Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निंबाळकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे विभागाला भोवला?
२० अधिकाऱ्यांना गृहविभागाचा धक्का
मुंबई, १ जून / प्रतिनिधी

 

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बडय़ा नेत्याचा हात असल्याचे विधान करून या प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना दुवा देणाऱ्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाला धक्का देण्यासाठीच तब्बल २० अधिकाऱ्यांच्या कमी महत्त्वाच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्याचे कळते. हे सर्व अधिकारी गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त राकेश मारीया यांच्या नजीकच्या वर्तुळातील मानले जात होते.
निंबाळकर यांची हत्या नवी मुंबई परिसरात करण्यात आली होती. मात्र या तपास प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी कुठलीही प्रगती केली नाही. निंबाळकर यांच्या पत्नी तसेच मुलाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. मात्र सीबीआयकडूनही तपासात फारशी प्रगती झाली नव्हती.
अखेरीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दरोडय़ांप्रकरणी अटक केलेल्या पारसमल जैन आणि दिनेश तिवारी या दोघांनी पवनराजेंच्या हत्येची कबुली दिल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर या दोघांचा ताबा घेऊन सीबीआयने केलेल्या तपासात भाजप नगरसेवक आनंद शुक्ल तसेच व्यावसायिक सतीश मंदाडे यांना अटक केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तविक फेब्रुवारी महिन्यातच गुन्हे अन्वेषण विभागाने जैन आणि तिवारी यांना अटक करून पवनराजे हत्या प्रकरण उघडकीस आणले होते. मात्र ते मे महिन्यांत उघड करण्यात आले. त्यावेळी खासगीमध्ये माहिती देताना तपास अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या एका बडय़ा नेत्याचा सहभाग असल्याचे म्हटले होते. त्यानंतरच सीबीआयला तपासात प्रगती करता आली होती. त्याचीच शिक्षा म्हणून गुन्हे अन्वेषण विभागातील मारीया यांच्या नजीक असलेल्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
या अधिकाऱ्यांचा निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ‘सर्वसाधारण बदल्या’ असे पोलीस आयुक्तालय कार्यालयामार्फत या बदल्यांना संबोधले जात असले तरी निंबाळकर तपास उघड केल्यामुळेच गुन्हे अन्वेषण विभागाला ‘धक्का’ देण्यासाठीच या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे.