Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विद्यार्थी संघटना करताहेत काय?
अॅड‘मिशन’

गेल्या वर्षीची पर्सेटाइल सिस्टीम, या वर्षीचा ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पर्याय आणि या गोंधळात भर म्हणून आता ऑनलाइन अॅडमिशनची प्रक्रिया. यंदाची अॅडमिशन प्रक्रिया कशी असणार याबद्दल विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. असे असतानाच अनेक पालक- विद्यार्थ्यांना अॅडमिशन ऑनलाइन होणार आहे, हेच माहीत नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी ऑनलाइन अॅडमिशन ‘मिशन’ ठरणार आहे. ऑनलाइन

 

अॅडमिशनमधील त्रुटी शोधण्याऐवजी किंवा या प्रक्रियेला पूर्ण विरोध करण्यापेक्षा ही प्रक्रिया सुरळीत पार कशी पडेल हे पाहणे महत्त्वाचे. या संदर्भात विद्यार्थी संघटना कोणती भूमिका घेणार त्याचा कॅम्पस मूड टीमने घेतलेला आढावा.
चेतन पेडणेकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
ऑनलाइन अॅडमिशन ही स्वागतार्ह बाब आहे. ऑनलाइन अॅडमिशन पॅटर्न ‘स्टुडण्ट फ्रेंडली’ कसा होईल याबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. त्याचे स्वरूप निश्चित झाल्यावर मनविसेतर्फे विद्यार्थ्यांना निश्चितच मदत केली जाईल.
प्रा. नरेंद्र पाठक, अध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई विभाग
गेल्या वर्षी सरकारने अकरावीच्या प्रवेशासंबंधी पुरेसे गांभीर्य दाखवले नव्हते. पण यावर्षी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. ऑनलाइन अॅडमिशनबाबत ‘पुणे पॅटर्न’ लागू व्हायला हवा. सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत काही त्रुटी आहेत; परंतु सरकारचा ऑनलाइन अॅडमिशनबाबतचा निर्णय पक्का झाल्यावर माटुंगा येथील ‘मार्बल आर्च’ कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचा हेल्पलाइन नं. २४३०६३२१ हा आहे.
अभिजीत पानसे, सरचिटणीस, भारतीय विद्यार्थी सेना
ऑनलाइन अॅडमिशनच्या कल्पनेचे आम्ही स्वागत करतो. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रत्येक शाखेमध्ये मदत केंद्रे उभारणार आहोत आणि त्याकरता शिवसेना पदाधिकारी आणि मोठय़ा विद्यार्थ्यांना ऑनलाइन अॅडमिशनबद्दलची आवश्यक माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या संदर्भात ३० मे रोजी शिवसेना भवनमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शासनाचा निर्णय समजावून देण्यात आला. इंटरनेटची सुविधा नसणाऱ्या व गरीब विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे विशेष मदत करण्यात येणार आहे. भाविसेला संपर्क साधण्यासाठी kshivsena bvsl असा एसएमएस ५६०७० वर पाठवावा.