Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

परीक्षेपेक्षा ऑनलाइनचेच टेन्शन अधिक!
कॅम्पस मूड टीम

दरवर्षी अकरावीच्या अॅडमिशन्ससाठी काही ना काहीतरी वेगळे बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक असलेलं शिक्षण महासंचालनालय व महाराष्ट्र बोर्ड या ना त्या कारणाने एक तर राजकीय

 

पक्षांच्या कात्रीत सापडतात, नाही तर विद्यार्थ्यांमधील प्रचंड असंतोषाला सामोरं जाण्याची वेळ त्यांच्यावर येते. यंदाही ऑनलाइन अॅडमिशनचा प्रस्ताव हा अशाच काहीशा वादात सापडला आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीत बदल हा आवश्यकच आहे. अॅडमिशनसाठी लागणाऱ्या भल्यामोठय़ा रांगा, विद्यार्थ्यांना करावी लागणारी वणवण, फॉर्मस् खरेदी करण्यावर खर्च होणारे पैसे या सगळ्यांपासून विद्यार्थ्यांना थोडा कमी त्रास व्हावा म्हणून ऑनलाइन अॅडमिशन पद्धती राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, पण यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचा गंधही नाही अशा व गरीबवर्गातील विद्यार्थ्यांची त्यामुळे पुरेशी पंचाईत झाली आहे.
अशाच काही इंटरनेट व तंत्रज्ञानाशी फारसं जुळवून न घेतलेल्या विद्यार्थ्यांशी बोलल्यावर जाणवलं की, अनेक विद्यार्थ्यांना तर अॅडमिशन्स ऑनलाइन होणार म्हणजे नक्की काय हेही माहीत नाही. या अॅडमिशनची पद्धती काय असणार? ही वेबसाइट कशी शोधायची? यासारखे प्राथमिक प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडले आहेत. खासकरून आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेल्या विद्यार्थ्यांना या सर्वाचं खूपच टेन्शन आलं आहे. माहितीचा अभाव आणि त्यातून तंत्रज्ञानाबद्दल असलेली अनवस्था या व अशा अनेक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी या अॅडमिशन पद्धतीबद्दल नाकं मुरडली आहेत.
हे विद्यार्थी व त्यांचे पालक या मुळे सध्या टेन्शनमध्ये आहेत. या ऑनलाइन अॅडमिशन पद्धतीत घोटाळा झाला तर वर्ष फुकट जाईल अशी भीती या विद्यार्थी-पालकांना भेडसावत आहे. वर्षभर अभ्यास केल्यानंतर आता जेव्हा निकाल तोंडावर आले आहेत, तेव्हा या आगळ्यावेगळ्या चिंतेने पालकांना ग्रासलं आहे. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेचं जितकं टेन्शन विद्यार्थ्यांना होतं, त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त टेन्शन आता अॅडमिशनचं काय होणार, या विचाराने विद्यार्थ्यांना आलं आहे. आमचे प्रतिनिधी जेव्हा विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधत होते तेव्हा काही विद्यार्थी याबद्दल पूर्वी काहीच माहिती नसल्याचं सांगत होते. या सगळ्यात तुम्ही काही मदत करू शकाल का, असं आमच्या प्रतिनिधींनाच उलट विचारत होते.
ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती होती त्यांच्यापैकीही बरेचजण ऑनलाइन वापराबद्दल अनभिज्ञ होते. त्यांतील बऱ्याच जणांनी आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे यासंबंधी मदत मागितली आहे.
सायबर कॅफेत जाऊन त्यांच्या मालकांकडेही अनेक विद्यार्थ्यांनी मदत मागत आहेत. आजूबाजूच्या सुशिक्षित लोकांकडेही विद्यार्थी मदतीसाठी विनंती करू लागले आहेत. पळापळ करणं चालेल, पण ही ऑनलाइन अॅडमिशन नको, असंही अनेक जण म्हणत आहेत.
काही विद्यार्थ्यांनी मात्र हा बदल स्वागतार्ह आहे, असंही सांगितलं आहे. तंत्रज्ञान जसजसं पुढे जात आहे तसतसं आपल्यालाही प्रगत व्हायला हवं. फक्त या अॅडमिशनबद्दल योग्य माहिती विद्यार्थी, कॉलेजेस व शाळांपर्यंत वेळेवर पोहोचायला हवी.
एकूणच या ऑनलाइन अॅडमिशनविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेकांना याचं प्रचंड टेन्शन आलं आहे, तर यामध्ये सर्वसमावेशक सुसूत्रता असायला हवी, असं मत काही विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. प्रतिक्रिया काहीही असोत आता मात्र या ऑनलाइन अॅडमिशनसाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना कंबर कसायला हवी.