Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

विधानसभेसाठी मतदारयाद्यांत सुधारणा सुरू
छायाचित्र ओळखपत्रासाठी विशेष कार्यक्रम
नगर, १ जून/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर थोडीही उसंत न घेता निवडणूक आयोगाने लगेचच विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या निर्दोष करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा निवडणूक शाखेने त्यासाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला असून, या वेळी यादीतील प्रत्येक मतदाराकडे ओळखपत्र असलेच पाहिजे अशी रचना करण्यात आली आहे.

सादिलचे साडेनऊ लाख गेले कुठे?
जि. प. शिक्षण समिती सभा
नगर, १ जून/प्रतिनिधी
शाळादुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी मिळालेला चार टक्के सादिलचा ९ लाख ४६ हजार रुपयांचा निधी गेला कोठे? शिक्षण विभागाकडे की बांधकाम विभागाकडे? दोन्ही विभागांनी केलेल्या टोलवाटोलवीत निधीची रक्कम कोणाकडे आहे, याचे उत्तर शिक्षण समितीची सभा चार तासांपेक्षा अधिक काळ चालूनही मिळाले नाही.

‘निळवंडे’चे विमोचक बंद करणार
राजूरशी संपर्क खंडित
अकोले, १ जून/वार्ताहर
निळवंडे धरणाचे बांधकाम विमोचक या वर्षी बंद करण्यात येणार आहेत. हे विमोचक बंद झाल्यामुळे १४ आदिवासी गावांचा राजूरशी असणारा संपर्क भंडारदऱ्याच्या आवर्तन काळातही खंडित होणार आहे. त्यामुळे केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर या १४ गावांची मोठी गैरसोय होणार आहे.

कर्जतमध्ये भरदुपारी एक लाख पाच हजार लुटले
पोलीस ठाण्याजवळील प्रकार
कर्जत, १ जून/वार्ताहर
कर्जत पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर मोटरसायकलस्वारास धक्काबुक्की करून दोघा अनोळखी तरुणांनी त्याच्याजवळील एक लाख पाच हजार रुपये रक्कम असलेली बॅग पळविली. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

एसटीची ‘एकसष्टी’ही उदासवाणी
नगर, १ जून/प्रतिनिधी

सन १९४८मध्ये आजच्याच दिवशी राज्यातील पहिली एसटी बस धावली होती. या घटनेला ६१ वर्षे पूर्ण झाली. मात्र, वर्षभरच नव्हे, तर आजही एसटी महामंडळातर्फे या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतींना फारसा उजाळा देण्यात न आल्यामुळे एसटीची एकसष्टी खुद्द एसटीच्याच जन्मगावी सुनी-सुनी झाली. ना कुठला विशेष कार्यक्रम, ना कुठले अप्रूप!
स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यात खासगी वाहतूक व्यवस्था होती. मदिना मोटर्स सव्‍‌र्हिस कंपनी, पुना ट्रान्सपोर्टसारख्या कंपन्या तेव्हा अस्तित्वात होत्या.

तिचा पिलामधी जीव..
जीवन संघर्षांत स्वजातीचे अस्तित्त्व टिकविण्यासाठी व वंशवृद्धीसाठी प्रत्येक सजीव अंतप्रेरणेने स्वतसारखाच नवीन जीव उत्पन्न करतो व त्याचे संगोपन करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. जीव विकासवादाच्या सिद्धान्ताप्रमाणे पृथ्वीच्या पाठीवर आढळणारे सर्व जीव अविकसित जीवांपासून क्रमाक्रमाने उत्पन्न झालेले आहेत. अविकसित जीवांचा विकास आजच्या जटिल व क्लिष्ट जीवांमध्ये झाला, तशा त्यांच्या अंतप्रेरणाही जटिल व क्लिष्ट होत गेल्या. ममत्वाची व वात्सल्याची अंतप्रेरणा उत्क्रांत प्राण्यांमध्ये अधिक उत्क्रांत दिसते. आपल्या पिल्लांचे परोपरीने संगोपन व संरक्षण करतात.

संतप्त जमावाने मालमोटार पेटविली
बैलगाडीस धडक बसून महिला ठार
नेवासे, १ जून/वार्ताहर
भरधाव मालमोटारीने धडक दिल्याने बैलगाडीतील महिला जागीच ठार झाली. येथील प्रवरा नदीवरील पुलावर हा अपघात आज सकाळी ८ वाजता झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने कांद्याने भरलेली ही मालमोटार पेटवून दिली. त्यामुळे नेवासे-श्रीरामपूर रस्त्यावरील वाहतूक तीन तास बंद होती.

कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प लवकरच सुरू
आचारसंहितेमुळे उद्घाटन लांबले - महापौर
नगर, १ जून/प्रतिनिधी
कचऱ्यापासून खतनिर्मिती हा प्रकल्प महापालिका लवकरच सुरू करणार असल्याचे महापौर संग्राम जगताप यांनी सांगितले. माजी महापौर संदीप कोतकर यांनी एकच दिवस अगोदर मनपा प्रशासनाला पत्र देत हा प्रकल्प सुरू करण्याला होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्या पाश्र्वभूमीवर महापौर जगताप यांनी हा प्रकल्प मनपा लवकरच सुरू करत असल्याचे आज जाहीर केले. हे मनपा वर्तुळात विशेष मानले जात आहे.

बदल्यांचा माहोल
जिल्हा परिषदेत सध्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा माहोल आहे. लवकरच बदल्यांचे आदेश निघतील. बदल्या ही पूर्णपणे प्रशासकीय कार्यवाही असली, तरी बदल्यांचा वेध घेण्यात पदाधिकारी आणि सदस्यही ‘सक्रिय’ आहेत. काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या वाटय़ाला बदल्यांतून बदनामी आली असली, तरी त्यांनी त्याचे सोयरसूतक न बाळगता यंदाही जोमाने सक्रियता दाखवण्यास सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या ‘सक्रियते’ला लगाम घालण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने बदल्यांच्या धोरणात या वर्षांपुरता काही बदल केला आहे. मात्र, बदल करताना सरकारने कर्मचारीनुनयाचा लोकप्रिय मार्गही स्वीकारला आहे.

पोलीस मारहाण प्रकरणातील तिघा आरोपींना जामीन
नगर, १ जून/प्रतिनिधी

वाहतूक पोलीस मारहाण प्रकरणातील तीन आरोपींची न्यायालयाने आज प्रत्येकी १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. आरोपींतर्फे टी. के. बालवे यांनी काम पाहिले. न्यायाधीश सुप्रिया धोलम यांच्यासमोर ही सुनावणी झाली. न्यायालयाने शिवाजी दुसुंगे, अशोक भगत व राजू भगत या आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. गेल्या शनिवारी वाहतूक शाखेचे शिपाई अनिल जाधव यांना एका टोळक्याने मारहाण केली. पोलिसांनी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील तिघांना अटक झाली. इतर आरोपी फरारी आहेत.

वीज पडून घुमरीत महिला ठार,
पतीसह तिघे जखमी
मिरजगाव, १ जून/वार्ताहर

कर्जत तालुक्यातील घुमरी येथील फुलाबाई संभू अनभुले (वय ५१) या वीज पडून जागीच ठार झाल्या, तर त्यांच्या पतीसह दादा व सचिन अनभुले हे तिघे जखमी झाले.आज सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. जखमींवर मिरजगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी ५ वाजता वादळी वारे सुटले. तसेच भुरभुर पावसालाही सुरुवात झाली. त्यावेळी अनभुले कुटुंबीय शेतात काम करीत होते. पाऊस आल्याने त्यांनी शेजारील लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. झाडाखाली उभे असतानाच वीज पडली. त्यात फुलाबाई जागीच ठार झाल्या. त्यांचे कर्जत रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जखमींवर मिरजगाव येथे उपचार सुरू आहेत.

महेश नवमी पाथर्डीत उत्साहात
पाथर्डी, १ जून/वार्ताहर

शहरात माहेश्वरी समाजातर्फे महेशनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. टाळ-मृदंगांच्या गजरात निघालेली मिरवणूक मुख्य आकर्षण ठरली. नवीपेठेतील गणपती मंदिरापासून वाजतगाजत मिरवणूक निघाली. नवीपेठ, क्रांती चौक, गांधी चौकमार्गे मिरवणूक राममंदिरात पोहोचली. तेथे डॉ. विलास व पद्मा बाहेती यांच्या हस्ते आरती करण्यात आली. समाजाच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी भजनी मंडळ, युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भजनसंध्या कार्यक्रम सादर केला. समाजाचे अध्यक्ष सोमनाथ पलोड, सचिव श्रीकांत जाजू, प्रकाश बजाज, शकुंतला बाहेती, गणेश बाहेती, श्रीकांत लाहोटी, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, सचिव राजेंद्र डागा, नगरसेवक रामनाथ बंग आदींनी परिश्रम घेतले.

‘प्रवरा’मध्ये पदव्युत्तर नर्सिग अभ्यासक्रम
राहाता, १ जून/वार्ताहर

प्रवरा अभिमत विद्यापीठास पदव्युत्तर परिचारिका अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून, या वर्षीपासून या अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास प्रथमच मान्यता मिळाली आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचे कार्य पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या संकल्पनेतून साकार झाले. १९७६मध्ये ७५० बेडचे अद्ययावत रुग्णालय सुरू करण्यात आले. सुरुवातीला १०वी नंतरचा नर्सिग कोर्स येथे सुरू करण्यात आला. त्यानंतर १९८६ साली १२वीनंतरचा तीन वर्षांचा जनरल नर्सिग ट्रेनिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या पुढचे पाऊल म्हणून बीएस्सी नर्सिग हा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना नर्सिगमधील अभ्यासक्रमाचे दालन खुले केले. पदव्युत्तर नर्सिग अभ्यासक्रमास इंडियन नर्सिग कौन्सिल यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सहसचिव ब्रिगेडियर डी. एन. अग्रवाल यांनी दिली.

कुंभेफळच्या सरपंचावर अविश्वास ठराव
कर्जत, १ जून/वार्ताहर

तालुक्यातील कुंभेफळ, धांडेवाडी व नेटकेवाडी या ग्रूप ग्रामपंचायतीचे सरपंच वैजीनाथ धोदाड यांच्याविरुद्ध काल ९पैकी सात सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार अरुण पवार यांच्याकडे दाखल केला. या ठरावावर शिवाजी धांडे, अंबर भोसले, शिराज शेख, चंद्रकांत धांडे, हनुमंत नेटके, छाया धांडे व कमल धांडे यांच्या सह्य़ा आहेत. हे सर्व सदस्य सहलीवर गेले आहेत.

सेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या टँकरची महापौरांच्या स्कोडाला धडक
नगर, १ जून/प्रतिनिधी
महापौर संग्राम जगताप यांच्या स्कोडाला मागील बाजूने टँकरची धडक बसल्याने मोटारीचे नुकसान झाले. सुदैवाने गाडीत महापौर नव्हते. हा अपघात सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास जीपीओ चौकात झाला. विशेष म्हणजे हा टँकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या मालकीचा आहे. स्कोडाचे चालक अजय संतोष गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिंगार पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टँकरचालक बशीर हारून शेख (रा. इंदिरानगर, सोलापूर रस्ता) याला ताब्यात घेतले आहे. जीपीओ चौकातील सिग्नलजवळ स्कोडा थांबली होती. त्याच वेळी औरंगाबादकडून नगरकडे येणाऱ्या टँकरची (एमडब्ल्यूए ५१६६) स्कोडाला धडक बसली.

वेळकाढूपणाच्या निषेधार्थ जि. प. कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नगर, १ जून/प्रतिनिधी
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी जि. प. कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केले व दुपारच्या सुट्टीत ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले. जि. प. मुख्यालय व पंचायत समितीचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. जि. प. कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सोपानराव मुळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, सचिव एम. पी. कचरे, सुभाष कराळे, बाळासाहेब सुळे, संजय वाईकर, सुहास खोबरे, शिवाजी शिंदे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आरोग्य कर्मचारी लेखा विभाग, पशुवैद्यकीय, शिक्षण विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.प्राथमिक शिक्षक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित दराने घरभाडे, वाहतूक व पूरकभत्ता मिळावा, पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, सहाव्या आयोगाच्या फरकाची रक्कम तीन टप्प्यांत मिळावी आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

अंगावर विष्ठा टाकून पैशांची बॅग लांबवली
नगर, १ जून/प्रतिनिधी
अंगावर विष्टा टाकून पैशाची बॅग पळविण्याचा प्रकार दिल्ली दरवाजा येथे आज दुपारी घडला. या प्रकरणी नारायण मोहिनीराज वैद्य (रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. चितळे रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून निवृत्तीवेतनाचे ८ हजार ७०० रुपये त्यांनी काढले. पैसे बॅगेत ठेवून ते दिल्ली दरवाजाकडे जात असताना त्यांच्या अंगावर कोणीतरी विष्टा टाकली. कपडे धुण्यासाठी ते बाजूस गेले असता त्यांची बॅग भामटय़ाने पळविली.

हाऊसिंग फायनान्सची सवलत योजना सप्टेंबपर्यंत
नगर, १ जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र स्टेट बँक को-ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनची कर्जदार संस्था व सभासदांसाठी भरपाई व्याजात ७५ टक्के सूट सवलत देण्याची योजना ३० सप्टेंबपर्यंतच आहे. या योजनेला मुदतवाढ देण्यात येणार नसून, कर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॉर्पोरेशनचे संचालक किसनराव लोटके यांनी केले. मंडळाच्या २६ मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्जदार संस्था/सभासदांनी मुद्दलासह बाकी भरपाई व्याजासह त्वरित भरणा केल्यास त्यांना एकूण भरपाई व्याजाच्या ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडतर्फे बेमुदत उपोषण
नगर, १ जून/प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राहुरी येथील प्रकल्पग्रस्तांना प्रतीक्षायादीप्रमाणे तत्काळ नोकरीत सामावून घ्यावे; तोपर्यंत कोणतीही नोकरभरती करू नये, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा शाखेतर्फे आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजीव भोर, कार्याध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, तालुकाध्यक्ष नवनाथ आढाव, पंचायत समिती सदस्य सचिन भिंगारदिवे, डॉ. दत्तात्रेय धोंडे, संभाजी पळसकर आदी सहभागी झाले आहेत.