Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मीराकुमार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता
उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून मुंडा, बैस आणि नाईक शर्यतीत
नवी दिल्ली, १ जून/खास प्रतिनिधी

 

माजी केंद्रीय मंत्री मीराकुमार लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. येत्या बुधवारी, ३ जून रोजी होणाऱ्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस-युपीएने मीराकुमार यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्षपदासाठी मीराकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील, तर लोकसभेतील नेते प्रणव मुखर्जी त्यांच्या नावाचे अनुमोदन करतील. मीराकुमार यांच्या नावाला भाजप-रालोआकडून विरोध अपेक्षित नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी मीराकुमार यांनी रविवारी रात्री जलस्त्रोत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे तातडीने पाठवून मंजूर करवून घेतला. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी युपीएने आपली उमेदवारी निश्चित केल्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे मीराकुमार यांनी आज संसद भवनात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती मोठय़ा शिताफीने टाळली. ‘ये सब तीन तारीख के बाद,’ असे म्हणत त्या निघून गेल्या.
दुसरीकडे उपाध्यक्षपद रालोआतील घटक पक्षाला न देता आपल्याकडे ठेवून घेण्याचा भाजपचा विचार आता जवळजवळ पक्का झाला आहे. या पदासाठी प्रारंभी ज्येष्ठ लोकसभा सदस्य सुमित्रा महाजन यांच्या नावाची चर्चा होती. पण मीराकुमार यांच्या उमेदवारीमुळे त्यांचे नाव मागे पडले. आता या पदासाठी ज्येष्ठ आदिवासी नेते करिया मुंडा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रमेश बैस किंवा गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचे नाव चर्चेत आले आहे. आज संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकांविषयी चर्चा केली. अध्यक्षपदासाठी मीराकुमार यांच्या नावाला भाजपचा कोणताही विरोध नसून उपाध्यक्षपदी भाजपने सुचविलेल्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्याची सत्ताधारी आघाडीची तयारी आहे. भाजपच्या उमेदवाराचे नाव उद्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
मीराकुमार यांच्या रुपाने लोकसभेच्या ६२ वर्षांंच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदाचा मान एका महिला सदस्याला लाभण्याचा इतिहास ३ जून रोजी घडणार आहे. संसदीय परंपरेनुसार काँग्रेसने लोकसभेचे उपाध्यक्ष भाजप-रालोआला दिले आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मीराकुमार यांनी २२ मे रोजी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण त्यानंतर लोकसभा अध्यक्षपदाचा मान महिलेला देण्याची काँग्रेस पक्षात चर्चा सुरु झाल्यानंतर दिवंगत दलित नेते बाबू जगजीवनराम यांच्या कन्या मीराकुमार यांचे नाव पुढे आले.