Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तरुणांचे टिळक आणि आगरकर
दोन-दोन, तीन-तीन महिने कसून चालणाऱ्या तालमी, कटिंग मारता मारता होणारी चर्चा, प्रयोग जवळ आल्यानंतर वाढणारी धावप्ांळ, प्रयोगाआधी विंगेत होणारी हृदयाची धडधड आणि

 

तिसऱ्या घंटेनंतर अंगात संचारणारं स्फुरण, त्यातून साकारणारं नाटक..
आजचे तरुण कॉलेज वयात असतानाच नाटय़शास्त्र, नाटक आणि त्याबाबतच्या तंत्रांचं शिक्षण घेताना दिसतात. अशाच काही तरुणांना एकत्र घेऊन सिनेसृष्टीत लेखक म्हणून स्थिरावत असलेल्या कौस्तुभ सावरकर या तरुणाने विश्राम बेडेकर लिखित ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाचा दीर्घाक सादर करण्याचा संकल्प सोडला आहे. कौस्तुभच्या या ‘यंग ब्रिगेड’मध्ये काम करणाऱ्यांपैकी काहींनी नाटय़शास्त्राचा डिप्लोमा केला आहे, तर काही युनिव्हर्सिटीच्या नाटय़शाखेचे माजी विद्यार्थी आहेत.
‘द डिरेक्टर ईझ अॅन कॅप्टन ऑफ शिप’ या वाक्याप्रमाणे दिग्दर्शक या नात्याने कौस्तुभने या नाटकाचा सर्व अंगाने विचार केल्याचे जाणवते. ‘‘लहानपणीच विश्राम बेडेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा सहवास लाभला. त्याच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाल्याने ते आपसूकच श्रद्धास्थान बनले.’’ असे कौस्तुभ सांगतो.
नाटकात ‘टिळक आणि आगरकर’ यांत होणारे वैचारिक द्वंद्व आणि असं असताना या नाटकात कुठेही नसणारा बोजडपणा या गोष्टी भावल्यामुळे कौस्तुभला हे नाटक करावेसे वाटले. नाटकाच्या मूळ हेतूस धक्का न देता काळानुरूप नाटकातील काही भाग वगळून त्याचा दीर्घाक करण्यात आला आहे. हे नाटक रियलिस्टिक जॉनरचं आहे. त्यामुळे त्याचं नेपथ्य उभारणं कठीण काम होतं, असं असतानासुद्धा आर्थिक गणित सांभाळून क्रिएटिव्हिटिला वाव देऊन नेपथ्याच्या बाबतीत वेगळा प्रयोग करण्यात येणार असल्याचे कौस्तुभने सांगितले. ‘‘या नाटकात काम करणारे सगळेच तरुण असल्याने तालमीत वेगळाच उत्साह असतो. या सगळ्या कामात आम्हाला जयंत सावरकर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी या नाटकातील बारीकसारीक गोष्टी समजावून सांगितल्या, त्यामुळे खूप मदत झाली,’’ असे कौस्तुभ आणि त्याची टीम सांगते. या नाटकात टिळकांची भूमिका स्वत: कौस्तुभ सावरकर साकारतोय तर गोपाळराव आगरकर साकारतोय धवल पोकळे. यशोदा आगरकर आणि सत्यभामा टिळक यांची भूमिका अनुक्रमे शुभांगी भुजबळ आणि स्वप्ना जोशी साकारणार आहेत. संयोगिता भावे, ओंकार कुलकर्णी, तेजस रानडे, सुबोध एरंडे हे विविध भूमिका साकारत आहेत. यंग ब्रिगेडच्या या नाटकाचा प्रयोग अत्रे कट्टय़ातर्फे रविवार ७ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता नंदादीप विद्यालय, गोरेगाव (पूर्व) येथे होणार आहे.
या नाटकाची निर्मिती कौस्तुभ थिएटर्सतर्फे करण्यात आली आहे. या नाटकाचा प्रवेश विनामूल्य
आहे.