Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दिल से..
प्रिय मिहीर,

हाय! कसा आहेस? दिल्लीतला ‘निवडणूक फीव्हर’ उतरला की नाही? मुंबईला पुन्हा एकदा सगळं रुटीन ‘बॅक टू नॉर्मल’ झालं आहे. सगळेजण पुन्हा आपापल्या उद्योगांमध्ये व्यस्त झाले आहेत. तरुण वर्ग मात्र अजूनही कुठे कुठे निवडणूक, निकाल, मंत्रिमंडळ यांबद्दल चर्चा करताना

 

दिसतोय. नवीन मंत्रिमंडळाकडून खूपच अपेक्षा आहेत आणि ‘तरुण’ लोकसभेमुळे लोक बऱ्यापैकी खूषही आहेत. अर्थात, हा आनंद ‘पाण्यावरचे बुडबुडे’ न ठरावा, इतकंच मनापासून वाटतंय. असो.
पाऊस आता कधीही सुरू होईल.. पहिल्या पावसात भिजायचा आपला नेम मी यंदाही चुकवला नाही. पण तू नसल्यामुळे चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. really missed you very much!! खूप खूप आठवण येत होती तुझी. अचानक संधिप्रकाश पडल्यावर बदललेलं वातावरण, गारवा जाणवून देणारी वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ, मधूनच एखादी पक्ष्याची साद, हळूहळू दाटून आलेले ढग, अत्तरमातीचा घमघमाट आणि सरसरत अंगावर आलेले थेंब.. पावसाची सर अंगावर घेत मी खूप वेळ एकटीच उभी होते. भिजत, पाऊस अनुभवत!! पण एका क्षणी इतकं एकटं एकटं वाटायला लागलं, उगीचंच रडू येईलसं वाटायला लागलं.. मग मात्र मी तिथे थांबले नाही.. मिहीर, ‘आपलं माणूस इथे नाही’ ही जाणीव पाऊस आला की इतकी प्रकर्षांने का होते रे?? थोडक्यात काय, तर पुन्हा तुला कधी भेटते असं झालंय!!
Yes!! माझं कॉलेज या आठवडय़ात सुरू होईल. आणि आता खरंच कधी एकदा ते सुरू होतंय असं मला झालंय. काय मजा असते बघ ना; कॉलेज असताना सुट्टी मिळते कधी याची वाट पाहायची आणि सुट्टी लागली, की कॉलेज कधी सुरू होतंय; याकडे डोळे लावून बसायचं! पण तू म्हणालास तसे सल्ले-उपदेशांचे डोस मला घरी-दारी, शेजारीपाजारी मिळणं सुरू झालं आहे. ‘यंदा तरी लष्करच्या भाकऱ्या भाजणं बंद करा.’ इथपासून ते ‘शेवटच्या वर्षी जरी धड अभ्यास केलात, तर आयुष्याचं कल्याण होईल,’ इथपर्यंत सगळ्या पद्धतींच्या डायलॉग्जचा भडिमार ऑलरेडी सुरू झालाय. मी शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेतेय. अर्थात, नक्कीच माझा डिसिजन मीच घेणार आहे. हो,Thanx for being there with me! तुझ्या नुसत्या असं म्हणण्यामुळेसुद्धा मला खूप कॉन्फिडन्स आलाय!
बाकी काय? कसं चाललंय? पत्र पुरे करते आता. काळजी घे मिस यू व्हेरी मच. Love...
सावनी