Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भारतीय बॅडमिंटनमधील उगवती जोडी : अक्षय-जिष्णू
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाण्यातील अक्षय देवलकर आणि जिष्णू सन्याल या दोघांची पुरुष दुहेरीत निवड झाली आहे. वयाच्या विसाव्या वर्षीच या

 

स्पर्धेत सहभागी होणारे ठाण्यातील ते पहिले खेळाडू आहेत. अक्षय-जिष्णू दोघेही ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी असून श्रीकांत वाड या ज्येष्ठ बॅडमिंटनपटूच्या मार्गदर्शनाखाली ते बॅडमिंटनचा गेली अनेक वर्षे सराव करीत आहेत. या जोडगोळीपैकी जिष्णू गेल्या दहा वर्षांपासून बॅडमिंटन खेळत असून तो सुरुवातीला एकेरी खेळत असे. मात्र गेल्या वर्षांपासून अक्षय-जिष्णू एकत्र खेळत असून आज ते जागतिक क्रमवारीत ७७ व्या स्थानावर आहेत.
अक्षयने जोशी-बेडेकर महाविद्यालयातून १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलंय आणि सध्या तो करस्पॉण्डण्ट कोर्सद्वारे पदवी शिक्षण घेत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या अक्षयचे वडील दिलीप देवलकर राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू होते. बॅडमिंटनकडे कसा वळलास या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, ‘‘खरं म्हणजे मला कराटे आणि क्रिकेटची आवड होती, मात्र बरेच जण क्रिकेटकडे वळतात. त्यामुळे आपण वेगळा खेळ निवडावा असं मला वाटलं आणि मी बॅडमिंटनकडे वळलो. मी गेल्या दहा वर्षांपासून बॅडमिंटन खेळतोय.’’ बॅडमिंटनमध्ये शारीरिक क्षमतेचा कस लागतो. त्यामुळे दररोज सहा-सात तासांच्या सरावाव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम हे दोघं करीत असतात. जिष्णूबद्दल बोलताना तो म्हणाला की, अक्षय खेळाची सुरुवात करून देतो, खेळात आवश्यक ते वातावरण तो तयार करतो. त्यामुळे माझ्या अॅटॅकिंग स्टाइल करता त्याचा खूप फायदा होतो. जर तो जास्त जोषात असेल तर मला शांतपणे खेळावं लागतं किंवा याच्या उलटही होऊ शकतं. इंडोनेशियाच्या पुरुष दुहेरीतील प्रसिद्ध खेळाडू चंद्राविजय हा अक्षयचा आवडता खेळाडू आहे.जिष्णू बॅडमिंटनकडे जरा वेगळ्या कारणामुळे वळला. लहानपणी ब्राँकायटीसने आजारी असल्याने डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना ‘त्याला खेळू द्या’ असा सल्ला दिला आणि म्हणून बॅडमिंटनचा पर्याय निवडला गेला. मूळचा कोलकात्याचा असलेला जिष्णू गेल्या सहा वर्षांपासून श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. सरावाबरोबरच इतर लहान मित्रांनी टिप्स दिल्यामुळे आपला खेळ सुधारतो, असं त्याचं म्हणणं आहे. त्याला फूटबॉल खेळायलाही मनापासून आवडते. ‘‘बॅडमिंटनमुळे मी मॅच्युअर्ड व्हायला मदत झाली. शिवाय निर्णय कसा घ्यावा याकरिता तर बॅडमिंटनचा खूपच फायदा होतो.’’ बॅडमिंटन तुमच्यासाठी नक्की काय, या प्रश्नावर दोघंही उत्तरली, ‘‘बॅडमिंटन आमच्यासाठी सगळं काही आहे.’’या दोघांच्याही खेळाच्या प्रगतीमध्ये प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचा मोठा वाटा आहे. ते म्हणतात की, अक्षय माझ्याकडे गेली १० वर्षे शिकतोय, तर जिष्णू सहा वर्षांपासून शिकत आहे. दोघेही कष्टाळू, प्रामाणिक आहेत. दोघेही एकत्र उत्तम खेळतात. जागतिक क्रमवारीत पहिल्या ३२ जोडय़ांमध्ये आपला समावेश व्हावा यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बॅडमिंटनमधील तरुणाईविषयी सांगताना ते म्हणाले की, कोणताही खेळ हा तरुणांचाच असतो, मात्र आपल्याकडे क्रिकेटला जास्त महत्त्व आणि इतर खेळांकडे दुर्लक्ष असा प्रकार आहे. बॅडमिंटन तसा खर्चिक खेळ असल्याने स्पॉन्सर्सनी मदतीचा हात द्यायला हवा. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅडमिंटनमध्ये कष्ट घेण्याची तयारी हवी. इतर कॉलेजगोअर्स मुलांसारखं त्यांना एन्जॉय करता येत नाही. त्यामुळे जो बॅडमिंटनवर पूर्ण लक्ष देऊ शकतो. तोच टिकू शकतो. जिष्णू-अक्षयने बॅडमिंटनच्या ज्युनिअर्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या आठ जोडय़ांमध्ये स्थान मिळवले होते. तसेच सॅफ स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावले होते. दोनदा ते राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियन्स ठरले आहेत. या जोडगोळीसमोर इंडोनेशिया, कोरिया, डेन्मार्क, चीन, मलेशिया येथील बॅडमिंटनपटूंचे कडवे आव्हान आहे. उत्तम कामगिरीकरिता त्यांना ‘कॅम्पस मूड’तर्फे शुभेच्छा! कॅम्पस मूड टीम