घालून खून करणारा सचिन तायडे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळालाही होता. पोलिसांचा छापा पडण्याच्या काही वेळ आधीच तो त्या ठिकाणाहून निसटल्यामुळे पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.

नदी म्हणजे असतं काय?
मुलं लहान असताना त्यांच्या बोटाला धरून उभं राहायला शिकवणं, बोबडय़ा बोलांमधून नीट शब्द उच्चारायला शिकवणं, नवीन नवीन शब्दांची, वस्तुंची भर त्यांच्या संग्रहात टाकणं, त्यांच्या शंकांची समाधानकारक उत्तरं देणं हे सगळेच पालक यथाशक्ती करत असतात. त्यात आपण काही वेगळं करीत आहोत असं जाणवत नाही. नंतर काही दिवसांनी अक्षर ओळख-
मध्यंतरी एक छोटी मुलगी तिच्या आईसोबत आली होती. उभी होती अगदी तुऱ्र्यात. ठसक्यात वागत होती. तिच्या गोबऱ्या गालांमधून, बिटबिटय़ा डोळ्यांमधून आत्मविश्वास अगदी ओसंडून वाहत होता. कुतुहलानं सगळं न्याहाळणं, बारीकसारीक गोष्टींचं निरीक्षण करणं असं तिचं स्वत:च्याच पद्धतीने सगळं चाललं होतं.

सतीश मंदाडेचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण
उस्मानाबाद, १ जून/वार्ताहर
काँग्रेसचे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात सतीश मंदाडेचे नाव समोर आल्यानंतर जिल्ह्य़ाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. हे वृत्त उस्मानाबाद जिल्ह्य़ात पसरल्यानंतर सर्वसामान्यांना कोण हा सतीश मंदाडे असा प्रश्न निर्माण झाला. काही निवडक व्यक्तींना मात्र हत्या प्रकरणातील धागेदोरे तेरणा सहकारी कारखान्यात तर दडले नाहीत ना अशी शंका आली. तर तेरणा पट्टय़ातील शेतकऱ्यांना मात्र हे परिचित नाव ऐकून जबरदस्त धक्का बसला.

मुखेड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची मागणी
बारावी निकाल
नांदेड, १ जून/वार्ताहर
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल गुरुवारी लागणार असून, सामूहिक कॉपीच्या आरोपावरून मुखेड तालुक्यातल्या तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहण्याची शक्यता असल्याची माहिती हाती आली आहे. अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच तालुक्यातल्या सर्वच विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा अन्यथा विधानभवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार सुभाष साबणे यांनी दिला आहे.

तब्बल १८ तासांनंतर मिटला एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप
प्रवाशांचे हाल; खासगी वाहतूकदारांकडून लूट
औरंगाबाद, १ जून /प्रतिनिधी
मध्यवर्ती बसस्थानकावरून काही बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट होणार असून कर्मचाऱ्यांचेही नुकसान होणार असल्याने एस. टी. महामंडळाच्या औरंगाबाद येथील चालक आणि वाहकांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता अचानक संप पुकारला. बोलणीनंतर सोमवारी दुपारी म्हणजेच १८ तासांनी हा संप मिटला. या काळात येथील बसस्थानकाची एकही बस बाहेर पडली नाही. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. अनेकांनी आरक्षण केलेले होते. त्यांना पर्यायी बस उपलब्ध झाल्या नाहीत. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी घेतला. त्यांनी दुपटीने भाडे आकारणी केली.

विहीर खोदताना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू
भोकरदन, १ जून/वार्ताहर

तालुक्यातील निंबोळा शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनच्या साबडय़ातील दगड डोक्यात पडल्याने चोऱ्हाळा येथील शरद नामदेव शिंदे (वय २३) या मजुराचा सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी क्रेनचालक समाधान गिरी याच्याविरुद्ध निष्काळजीपणे क्रेन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. निंबोळा शिवारातील शेतामध्ये एका खासगी विहिरीचे खोदकाम सुरू होते. या ठिकाणी शरद शिंदे व इतर जण विहिरीतून फोडलेले दगड क्रेनच्या साबडय़ात भरून देत होते. दुपारी दीडच्या सुमारास साबडे भरून विहिरीतून क्रेनचालक समाधान गिरी हा वर घेत असताना साबडय़ातील एक मोठा दगड निसटून खाली उभ्या असलेल्या शरद शिंदे याच्या डोक्यात पडला व तो जागीच मृत्युमुखी पडला. यानंतर त्याचे भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

उजनीचे माजी सरपंच मुकडे अपघातात ठार
लातूर, १ जून/वार्ताहर

उजनी येथील माजी सरपंच पांडुरंग मुकडे, बालाजी हे दोघे मोटरसायकलवरून औस्याहून उजनीकडे जाताना तेलाच्या टँकरने दिलेल्या धडकेमुळे जागीच ठार झाल्याची घटना आज, सोमवार, १ जूनला दुपारी तीनच्या सुमारास घडली. पांडुरंग मुकडे (वय ७०, रा. उजनी) हे औसा येथील एक विवाह समारंभ आटोपून आपल्या गावी जात होते. बालाजी हांडे (वय ३०) हे मोटरसायकल चालवत होते. मुकडे हे पाठीमागे बसले होते. तुळजापूरहून येणाऱ्या तेलाच्या टँकरने जोराची धडक दिल्यामुळे दोघेजण जागीच ठार झाले.

घराची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू
नांदेड, १ जून/वार्ताहर

घराची कच्ची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तौफिकखान (वय १३) या मुलाचा मृत्यू झाला. नांदेड शहरातल्या मगदूमनगर परिसरात ही घटना घडली.मगदूमनगर परिसरात खान यांचे निवासस्थान आहे. त्यांचा मुलगा तौफिकखान हा दुपारी खेळत असताना कच्ची भिंत कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तौफिकखान याच्या दुर्दैवी मृत्युमुळे मगदूमनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन खान कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दलित वृद्धास दगडाने ठेचून मारले!
गंगाखेड, १ जून/वार्ताहर

आम्हास फडे (केरसुणी) फुकट का देत नाहीस या क्षुल्लक कारणांहून दलित समाजातील दत्ता लिंबाजी वाघमारे या ६५ वर्षीय वृद्धास दोघांनी दगडाने ठेचून मारल्याची घटना ३१ मे रोजी मरगळवाडी या छोटय़ाशा गावात घडली. आज १ जूनला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील मरगळवाडी या गावात रविवारी ३१ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दलित समाजातील दत्ता लिंबाजी वाघमारे (वय ६५) यांचा आरोपी शिवाजी बालाजी काचगुंडे व शत्रुघ्न रामभाऊ मरगीळ (दोघेही रा. मरगळवाडी) यांनी जातीय भावनेच्या त्वेषातून दगडाने ठेचून खून केला. गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत दत्ता यास आरोपींनी आम्हास झाडण्याचे फडे (केरसुणी) तू फूकट का देत नाहीत, तू जात विसरला आहेस का म्हणून जातीयवादी शिविगाळ व मारहाण करीत दगडाने ठेचून मारल्यामुळे दत्ता वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी शिवाजी व शत्रुघ्न या दोघांविरुद्ध खुनाच्या गुन्ह्य़ासह अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणाऱ्यांना अटक
हिंगोली, १ जून / वार्ताहर
औंढानागनाथ तालुक्यातील जवळाबाजार ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणारे प्रकाश पंडित व इतरांविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकाश पंडित व काही महिलांनी सोमवारी जवळाबाजार ग्रामपंचायत कार्यालयास सकाळी दहाच्या सुमारास कुलूप ठोकले. आरोपी प्रकाश पंडित व इतरांनी कार्यालयात कुलूप ठोकल्याने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करता आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सुमारे २५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले व सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याची फिर्याद दिली. पुढील तपास जमादार जगदीशसिंह ठाकूर करीत आहेत.

सेनगाव पंचायत समितीला ‘मनसे’ने ठोकले कुलूप
हिंगोली, १ जून / वार्ताहर
सेनगाव तालुक्यात रोजगार हमीवरील मजुरांना कामाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकून सुरू केलेले आंदोलन तहसीलदाराच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.गेल्या सात महिन्यांपासून मजुरीपोटी सुमारे सात कोटी रुपये थकले आहेत. दहा दिवसांपूर्वी अडीच कोटींची रक्कम आली आहे. ३ जूनपासून मजुरांना रकमेचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात संदेश देशमुख, देवीदास गुदर्गे, संतोष गाढवे, विकास शिंदे, नारायण कोटकर आदी सहभागी होते.

उदगीरमधील उड्डाण पुलाचे काम रखडल्याने उपोषणाचा इशारा
उदगीर, १ जून / वार्ताहर

शहरातील नळेगाव रोडवरील उड्डाण पुलाचे काम दोन वर्षांंपासून रखडले असून, ते त्वरित सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या उड्डाण पुलाचे भूमिपूजन केले. तेव्हा उदगीरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण दोन वर्षांत काहीही प्रगती होऊ शकलेली नाही. रेल्वेगेटवर अपघात, कंटेनर अडकण्याचे प्रकार, वाहनांची गर्दी होते. त्यामुळे उड्डाण पुलाचे काम त्वरित सुरू करावे असा इशारा आघाडीप्रमुख करुणा लेंडाणे यांच्यासह विद्या वाघमारे, छाया कांबळे, निर्मला मठपती, सुलोचना केंद्रे आदींनी प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.

बसच्या धडकेने वृद्ध जागीच ठार
लातूर, १ जून/वार्ताहर
नांदेड रस्त्यावर पोलीस लाईनच्या समोर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या बसची धडक बसल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. शहरातील नांदेड रस्त्यावर पोलीस लाईनच्यासमोर रविवारी (३१ मे) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राम कोंडिबा गायकवाड (वय ५५, रा. नाथनगर) हे रस्ता ओलांडत असताना लातूरहून अहमदपूरकडे (क्र. एमएच - २० डी ९२६८) ही बस अहमदपूरकडे भरधाव वेगात जात होती. या बसची राम गायकवाड यांना जोराची धडक बसली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘इन्फंट इंडिया’ संस्थेस धान्य व फळांचे वाटप
बीड, १ जून / वार्ताहर
आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त एड्सबाधित बालकांचे संगोपन करणाऱ्या इन्फंट इंडिया या संस्थेस धान्य व फळवाटप करण्यात आले. सभापती विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विशाल ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेला भेट देऊन वाटप केले. उपेक्षितांच्या मदतीबद्दल दत्ता बारगजे यांनी समाधान व्यक्त केले. अभिजीत गायकवाड, अविनाश खेडकर, कृष्णा वर्मा, सिद्धार्थ पागोटे, किरण पागोटे व सहकाऱ्यांनी बालकांसमवेत काही वेळ घालवून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.

चौदा मोटारसायकली जप्त; दोघांना अटक
जालना, १ जून/वार्ताहर

जालना आणि औरंगाबाद शहरातून चोरीस गेलेल्या १४ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे. जालना येथील स्थानिक गुन्हा शाखेने शुभम राजेंद्र जाधव (रा. चाळीसगाव, ह. मु. जालना) आणि विजय महादेव तरासे (राहणार जालना) या दोन जणांना चोरी गेलेल्या मोटारसायकलींसह पकडले होते. न्यायालयाने त्यांना दोन जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

कोंडावार यांच्या हत्येचा निषेध
औरंगाबाद, १जून/खास प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लेखाधिकारी डी. एस. कोंडावार यांच्यावर झालेल्या अमानवी हल्ल्याचा निषेध करून महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून काम केले. या गंभीर घटनेतील आरोपीला त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून संघटनेमार्फत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सोमवारी लेखा कोष भवनाच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता कोंडावार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रद्धांजलीसाठी अधिकारी, कर्मचारी आणि महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहशिक्षक डी. के. भापकर सेवानिवृत्त
औरंगाबाद, १ जून /खास प्रतिनिधी

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आमठाणा येथील न्यू हायस्कूलमधील सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले डी. के. भापकर हे सेवानिवृत्त झाले. ३६ वर्ष त्यांनी सेवा केली. या सेवानिवृत्तीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधवर, विठ्ठलसिंग राजपूत यांनी डी. के. भापकर यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ आणि साडी, चोळी देऊन सत्कार केला. श्री. भापकर यांनी औरंगाबाद, किनगाव, आळंद, करमाड, अंभई येथील शाळेत काम केले. त्यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे. निवृत्तीनंतर समाजसेवेला वाहून घेण्याचे मनोगत त्यांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केले.


बालगुन्हेगारांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
औरंगाबाद, १ जून /खास प्रतिनिधी

लैंगिक अत्याचारामध्ये आरोपी असलेले गणेश लक्ष्मण देवकर व राहुल खंडू पवार (रा. बाभळगाव, ता. तुळजापूर) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. निरगुडे यांनी जामीन मंजूर केला आहे. उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने या बालगुन्हेगारांचा जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयालाच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या दोघांच्या अर्जावर सुनावणी होऊन न्या. निरगुडे यांनी त्यांची बालगृहातून सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांना कुटुंबाबरोबर राहण्याची परवानगी दिली. परंतु त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय कुटुंब सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या बालगृह निरीक्षक अधिकाऱ्यांनी दोन्ही बालगुन्हेगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुलाखत घ्यावी आणि त्यांचे वडील, मित्र, संबंधित व्यक्ती आणि साक्षीदारांशी चर्चा करून प्रत्येक आठवडय़ाला बालगृह न्यायालयात अहवाल सादर करावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात बालगुन्हेगारांतर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. नामदेव बोराडे यांनी काम पाहिले.

विहिरीचा कठडा ढासळून १६ जण जखमी
लोहा, १ जून/वार्ताहर

रिसनगाव येथे पाणवठय़ाची विहीर ढासळली. त्यात १६ जण जखमी झाले. पंचवीस फूट खोल विहिरीचा काही भाग ढासळल्याने ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असतील अशी शंका होती मात्र कोणाही आढळले नाही. रविवारी दुपारी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या काही महिला विहीर ढासळल्यामुळे जखमी झाल्या होत्या. माती-दगडाखाली कोणी गाडले गेले असावे अशी शंका आल्याने प्रशासनाने विहिरीतील दगड-माती उपसली. रात्री दहा वाजता ढिगारा उपसण्याचे काम संपले. सुदैवाने त्यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. जि. प. व ग्रामपंचायतीच्या मदतीने विहीर पुन्हा बांधण्यात येणार आहे. जखमींना आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार प्रताप पाटील यांनी कालच संबंधितांकडे मागणी केली.

स्वामी समर्थाच्या पालखीचे ४ जून रोजी नांदेडमध्ये आगमन
नांदेड, १ जून/वार्ताहर

अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीचे ४ जूनला नांदेड शहरात आगमन होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
या पालखीत हत्ती, घोडे आणि विविध भागांतील दिंडय़ा लवाजम्यासह चैतन्यनगर येथील शिवमंदिरात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराजांच्या पादुकांची पूजा-आरती होवून सोमेश कॉलनीतील श्रीस्वामी समर्थ मंदिर येथे पालखीचे आगमन होईल. शहरातील चैतन्यनगर शिवमंदिर, राज कॉर्नर, वर्कशॉप, शिवाजीनगर, कलामंदिरमार्गे ही पालखी श्रीस्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी येथे येईल. दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या पादुकांची महाआरती होऊन महाप्रसादास सुरुवात होईल. या पालखी सोहळ्यानिमित्त रात्री ८ ते १० या वेळेत भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्या भाविक भक्तांना श्रीस्वामी समर्थाच्या सेवेत सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा, तसेच ५ जूनला सकाळी ५ ते ७ या वेळेत श्रींच्या पादुकांचा महाअभिषेक आयोजित करण्यात आला आहे.