Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘क्रिकेट टू टेनिस व्हाया फूटबॉल’
मैदानावरील चौकार-षटकारांची आतषबाजी, धडाधड पडणाऱ्या विकेटस्, अफलातून कॅचेस, शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या श्वास रोखून धरणाऱ्या मॅचेस, तर मैदानाबाहेर चिअर गर्ल्सची धूम.. असा हा आयपीएलचा धडाका संपल्यानंतर तरुणांनी मोर्चा वळवला आहे तो

 

फूटबॉल आणि टेनिसकडे. चॅम्पिअन्स लीगची फायनल पाहिल्यानंतर फूटबॉलप्रेमींची एफए कप फायनलची प्रतीक्षाही संपली. आता टेनिसप्रेमी युवकांचे डोळे लागले आहेत ते सध्या चालू असणाऱ्या फ्रेंच ओपनकडे.
मेसीची जादू चालणार की रोनाल्डो आपल्या करामतीने पुन्हा विजयश्री खेचून आणणार.. ऑन्री आपला जलवा दाखविणार की रूनी त्याला वरचढ ठरणार.. युरोपातील आपले वर्चस्व ब्रिटिश क्लब कायम ठेवणार की स्पॅनिश क्लब त्यांना शह देणार.. नाक्यानाक्यावर रंगलेल्या तरुणांच्या या चर्चेला बुधवारी मध्यरात्री अखेर पूर्णविराम मिळाला. इटलीत रंगलेल्या ‘चॅम्पिअन्स लीग’च्या अंतिम सामन्यात स्पेनच्या बार्सिलोनाने इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेडला २-० अशी धूळ चारत ‘युरोपचा किंग’ आपणच असल्याचे सिद्ध केले. बुधवारी रात्री १२.१५च्या ठोक्यास सुरू झालेला हा हायप्रोफाईल सामना मुंबईतील हजारो तरुणांनी अख्खी रात्र जागून पाहिला. तर ज्यांनी झोप मोडायची नाही म्हणून रात्री मॅच मिस केली त्यांनी आवर्जून ती दुसऱ्या दिवशी पाहिली. मात्र लाईव्ह सामन्याचा आनंद लुटणे म्हणजे.. क्या कहना! ती मजा रिप्ले पाहण्यात नाही. काही फूटबॉलवेडय़ा तरुणांनी तर इतक्या रात्रीदेखील सोसायटीच्या आवारात टी.व्ही. लावत आपल्या ग्रुपसोबत गप्पा-गोष्टी, धमाल करीत या सामन्याचा आनंद लुटला. सामन्याच्या दहाव्या मिनिटालाच मेसीच्या शानदार पासवर एटोने जेव्हा चेंडू गोलजाळ्यात धाडला, तेव्हा इटलीतील रोममध्ये जितका जल्लोष झाला, तितकाच उत्साह या तरुणांच्या ग्रुप्समध्येही दिसत होता. तर रोनाल्डोचा फसलेल्या ‘फ्री किक’वर आपली ‘एक्सपर्टस् कमेंट, देण्यासही ही मुलं कमी करत नव्हती. अखेर मेसीच्या शानदार हेडरने बार्साचा दुसरा गोल स्कोअरबोर्डवर लागताच बऱ्याच भारतीय ‘मॅन यू’ प्रेमींनी डुलक्या काढण्यास सुरुवात केली, तर अजूनही रोनाल्डो, रूनी चमत्कार करतील अशी आस लावून बसलेल्या काही जणांचे स्वप्न भंग झाले. मेसी, एटो, ऑन्री, श्ॉवीच्या बार्साने झळाळता चषक उंचावत आपला विजयोत्सवही साजरा करण्यास एव्हाना सुरुवात केलेली. भारतात त्यामानाने सर्वाच्या लाडक्या ‘मॅन यू’चे फॅन्स जास्त आहेत. त्यामुळे एक प्रकारे हा भारताचाच पराभव आहे की काय, असा प्रश्न या तरुणांचे उतरलेले चेहरे पाहून पडत होता. तर त्याउलट बार्साचे तुरळक पाठीराखे मात्र आपणच जगज्जेते ठरल्याच्या आनंदात धुंद होते.
स्ट्रेट ड्राइव्ह, कट, पूल, हूक, गली, मिडऑन, मिडऑफ, बाऊन्सर, स्लोवर वन.. फरगेट इट! फोरहँड, बॅकहँड, एस, डबल फॉल्ट, सव्र्हिस, गेम, सेट अॅण्ड मॅच.. नाही, गोंधळून जाऊ नका. क्रिकेटमधील संज्ञा बदलल्या नसल्या, तरी तरुणाईच्या बोलण्यात सध्या याच शब्दांची चलती आहे. गेला महिनाभर आयपीएलचे सामने पाहून थोडासा का होईना पण वीट आल्याने युवा वर्गाने आपला मोर्चा टेनिसकडे वळवला आहे. रविवारी आयपीएलची ग्रँड फिनाले संपल्यावर आता उद्यापासून रोज संध्याकाळी काय करायचे असा प्रश्न क्रीडाप्रेमी युवा वर्गाला पडला होता. पण अगदी दुसऱ्याच दिवसापासून सुरू झालेल्या ‘फ्रेंच ओपन’ने त्यांना तितकाच सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला.
लाल मातीत रंगणारी फ्रेंच ओपन ही वर्षांतल्या चार ग्रँडस्लॅमपैकी दुसरी स्पर्धा. ऑस्ट्रेलियन ओपनच्या हार्डकोर्टवर फेडररला चकवल्यानंतर आपल्या हक्काच्या लाल मातीत सलग पाचव्यांदा आपली जादू दाखविण्यात नदाल अपयशी ठरल्याने जिद्दीने पेटलेला फेडरर हा एकमेव उरलेला गडही सर करणार अशीच चिन्हे आहेत. तर महिलांमध्ये गतविजेती अॅना इवानोविच आपले जेतेपद कायम राखण्यात अपयशी ठरल्याने सेरेना विल्यम्स पुन्हा आपली मक्तेदारी सिद्ध करणार का बऱ्याच महिन्यांनी पुनरागमन करणारी ‘ग्लॅमडॉल’ मारिया शारापोवा चषकावर आपले नाव कोरणार याचीही चर्चा कट्टय़ांवर रंगत आहे. सानिया मिर्झा जरी सुरुवातीलाच गारद झाली असली, तरी पेस-भूपतीकडून अपेक्षा असल्याने अवघ्या भारतीयांचे डोळे या स्पर्धेकडे लागून राहिले आहेत. टेनिस कोर्टवरील हे रॅकेट्सचे द्वंद्व जरी वातावरणनिर्मितीस पुरेसे असले तरी त्याला खरा तडका लागतो आहे, तो खेळाडूंच्या फॅशन स्टेटमेंट्सचा. ‘अरे, शारापोवाचा तो निळा ड्रेस काय झक्कास आहे ना.. वो तो कुछ भी नहीं, अॅना इवानोविच तिच्यापेक्षा सॉलिड दिसते..’ अशा कमेंट्स ऐकून या स्पर्धेला एक वेगळाच ग्लॅमर असल्याचे जाणवते. त्यामुळे टेनिस नाही तर नाही किमान फॅशनसाठी तरी फ्रेंच ओपन फॉलो करताय ना?
अमेय गिरोल्ला
रुपारेल महाविद्यालय

amey0391@gmail.com