Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

नागपुरात पहिल्याच पावसाने दाणादाण!
झाडे पडली, विजेच्या तारा तुटल्या, विजेचा कडकडाट आणि वादळही
नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचले, शहरात २७ मि.मी. पावसाची नोंद

नागपूर, १ जून / प्रतिनिधी

मे महिन्यातील कडक उन्हं आणि प्रचंड उकाडय़ात संपूर्ण जीवसृष्टी पोळून निघाल्यानंतर जूनच्या प्रारंभालाच मान्सुनपूर्व पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे कुठे वीज खंडित झाली, झाडांची पडझड तर, कुठे घरांची छपरे उडाली. अनेक नाल्या कचऱ्यामुळे तुंबल्या, अशी शहराची अवस्था झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. विदर्भात अमरावतीत चार मिमी तर, नागपूर येथे २७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अन्य भागात ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली.

सातबाराचा संगणकीकृत उतारा अद्यापही कोराच
योजनेची संथ अंमलबजावणी

नागपूर, १ जून / प्रतिनिधी

शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्यासाठी १० वषार्ंपूर्वी शासनाने सुरू केलेल्या संगणकीकृत सातबारा योजनेच्या संथ अंमलबजावणीमुळे आणि तांत्रिक त्रुटय़ांमुळे अद्यापही अनेक गावांच्या नोंदी संगणकात करण्यात न आल्याने येथील अनेक शेतकऱ्यांचा सातबाराचा संगणकीकृत उतारा अद्यापही कोराच आहे. केंद्राने याबाबत नाराजी व्यक्त केल्यावर शासनाने आता जेथे शक्य आहे त्या गावातील शेतकऱ्यांना तरी, किमान संगणकीकृत उतारा द्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

मुद्रांक विक्रेत्यांच्या संपामुळे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प
नागपूर,१ जून/ प्रतिनिधी

मुद्रांक विक्रीवरील कमिशनमध्ये वाढ करावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी संपावर गेलेल्या राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांमुळे कोटय़वधींचे मुद्रांक व्यवहार ठप्प झाले. मुद्रांक विक्रेत्यांच्या कमिशन मध्ये ३ टक्यांहून दोन टक्कयापर्यंत कपात केल्याने राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते आजपासून संपावर गेले आहेत. या सपांचा आज नागपूरसह विदर्भातही मोठय़ा प्रमाणात परिणाम दिसून आला. विविध प्रमाणपत्र आणि खरेदी विक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या मुद्रांक आज उपलब्ध होऊ शकले नाही.

कठीण गणिताला ‘सोपा’ पर्याय
गणिताला पर्याय मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

राम भाकरे, नागपूर, १ जून

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या गणिताला पर्याय म्हणून सरकारने ‘सोपे गणित’ हा विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. या शैक्षणिक वर्षांपासून दहावीच्या विद्याथ्यार्ंना हा विषय घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने हा विषय शिकवला जाणार आहे. दहावीमध्ये गणितामुळे महाविद्यालयीन शिक्षणाचे स्वप्न भंगलेल्यांना हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे.
गणित हा बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नावडता विषय. अनेकांच्या मनात या विषयाबद्दल भीती असते.

सुगरणींना खोपा बनवण्याची घाई
नागपूर, १ जून / प्रतिनिधी

निसर्गाचे रहाटगाडगे त्याच्या नियमानुसार अव्याहतपणे सुरू असते. त्याचे संकेत पशु-पक्षांनाही बरोबर कळतात. म्हणूनच पावसाची चाहुल लागली की सुगरण पक्षी त्याचे घरटे बांधायला सुरुवात करतो. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ातच खोप्यासाठी गवत गोळा करण्याची घाई या पक्षांना लागलेली असते. पोरासोरांना या सुबक, सुंदर घरटय़ाचे मोठेच आकर्षण असते तर, कलावंतांनी हे घरटे थेट कथा-कवितांमध्येच नेऊन ठेवते. या काळात रानावनात नजर फिरवली की या घरटय़ांची अर्थात खोप्यांची बांधणी सुरू असल्याचे दृष्टीस पडते.

केंद्रीय मंत्री वासनिक यांचे स्वागत
नागपूर, १ जून / प्रतिनिधी

शारदा बहुउद्देशीय महिला विकास मंडळातर्फे संचालित राजीव कर्णबधीर निवासी विद्यालय व कांद्रीची अंजनाबाई वासनिक मतिमंद निवासी शाळेतर्फे केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी डी.डी. रंगारी यांनी मुकुल वासनिक यांना हार घालून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी प्रमोला रंगारी, राजश्री गुप्ता, सुषमा रंगारी, राजेश भामकर, दिनेश कळंबे, कुंदा वासनिक, मुकेश मेश्राम, कैलास ढाले, अश्वजित गोंडाणे, भूमेश कळंबे आदी उपस्थित होते.

मागासवर्गीय वस्त्यांमध्ये नळ योजनेचा फज्जा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आरोप
नागपूर, १ जून / प्रतिनिधी

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने २००८-०९ च्या अंदाजपत्रकानुसार सुरू करण्यात आलेल्या घरोघरी नळ योजनेचा फज्जा उडाला आहे. ही योजना शासनातर्फे राबवण्यात महापालिका अयशस्वी ठरली असल्याचा आरोप शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पाणी पुरवठय़ाच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली होती. यासाठी २००८-०९ च्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही करण्यात आली होती. मात्र, ही योजना राबविण्यात महापालिका प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरले आहे. एकीकडे शहरात भीषण पाणी टंचाई असून संबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. शहरातील असंख्य झोपडपटय़ांमध्ये बोअरवेल नाहीत, विहिरींची सफाई करण्यात आलेली नाही, गेल्या ४० वर्षांपासून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या अजूनही बदलण्यात आल्या नाहीत. पण, मनपा प्रशासनाने शहरात पाणी टंचाई निर्माण करून घरोघरी नळ योजनेचा फज्जा उडाल्याने शासनाला मोठय़ा प्रमाणात कराचे नुकसान सहन करावे लागत आहे. या योजनेची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी घरोघरी नळ योजनेबाबत जनजागृती निर्माण करावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादीचे राजेश रंगारी, भिमराव सहारे, राज ढेंगरे, विनोद रंगारी आदींनी केली आहे. यासंबंधी महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांना निवेदनही देण्यात आले आहे.

सेंट्रल इंडिया युथ असोसिएशनतर्फे मुकुल वासनिक यांचे स्वागत
नागपूर, १जून / प्रतिनिधी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांचे सेंट्रल इंडिया युथ असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले. हँडलुम बोर्डाचे सदस्य हैदर अली दोसानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदू दहाट, ईशांत रामटेके, अंकुश राहुलकर, सौरभ मेंढे, मोहसीन खान, प्रणय मेंढे, आकाश टेंभुर्णे, महेंद्र टेंभुर्णे, चंद्रशेखर मुंढरीकर, नौशाद अंसारी, राजू बोंद्रे, राहुल रामटेके, रौनक गेडाम, विशाल टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

प्रादेशिक मनोरुग्णालयात तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम
नागपूर, १ जून / प्रतिनिधी

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम बाह्य़रुग्ण विभागात आयोजित करण्यात आला होता. वैद्यक अधीक्षक डॉ. व्ही. एन. डाबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. उपअधीक्षक डॉ. अलका देशमुख, मनोविकार तज्ज्ञ डॉ. सागर चिद्दरवार, डॉ. निखील पांडे, डॉ. सुलेमान विराणी, अधिसेविका मालती अल्लडवार आदी यावेळी उपस्थित होते. मनोविकार तज्ज्ञ डॉ. सुलेमान विराणी यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध शारीरिक आजार, त्यांची लक्षणे व उपाययोजना याविषयी माहिती दिली. मनोविकार तज्ज्ञ डॉ. निखील पांडे यांनी तंबाखू सेवनाने मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणामावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यक अधीक्षक डॉ. व्ही.एन. डाबरे यांनी याप्रसंगी मनोविकार व तंबाखू सेवन यांच्या आपसातील संबंधावर माहिती दिली तसेच तंबाखूपासून दूर रहाणे सर्वसामान्यांच्या कसे हिताचे आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. तंबाखू सेवनासंबंधी उपस्थितांच्या शंकांचे निरसन मनोविकार तज्ज्ञांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुलेमान विराणी यांनी केले तर, संचालन केवल शेंडे यांनी केले. सागर चिद्दरवार यांनी आभार मानले. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता वीणा गणवीर, अनघा मोहरील, केवल शेंडे, परिचारिका मार्टिन, मनीष रूपारेल, पी.के. कदम, मनीष शेवाळे, कैलास बैसवारे, दिनेश श्रीखंडे, प्रकाश भगत, अनिल डोमळे, संजय पेटकर आणि अतुल गजभिये आदी यावेळी उपस्थित होते.

मौलाना अब्दुल करीम पारेख ट्रस्टकडून प्राचार्य राम शेवाळकर यांना श्रद्धांजली
नागपूर, १ जून/ प्रतिनिधी

मौलाना अब्दुल करीम पारेख चॅरिटेबल ट्रस्टकडून दिवंगत प्राचार्य राम शेवाळकर यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांच्या कार्याचा व जीवनाचा संक्षिप्त परिचय देण्यात आला आणि मौलाना अब्दुल करीम पारेख व शेवाळकरांचा परिचय करून देण्यात आला. सभेत ह्य़ुमॅनिटी चॅरिटेबल ट्रस्ट व इन्स्टिटय़ूट फॉर प्रमोटिंग इंटरनॅशनल लँग्वेजेसचे सभासद हजर होते. प्राचार्य राम शेवाळकरांच्या मराठी भाषेची सेवा आणि त्यांच्या मानवतावादी भूमिकेचा परिचय यावेळी करून देण्यात आला. तसेच त्यांच्या पुस्तकांवर चर्चा करण्यात आली. शेवाळकर मराठी भाषेविषयी आग्रही भूमिका घेणारे होते. भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांच्या चळवळीत दिवंगत मौलाना अब्दुल करीम पारेख आणि राम शेवाळकरांनी एकत्रित काम केले होते. दोघेही एकमेकांचा खूप आदर करीत होते. प्राचार्य राम शेवाळकरांच्या निधनाने मराठी साहित्याच्या क्षितिजावर असलेला सूर्य अस्त झाला. त्यांच्या निधनाने मानवतावादी संघटनेचे नुकसान झाले, असा ठराव यावेळी संमत करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
नागपूर, १ जून/ प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या भवन, अरुण जोशी शिक्षण महाविद्यालय व स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शंकरनगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबईचे अध्यक्ष डॉ. सुधाकर देशपांडे यांनी पुतळ्यास हार घातला. यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष अरुण जोशी, नगरसेवक विवेक तरासे, राष्ट्रीय वाचनालयाचे अध्यक्ष पद्मश्री तांबेकर, प्राचार्य राम देशपांडे, मोहन कारेमोरे आणि वीरेंद्र देशपांडे यावेळी उपस्थित होते.

लोकशाही दिन कार्यक्रमात खाते प्रमुखांनी हजर राहावे -जिल्हाधिकारी
नागपूर, १ जून / प्रतिनिधी

जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रमात संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांनी हजर राहावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी दिला.
बजत भवनात झालेल्या लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेच्या तक्रारी ऐकूण घेतल्या. खाते प्रमुख उपस्थित राहात नसल्याने जनतेच्या तक्रारी सोडवण्यास विलंब होतो. तक्रार कर्त्यांचेही समाधान होत नाही, त्यामुळे यापुढे खाते प्रमुख गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. लोकशाही दिन कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक छगन वाकडे, मुख्य कार्यपालन अधिकारी आनंद भरकाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी चिंतामन डहाळकर, निवासी जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.

१५ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
नागपूर, १ जून / प्रतिनिधी

शहर पोलिसांनी रविवारी विविध कलमान्वये १५ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई तर, जुगार खेळणाऱ्या२६ आरोपींना अटक केली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७ अन्वये ७, १०९ अन्वये २, ११० अन्वये ३, ४१ अन्वये ३, असे एकूण १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. जुगार खेळणाऱ्या २६ तर, दारूबंदी कायद्यांतर्गत एका आरोपींला अटक करण्यात आली. नाकाबंदीत ३ हजार ५६८ वाहनांची तपासणी करून २० वाहनांना चालान केले. वाहतूक पोलिसांनीही मोटारवाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत ५०१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण ५५ हजार ५०० रुपये तडजोड शुल्क वसूल केले. जादा प्रवासी वाहतूक, कॉर्नर पार्किंग, बस थांब्याजवळ पार्किंग, सिग्नल तोडणे, कर्कश हॉर्न, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मर्यादेपेक्षा जास्त गती आदींप्रकरणी ही कारवाई झाली. तीन आसनी ऑटो रिक्षा १९, दुचाकी- ३, चारचाकी- १ वाहने डिटेन करण्यात आली़ मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ७२ चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहनचालकांनी वाहन चालवताना कागदपत्र सोबत ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

असोसिएटेड ट्रान्सरेल स्ट्रक्चर्स लिमिटेडमध्ये तंबाखू विरोधी दिन
नागपूर, १ जून/ प्रतिनिधी

असोसिएटेड ट्रान्सरेल स्ट्रक्चर्स लिमिटेड बुटीबोरी येथील कारखान्यात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी कंपनीचे महाव्यवस्थापक व्ही.ए. मंद्रे होते. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे १९८७ पासून जागतिक तंबाखू विरोधी दिन आयोजित करण्यात येत आहे. त्यामागील हेतू तंबाखू सेवनापासूनचे आजार कमी करणे किंवा नाहीसे करणे हा आहे. कारखान्यातील कामगार तसेच कर्मचारी तंबाखू सेवनाच्या व्यसनांपासून दूर राहावे तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने संगीता दारव्हेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे तयार करण्यात आलेली ‘तंबाखू आणि मृत्यू’ ही चित्रफित कामगारांना दाखवण्यात आली. कार्यक्रमाला कारखान्याचे सहाय्यक उपमहाव्यवस्थापक एस. वासा, वरिष्ठ व्यवस्थापक संजय पाठक, श्रीनिवास राव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्रीकांत देशपांडे, दीपक मेहुणकर, हृषिकेश पार्वेकर, एस.जी. देशपांडे, पराग देशपांडे, विराग देशपांडे, विवेक थोटे, मुकेश डोये आणि अतुल वालीकुंजे यांचे सहकार्य लाभले.

‘योगिताच्या मारेक ऱ्यांना त्वरित अटक करा’
घरेलू कामगार संघटनेचे उपायुक्तांना निवेदन
नागपूर, १ जून / प्रतिनिधी

योगिता ठाकरे या बालिकेच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी घरेलू कामगार (मोलकरीण) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मोर्चा काढून पोलीस उपायुक्तांना निवेदन सादर केले. संघटनेचे अध्यक्ष जम्मू आनंद यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. कोतवाली पोलीस ठाण्यासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त सुरेश सोने यांची भेट घेऊन निवेदन दिले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाचे निरीक्षण करून आल्याचे आनंद यांनी यावेळी स्पष्ट केले. या घटनेचा तपास आणि इतरही काही शंका जम्मू आनंद यांनी व्यक्त केल्या. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव, पोलीस महासंचालक तसेच पोलीस आयुक्तांच्या नावे असलेले हे निवेदन पोलीस उपायुक्त सुरेश सोने यांनी स्वीकारले. सहायक पोलीस आयुक्त जीवराज दाभाडे, संघटनेचे संयोजक प्रेम जोगी याप्रसंगी उपस्थित होते.