Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निंबाळकरांच्या मारेकऱ्यांना अण्णा हजारेंच्या हत्येचीही सुपारी
सीबीआयने दिलेल्या माहितीमुळे खळबळ
मुंबई, १ जून / प्रतिनिधी

 

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेले डोंबिवली येथील भाजप नगरसेवक आनंद शुक्ल आणि लातूर येथील व्यावसायिक सतीश मंदाडे या दोघांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्याचा कटही रचला होता, असा खळबळजनक खुलासा केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) करण्यात आला आहे.
शुक्ल व मदांडे यांना आज पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या दोघांची कोठडी मागण्यासाठी केलेल्या अर्जात सीबीआयने, हजारे यांच्याही हत्येची योजना होती, असा खुलासा केला आहे. या अर्जात सीबीआयने दावा केला आहे की, या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पारसमल जैन आणि दिनेश तिवारी यांना निंबाळकर यांच्या हत्येसोबतच हजारे यांची हत्या करण्याचेही आदेश दिले होते. परंतु जैन आणि तिवारी यांनी हजारे यांची हत्या करण्यास नकार दिला. मंदाडे हे खासदार पद्मसिंह पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.
सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निंबाळकर यांच्या हत्येमागे महाराष्ट्रातील एका बडय़ा नेत्याचा हात आहे. या नेत्याने नुकतीच लोकसभेची निवडणूकजिंकून खासदारकी मिळवली आहे. जैन आणि तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने शुक्ल आणि मंदाडे यांना अटक केली होती. मंदाडेने शुक्लच्यामार्फत जैन आणि तिवारी यांना निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. सुपारी म्हणून मंदाडेने ३० लाख रुपये शुक्ल याच्याकडे दिले होते.

सरकारचे निवेदनाचे आश्वासन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खुनाची सुपारी देण्यात आली होती, अशी कबुली पवनराजे निंबाळकर यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली असल्याकडे लक्ष वेधणारा औचित्याचा मुद्दा कपिल पाटील यांनी विधान परिषदेत आज उपस्थित केला. याबाबत निवेदन करण्याचे आश्वासन गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिले. कपिल पाटील म्हणाले की, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयने काही लोकांना अटक केली आहे. त्यांची चौकशी करताना समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खुनाची सुपारी दिल्याचेही उघड झाले असल्याचे सांगण्यात येते. याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.