Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दख्खनच्या राणीचा ८० वा वाढदिवस .. समवयस्काच्याच साक्षीने!
चलनाही जिंदगी हैं; चलतीही जा रही हैं!
मानसी होळेहुन्नूर

 

दिनांक १ जून , वेळ सकाळी ६:३० ची. स्थळ : पुणे स्टेशन. बँडवाल्यांचा ताफा फलाट क्र. १ वर येऊन थांबला. जरतारी साडीतील महिला स्वागतासाठी तबक घेऊन तयार होत्या.. निमित्त होतं 'दख्खनच्या राणीच्या' ८० व्या वाढदिवसाचं.दख्खनच्या राणीच्या वाढदिवसाचा हा योग विलक्षण होता. भारतामध्ये रोज असंख्य रेल्वेगाडया धावतात. पण त्यामध्ये असं भाग्य एखाद्याच सुदैवी गाडीच्या वाटय़ाला येतं. १ जून १९२९ रोजी सुरू झालेली पुणे-मुंबई २१२४ अप ही गाडी जेव्हा धाऊ लागली तेव्हा कदाचित तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्याला कल्पनाही नसेल की अजून काही वर्षांनंतर आपण सुरू केलेली ही दख्खनची राणी खरोखरीच लोकांच्या हृदयातील राणी होऊन जाईल.
खरंतर गाडीचा वाढदिवस हे तर केवळ निमित्त होतं. गाडीत प्रवास करणाऱ्या सगळयांनाच आपलं गाडीवरचं प्रम दाखवण्याची ही अपूर्व संधी होती. नेहमी किंवा वारंवार या गाडीने जा-ये करण्याची वेळ ज्यांच्यावर येते, त्यांच्यासाठी हा प्रवास आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला असतो. या गाडीच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न करायचा असतो. खरंतर हा सारा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ती पुणे-मुंबई रेल्वे प्रवासी संघटना २००६ मध्ये हेमंत राऊत यांच्या पुढाकाराने स्थापनझाली. परंतु वर्षभरातच त्यांचे निधन झाल्याने २००७ मध्ये गाडीचा वाढदिवस साजरा झाला नाही. पण हेमंत राऊत यांची आठवण जागवत २००८ मध्ये डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा झाला. आणि यावर्षी तर ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत तो सोहळा आणखी दिमाखात साजरा करणाचे ठरले. सध्याचे पुणे-मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हेमंत टपले हे तर आज आपल्या घरचे कार्य असावे; अशाच घाईगडबडीत होते. गेली १६ वर्ष दररोज या गाडीने प्रवास करणारे टपले म्हणाले, ‘ही गाडी म्हणजे आमचं घर आहे. आमचे या गाडीशी ऋणानुबंध जुळले आहेत.’
गाडीतील सुंदर सजावटीबद्दल विचारले तेव्हा मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चच्या संचालिका अपर्णा पोतनीस म्हणाल्या, ‘मी, मनिषा, वर्षां, सीमा सगळ्यांनी रात्री साडेबारापर्यंत जागून गाडी सजवली. आम्ही गाडीत असे अनेक कार्यक्रम साजरे करतो. गाडीतील भोंडला आणि हळदीकुंकू तर अगदी खास असते.’ त्याचवेळी १२ वर्षे रोज अपडाऊन करणाऱ्या पल्लवी राऊत म्हणाल्या, ‘या गाडीचा मोह टाळता येत नाही. तीन वर्षांपूर्वी जेव्हा ही गाडी जाळली तेव्हा आम्हाला झालेले दुख आजही आम्ही विसरू शकत नाही.’ अगदी हीच गोष्ट गाडीतील अनेक प्रवाशांनी सांगितली. ३३ वर्षांपासून लोणावळा-मुंबई अपडाऊन करणाऱ्या सुरेंद्र उर्फ दादा राईलकर यांनीही ३३ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र गेल्या ३३ वर्षांच्या काळातील ही एकमेव काळोखी आठवण सांगायला ते विसरले नाहीत. त्या दिवशी अंबरनाथच्या आसपासच्या परिसरातील रहिवाशांनी केलेली मदत तसेच स्वत: दादांनी प्रवाशांना दिलेला मानसिक आधार याबाबत बोलताना पल्लवी राऊत म्हणाल्या, ‘त्या दिवशी आम्ही माणुसकीला सलाम केला.’ निवृत्त झाल्यावरही आम्ही या गाडीच्या वाढदिवसाला जरुर येऊ, असे त्या जेव्हा म्हणाल्या तेव्हा त्यांच्यासाठी ही गाडी म्हणजे घरातल्या माणसांएवढीच महत्त्वाची आहे, हे जाणवले.
गेली सात वर्ष अपडाऊन करणाऱ्या मधु पांडे यांशी बोलताना जाणवले की, ही गाडी ‘हेरिटेज’ असल्याने रेल्वेसाठी तर ती खास आहे. पण या ‘हेरिटेज’ गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही ती तेवढीच ‘स्पेशल’ आहे. फक्त सणच नव्हे तर ग्रुपमधील प्रत्येकाचे वाढदिवस, डोहाळजेवण, केळवण, सेंडऑफही या गाडीत दणक्यात साजरे केले जातात.
गेली १६ वर्ष दररोज या गाडीच्या सहप्रवासी निमिषा कल्वली म्हणाल्या की, गेल्या १६ वर्षांत गाडीत फारसे बदल झालेले नाहीत. पण गाडीबाहेरच्या जगात मात्र खूप बदल झाले, हिरवेगार जंगल जाऊन काँक्रिटचे जंगल उभे राहिले, त्यामुळे पूर्वी कधीतरी प्रवासात दिसणारे, मोर, बिबळे आता दिसेनासे झाले आहेत.’
प्रवाशांना ज्या गाडीचा इतका अभिमान वाटतो, त्या गाडीचा इनचार्ज असणाऱ्या हरिहरन यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनाही या गाडीचा इनचार्ज म्हणवून घेण्यात अभिमान वाटत असल्याचे जाणवले. गेली तीन वर्ष ते गाडीची व्यवस्था पाहात आहेत. त्यांची २५ जणांची टीम या गाडीतील प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असते. त्यामुळेच पासधारकांबरोबरच अधूनमधून प्रवास करणाऱ्यांना ‘डेक्कन क्वीन’च्या पॅन्ट्रीमधला ब्रेकफास्ट केला नाही तर चुकचुकल्यासारखे वाटते. सकाळी भरभरून वाहणारी ही गाडी संध्याकाळी मात्र सुनीसुनी असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. एक्स्प्रेस हायवेमुळेही गाडीतील गर्दी कमी झाली आहे, हेही त्यांनी नमूद केले.
या सगळ्या लोकांशी बोलताना एकच गोष्ट जाणवत होती ती म्हणजे त्यांचे या गाडीवरचे प्रेम. त्यामुळेच कित्येकांनी अशी खंत व्यक्त केली की, संध्याकाळी ही गाडी पकडता येत नाही. एकतर संध्याकाळी ५.१० वाजता ही गाडी मुंबईहून निघते. इतक्या लवकर ऑफिस सुटत नाही. त्यामुळे ही गाडी पकडणे शक्य होत नाही. त्याचबरोबर या गाडीला दादर थांबा नाही, त्यामुळेही उपनगरांमध्ये काम करणाऱ्या अनेकांना ही गाडी पकडता येत नाही. आज १६ डब्यांची ही गाडी असली तरीही महिलांसाठी केवळ एक डबा आहे, त्यातही पासधारक आणि जनरल महिला. त्यामुळे कित्येकदा जागेवरून भांडणे होतात. प्रगती, इंटरसिटी यांसारख्या गाडय़ांप्रमाणे याही गाडीत महिलांसाठी दोन डबे असावेत, अशी मागणी अनेक महिलांनी केली.
याच गाडीतून प्रवास करता करता डॉ. डी. डी. कोसंबी यांनी अनेक प्रबंध लिहिले. ‘डेक्कन क्विीन’चा अभिमान बाळगावा, अशा अनेक गोष्टींपैकी ही एक, असेही काही जणांनी सांगितले.
ए. के. घोष हे मोटरमन गेली ३६ वर्षे या गाडीच्या सेवेत आहेत. फार क्वचित या गाडीला विलंब होतो. वर्षांनुवर्षे नोकरदारांना वेळेत कार्यालयात पोहोचविण्याच्या त्यांच्या कौशल्यावर खुश होऊन ‘डेक्कन क्वीन’च्या फॅन क्लबनी त्यांना खास त्यांचे नाव लिहिलेली टोपी भेट म्हणून दिली आहे.
८० वर्षांची ही पोक्त व प्रेमळ राणी! या राणीच्या प्रेमसहवासात वर्षांनुवर्षे न्हाऊन निघालेले प्रवासी आज तिच्याबद्दलच्या प्रेमापोटी उत्सव साजरा करीत होते.