Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
वृक्षवल्ली, वनचरे. . .

 

बायबलच्या पहिल्या पुस्तकात पहिल्या दोन अध्यायांत सृष्टीच्या आणि मानवाच्या निर्मितीची कथा सांगितली आहे. परमेश्वर चराचराचा निर्माता आहे. त्याने साऱ्या निर्मितीला आशीर्वाद दिला. आपली निर्मिती चांगली आहे, असे त्याने पुन:पुन्हा सांगितले. जगातील सर्व पशू, पक्षी, जलचर, भूचर, वृक्षवल्ली यांचे एक विशाल कुटुंब होते आणि त्या कुटुंबाचा प्रमुख होता माणूस! परमेश्वराने मानवाला सांगितले, ‘फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा. सारे पशूप्राणी, वृक्षवेली मी तुला देत आहे.’
आपण विश्वाचे निर्माते नसून विश्वस्त आहोत याची जाणीव आदिमानवाला होती. तो आणि त्याचा अंतरात्मा यांच्यात सुसंगती होती. त्यामुळे स्वार्थ, अहंकार आणि आसक्ती आणि विकारापासून तो मुक्त होता. अशा या अलौकिक, आत्मिक स्वातंत्र्यामुळे तो निसर्गाबरोबर सुसंगती अनुभवीत होता. वन्य पशूंपासून त्याला धोका नव्हता. तो आनंदाच्या नंदनवनात वावरत होता. पूर्णपणे निरामय जीवन जगणाऱ्या माणसाच्या मनात तृष्णेचे भाव दाटून येऊ लागले. त्याला सुखासीनतेची स्वप्ने पडू लागली. आसक्तीच्या काळसर्पाने त्याला वेटोळे घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिपूर्ण सुखात नांदणाऱ्या माणसाला अतृप्तीने ग्रासले. त्याची लालसा आणि वासना जागृत झाली. तो मोहाच्या आवर्तात सापडला. त्याचा स्वत:वरचा संयम सुटला. देवाने निषिद्ध केलेल्या झाडावरची सगळी फळे त्याने झोडपून पाडली. त्या क्षणापासून त्याच्यात ओरबाडण्याची वृत्ती जन्माला आली.
..आणि पर्यावरणाचा तोल ढळला. माणूस वन्य प्राण्यांना भिऊ लागला. भूमी शापित झाली. ती उपज देईनाशी झाली. धन-धान्याऐवजी ती काटे-कुसळे निपजू लागली. सृष्टीचे चक्र बिघडले. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी उष्णतेची लाट, कधी गारठणारी थंडी.. सारे गणित बिघडले.. आज वसुंधरेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.. धोक्याची घंटा घणघणत आहे. अवघी सृष्टी कण्हत आहे, विव्हळत आहे.. मोकळय़ा श्वासासाठी धापा टाकीत आहे.. सारा प्रताप माणसाच्या अनियंत्रित तृष्णेचा! (५ जून : जागतिक पर्यावरण दिन)
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
कृष्णविवर- १
कृष्णविवरांचे प्रकार कोणते?

कृष्णविवरांच्या वस्तुमानानुसार त्यांचे वर्गीकरण करता येते. बहुतांश कृष्णविवरे ही तारकीय कृष्णविवरे व दीर्घीकीय कृष्णविवरे अशा दोन प्रमुख गटांत विभागली जातात. तारकीय कृष्णविवरांचे वस्तुमान हे साधारणत: सूर्याच्या वस्तुमानाच्या ३ ते १० पट इतके असते आणि त्यांची निर्मिती ही मोठय़ा ताऱ्यांच्या मृत्यूमधून होते. दीर्घीकीय कृष्णविवरे ही अतिजड स्वरूपाची असतात आणि त्यांचे वस्तुमान हे साधारणपणे सूर्याच्या एक लाख ते एक अब्ज यादरम्यान असते. ही कृष्णविवरे बहुधा दीर्घीकांच्या केंद्रस्थानी आढळून येतात. या अतिजड कृष्णविवरांच्या निर्मितीबाबत अनेक सिद्धांत प्रचलित आहेत. सामान्यत: असे मानले जाते की, त्यांची निर्मिती ही अनेक लहान कृष्णविवरे एकत्र येऊन किंवा मुळातील लहान कृष्णविवराने मोठय़ा प्रमाणावर वायू व इतर पदार्थ गिळंकृत केल्याने होत असावी. कर्क तारकासमूहातील ‘ओ. जे. २८७’ या दीर्घीकेच्या केंद्रस्थानी आढळून आलेले सूर्याच्या १८ अब्ज पट वस्तुमानाचे कृष्णविवर हे आपल्याला माहीत असलेले सर्वात मोठे कृष्णविवर आहे.
याशिवाय तिसऱ्या प्रकारांत मोडणारी मध्यम आकाराची कृष्णविवरेही अस्तित्वात आहेत. या कृष्णविवरांचे वस्तुमान हे सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे एक हजार पट असते. आकाशातील तेजस्वी क्ष-किरण स्रोत हे त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मानले जातात. याखेरीज चौथा प्रकार म्हणजे सुक्ष्म कृष्णविवरे! गुरुत्वाकर्षण आणि विश्वनिर्मितीच्या काही सिद्धांतांनुसार अतिवेगवान मूलभूत कणांच्या टकरीमधून अशा सुक्ष्म कृष्णविवरांची निर्मिती होऊ शकते. मात्र अशी कृष्णविवरे फार काळ टिकू शकत नाहीत आणि गॅमा किरणे उत्सर्जित करीत ती बाष्पिभूत (नष्ट) होऊन जातात. अवकाशामधून येणाऱ्या अतिवेगवान कणांच्या आपल्या वातावरणावरील माऱ्याने या स्वरूपाची कृष्णविवरे आपल्या पृथ्वीभोवतीही तयार होत असावीत व नंतर नष्ट होत असावीत, असा अंदाज आहे.
अनिकेत सुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
व्हर्सायचा तह

पहिल्या महायुद्धाचा शेवट व्हर्सायच्या तहाने झाला. फ्रान्समधील व्हर्सायच्या प्रसिद्ध आरसे महालात या तहाबाबत विजेते राष्ट्र आणि पराभूत राष्ट्र यांची परिषद भरली. त्यात जर्मन शिष्टमंडळाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांचे स्वागतही लोकांनी दगडी, नासकी अंडी मारून केले. एका दुय्यम दर्जाच्या हॉटेलात या शिष्टमंडळाला नजरकैदेतच ठेवण्यात आले होते. तह स्वीकारला नाही तर युद्धाला तयार व्हा, अशी इंग्लंड, फ्रान्सने धमकी दिल्यावर त्यावर सहय़ा करण्याशिवाय जर्मनीपुढे पर्यायच नव्हता. २ जून १९१९ रोजी या तहातील तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या. या तहानुसार ३०० कोटी डॉलर इतकी जबर नुकसानभरपाई जर्मनीवर लादली गेली, तसेच जर्मनीला युरोपातील, तसेच आशिया, आफ्रिका खंडातील वसाहतींवरील आपला हक्क सोडावा लागला. जर्मनीचे नौदल व वायुदल साफ कोलमडून टाकून लष्करही फक्त एक लाखावर आणले. जर्मनीचे संपन्न असे अल्सेस व लॉरेन हे प्रदेश फ्रान्सला दिलेच, पण खनिजसंपन्न असा सारा प्रांतही १५ वर्षांसाठी फ्रान्सला देण्यात आला. जर्मनीचे खच्चीकरण करणे हाच व्हर्सायच्या तहाचा मुख्य उद्देश असल्याने शांतता तर सोडाच, पण जर्मनीत पराभवाची, सुडाची भावना निर्माण झाली. याचा फायदा पुढे हिटलरने घेतला. व्हर्सायचा तह पायदळी तुडवून तो जर्मन नागरिकांच्या गळय़ातला ताईत बनला. पुढे घडलेल्या विनाशकारी दुसऱ्या महायुद्धाचे मुख्य कारण!व्हर्सायचा तह हेच होते, हे विसरून कसे चालेल!
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
संकल्पाची भीती

संकल्पा आणि सुरेखा शाळेत जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणून प्रसिद्ध होत्या. एकमेकींच्या सावलीसारख्या सदैव एकत्र असायच्या. शाळेत मिळूनच यायच्या. एका बाकावर दरवर्षी बसायच्या. डबा एकत्र खायच्या. ज्या खेळात सुरेखा भाग घेईल त्याच खेळात संकल्पा भाग घ्यायची. वक्तृत्वाच्या स्पर्धेत संकल्पाला रस म्हणून सुरेखाही वक्तृत्व स्पर्धेत नियमाने भाग घ्यायची. दोघीजणी अभ्यास मिळून करायच्या. फिरायला, खेळायला, सिनेमा पाहायला एकत्र जायच्या. जरा दूर गेल्या की, दोघींना एकमेकींवाचून मुळीच करमायचे नाही. दोघींच्या घरचे त्यांच्या मैत्रीचे कौतुक करायचे आणि पुढे आपापल्या व्यवसायाच्या, कामाच्या, नोकरीच्या किंवा लग्नाच्या मुळे एकमेकींपासून दूर जावे लागले तर यांचे कसे होणार म्हणून काळजीही करायचे. संकल्पा खूपदा सुरेखाच्या घरी राहायला यायची. खुदुखुदू हसत दोघींच्या तासन् तास गप्पा चालायच्या. दोघी चित्रं काढायच्या, गोष्टींची पुस्तके वाचायच्या, अंगणात आंब्याच्या पारावर बसून एकाच आयपॉडमधून प्रत्येकी एक वायर कानाला लावून गाणी ऐकायच्या. सुरेखाचे अ‍ॅपेंडीसायटीसचे ऑपरेशन होते. संकल्पा रात्रभर नीट झोपली नाही. सुरेखा उठायच्या आधी ऑपरेशनच्या दिवशीही तिच्याकडे हजर झाली. आई म्हणाली, ‘सख्ख्या बहिणीची माया आहे हो तुम्हा पोरींची!’ एके दिवशी संकल्पाने रात्री आठ वाजता सुरेखाला फोन केला. तिचा आवाज जड झाला होता. शब्द ओठांतून घरंगळत होते. घसा दाटून आला होता. सुरेखाने घाबऱ्या घाबऱ्या विचारले, ‘काय झालं ग संकू? सगळं ठीक आहे ना?’ ‘नाही. सगळंच बिघडलंय!’ असे म्हणून संकल्पा हुंदके देऊ लागली. सुरेखाने फोन बंद केला. ती बाबांना म्हणाली, ‘मला संकल्पाकडे आता जायचंय. काहीतरी घडलंय. मला तिची काळजी वाटतीय..’ ती बोलत होती. बोलताना तिला धाप लागली. तिचे बोलणे पूर्ण होईपर्यंत बाबांनी स्कूटर बाहेर काढली होती. दोघे पंधरा मिनिटांत संकल्पाकडे पोहोचले. सुरेखाला पाहून तिला मिठी मारून संकल्पा रडायला लागली. रडे आवरत म्हणाली, ‘बाबांनी स्कॉटलंडला नोकरी घेतलीय. आम्ही सगळे युरोपला शिफ्ट होतोय. तुझ्याशिवाय मला मुळीच करमणार नाही. मी इथे राहाते म्हणतेय, पण बाबा तयार नाहीत.’ सुरेखा म्हणाली, ‘अगं, तू दूर गेलीस तरी आपली मैत्री तुटणार आहे का? आपण कायम एकमेकींच्या जवळच राहू मनाने!’ मित्र-मैत्रीण दूर गेल्यामुळे मैत्री संपत नाही. अर्थात हा अनुभव वेदनादायक असतो. पण मैत्रीचा शेवट नसतो. तुम्ही फोन करू शकता, इंटरनेटवर ईमेल करता येते. चॅट करता येते किंवा स्काईपवर एकमेकांना पाहाता येते. गप्पा मारता येतात, आणलेल्या नव्या वस्तू दाखवता येतात. जग खूप जवळ आहे. मनात मैत्रीची ज्योत पेटती असेल तर ती कायम तेवत ठेवता येते.
आजचा संकल्प- मला मैत्रिणीची/मित्राची आठवण आली तर त्याच्याशी लगेच संपर्क साधेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com