Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढा
विलासरावांचा पुनरुच्चार !
मुंबई, १ जून / प्रतिनिधी

 

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढावे, हे आपले वैयक्तिक मत असून त्यामागे असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे. ती भावना आपण पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली असून पक्षातील कटुता टाळण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्याबाबतचा निर्णय एका महिन्यांत घ्यावा, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. सोनिया गांधी यांनी आदेश दिला, वेगळी जबाबदारी सोपविली तर राज्याच्या राजकारणात परतू, असे सूचक उद्गारही या वेळी देशमुख यांनी काढले.
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात प्रथमच विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना सत्ता हवी आहे. तथापि निवडणुका स्वबळावर लढविल्यास कार्यकर्त्यांवरील अन्याय दूर होण्यास मदत होईल, असेही विलासराव देशमुख म्हणाले. राहुल गांधी हे काँग्रेसचे युवा नेते असून त्यांना महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या भावनेची चांगलीच जाण आहे. त्यामुळे त्यांना वेगळे समजावून सांगण्याची गरज नाही, असेही देशमुख यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दिल्लीत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत परंतु मंत्री देशाचे आहोत. असे असले तरी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत जे प्रश्न दिल्लीत प्रलंबित आहेत त्याचा सर्व राज्यातील खासदारांना घेऊन आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय साधण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी ‘सूर्याजी पिसाळ’ अशासारखे वाक्यप्रयोग केले आहेत त्याबाबत विचारले असता विलासराव देशमुख यांनी त्यांच्या शेजारीच बसलेल्या प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सूत्रे सोपविली तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला.
सरकारच्या ताब्यातील ३२ सार्वजनिक उद्योगांपैकी केवळ १७ उद्योग नफ्यात आहेत. जे उद्योग तोटय़ात आहेत ते संयुक्त सहभागातून सुरू करता येतील का, त्यांची पुनर्रचना करता येईल का हे पाहिले जाईल आणि काही उद्योग हे सुधारण्याच्या पलीकडचे आहेत त्यामुळे त्यांच्याबाबतही निर्णय घ्यावा लागेल. राज्यात आणि देशात विजेची नितांत गरज असल्याने भेलच्या विस्तारीकरणाला गती कशी देता येईल, त्याकडेही लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे अवजड उद्योग खाते देण्याची प्रथा आहे, असे हसतहसत विलासराव म्हणाले आणि त्यांनी मनोहर जोशी यांचे उदाहरण दिले. तेव्हा एका माजी मुख्यमंत्र्यांकडे सध्या राज्याच्या उद्योग खात्याची धुरा आहे याकडे लक्ष वेधले असता विलासराव देशमुख यांनी पत्रकारांना उद्देशून, पुढचे तुम्हीच ठरवा, असे सांगितले तेव्हा हास्यस्फोटच झाला. विधानसभेच्या निवडणुका असल्याने पुढील तीन-चार महिने आपण राज्यात सातत्याने राज्यात असू आणि लोकसभेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.