Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

प्रादेशिक

महाराष्ट्रभर प्रथमच तीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
उद्यापासून कोल्हापुरात महोत्सवाला सुरुवात
मुंबई, १ जून / प्रतिनिधी
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरने कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर अशा तीन शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान हे तिन्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात येत असून त्याची सुरुवात कोल्हापूरपासून होत आहे. त्यानंतर १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान सोलापूर येथे तर ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान नागपूर येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल.

फईम हाच साहिल पावस्कर!
दोघा साक्षीदारांनी फईमला ओळखले
मुंबई, १ जून / प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या एक वर्ष आधी म्हणजे डिसेंबर २००७ मध्ये आरोपी फईम अन्सारी आपल्या टेलिफोन बुथवर आला होता व कफ परेड परिसरात भाडय़ाने घर शोधून देण्याची विनंती त्याने आपल्याकडे केली होती. त्या वेळी त्याने तो दिल्लीचा रहिवाशी असल्याचे तसेच त्याचे नाव साहिल पावस्कर असल्याचे सांगितले होते, असा दावा करीत एका साक्षीदाराने आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर फईमला ओळखले.

पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा द्या
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, १ जून/ खास प्रतिनिधी
यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालिका व राज्य शासनाने समन्वय साधत तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. श्रेय कोणीही घ्या पण मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ देऊ नका, असे सांगत मुंबईत होणाऱ्या कोणत्याही बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असले पाहिजे, तसेच महापालिकेत महापौर परिषदेची पुन्हा स्थापना झाली पाहिजे, अशी ठोस भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी मांडली.

रेल्वे महाव्यवस्थापकांची ठाणे रेल्वे स्थानकास भेट
ठाणे, १ जून/प्रतिनिधी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक भारतभूषण मोरगील यांनी आज ठाणे रेल्वे स्थानकास भेट देऊन आढावा घेतला. नाहूर रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर ठाण्यात आलेल्या महाव्यवस्थापकांनी सुमारे २० मिनीटे रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सॅटीस प्रकल्पाची पाहणी केली तेव्हा तेथील फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ६० ते ७० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मोरगील यांनी स्टेशनवरील पादचारी पुलांची पाहणी करून प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी कोणत्या सुधारणा करता येतील याचाही आढावा घेतला. दरम्यान रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या २५ जणांवर कारवाई केली.

पवनराजे हत्येतील आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी
पनवेल, १ जून/प्रतिनिधी

लातूरच्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सतीश मंदाडे आणि मोहन अनंत शुक्ल या दोघा आरोपींना न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना रविवारी अटक केली होती. या दोघांना तसेच याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दिनेश राममणी तिवारी आणि पारसमल ताराचंद बडाला जैन यांना सोमवारी पनवेलच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मंदाडे आणि शुक्ल यांना ९ जूनपर्यंत तर तिवारी आणि जैन यांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मंदाडे यांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना औषधे देण्यात यावीत तसेच मंदाडे आणि शुक्ल यांना तुरुंगात घरचे अन्न मिळावे, ही आरोपींचे वकील प्रभाकर जोशी यांची विनंती न्यायालयाने मान्य केली. दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी आपणास मिळाली होती, परंतु आपण त्यास नकार दिला, अशी माहिती पारसमल जैन याने सुनावणीदरम्यान दिल्याने न्यायालयात खळबळ उडाली. विशेष सरकारी वकील एजाझ खान यांनी गुन्हे अन्वेषण शाखेची बाजू मांडली.

मोहन शुक्ल भाजपमधून निलंबित
डोंबिवली, १ जून/प्रतिनिधी

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या डोंबिवलीतील नेहरूनगर प्रभागाचे भाजपचे नगरसेवक मोहन शुक्ल यांना आज पक्षातून निलंबित केले आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार विनोद तावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तसेच, पोटनिवडणुकीत शुक्ल यांना उमेदवारी दिल्याबद्दल तावडे यांनी मतदारांची दिलगिरी व्यक्त केली आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी शुक्ल यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली. पोलिस यंत्रणेला अथक प्रयत्नानंतर पवनराजेंच्या हत्येचे धागेदोरे कळले. त्यामुळे पक्षाला या प्रकरणात मोहन शुक्ल असतील हे समजणे शक्य नव्हते. शुक्ल यांचा या प्रकरणातील सहभाग विचारात घेऊन त्यांना निलंबित केले आहे, असे तावडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्थानिक मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून गोपीनाथ मुंडे व विनोद तावडे यांनी शुक्ल यांना काही अटींवर पक्षात प्रवेश दिला होता, असे कार्यकर्त्यांच्या चर्चेतून समजते. पोटनिवडणुकीच्या वेळी भाजप विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाटय़ रंगले होते.