Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

(सविस्तर वृत्त)

२२८ प्रवाशांना घेऊन जाणारे एअर फ्रान्सचे विमान अटलांटिक महासागरात कोसळले
पॅरिस, १ जून/वृत्तसंस्था

 

ब्राझिल येथील रियो-दि-जानरो येथून २२८ प्रवाशांना घेऊन फ्रान्सकडे निघालेले एअर फ्रान्सचे विमान सोमवारी अ‍ॅटलांटिक महासागरात कोसळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. रियो येथून उड्डाण केल्यानंतर चार तासांमध्ये या विमानाला वादळी हवामानाशी सामना करावा लागला. त्यानंतर विमानातील विद्युत यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचा संदेश या विमानाने पाठवला होता. एअर फ्रान्स कंपनीचे प्रवक्ते फ्रॅन्कॉइस ब्रुसो यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानात अनेक तांत्रिक बिघाड निर्माण झाले होते आणि या साऱ्या अडचणींमुळेच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असावे. या विमानावर वीजही पडली असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ब्राझिलच्या हवाई दलाच्या सूत्रांनुसार जेव्हा या विमानाशी असलेला संपर्क तुटला तेव्हा ब्राझिल आणि आफ्रिकेतून लढाऊ विमानांनी त्याच्या शोधासाठी आकाशात झेप घेतली, पण ते सापडू शकले नाही. स्थानिक वेळेनुसार रविवारी सायंकाळी सात वाजता ब्राझिलच्या रियो-दि-जानरो येथून या विमानाने उड्डाण केले व ते सोमवारी सकाळी फ्रान्सच्या द गॉल विमानतळावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उतरणार होते. २१६ प्रवासी व १२ विमान कर्मचारी असे २२८ प्रवासी यातून प्रवास करीत होते. प्रवाशांमध्ये सात लहान मुले व एक अगदी छोटे बाळही होते. या विमानाचे वैमानिक मात्र उच्च प्रशिक्षित असल्याचे एअर फ्रान्सने नमूद केले आहे. या विमानाने घेतलेले शेवटचे ठिकाण अजूनही अज्ञात आहे, कारण रविवारी रात्री १ वाजून ३३ मिनिटांनंतरच विमानाचा संपर्क सुटला होता, असे ब्राझिलच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.