Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

एकाच मांडवात विविध धर्मीयांचे शुभमंगल..
नवी मुंबई प्रतिनिधी :
पुरोहित, भन्ते, मौलवी, ख्रिश्चन धर्मगुरूंची एकाच मांडवात सुरू असलेली लगबग.. वेदांसह मंत्रोच्चारांच्या सुरांना कुराण पठणाची लाभलेली साथ आणि या लग्न मंडपाच्या गोंधळातही अतिशय नीरव अशा शांततेत ख्रिश्चन जोडप्यांचे संपूर्ण सोहळ्याचे आकर्षण ठरलेल्या विवाहाने शनिवारची सायंकाळ नव वधू-वरांसह नवी मुंबईकरांनाही एक वेगळा अनुभव देऊन गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने नेरुळ येथे आयोजित केलेला हा सर्वधर्मीय आगळा-वेगळा लग्न सोहळा ‘याचि देही याचि डोळाह्ण अनुभवण्यासाठी यावेळी शेकडोंच्या संख्येने नवी मुंबईकरांनी गर्दी केली होती. या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात तब्बल ५१ जोडपी विवाहबद्ध झाली.

पनवेलमधील सावरकरांच्या पुतळ्याचे होणार सुशोभीकरण!
पनवेल/प्रतिनिधी :

‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या ‘स्वातंत्र्यवीर की अनामवीर?’ या लेखामुळेअखेर पनवेलमधील स्वा. सावकरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या लेखातून प्रेरणा घेऊन ‘वेद प्रतिष्ठान’च्या पनवेलमधील कार्यकर्त्यांनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केल्याने, तसेच केशवस्मृती पतपेढीने आर्थिक भार उचलण्याची तयारी दाखविल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण होणार आहे. रविवारी बल्लाळेश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

बेस्टची खारघरवासीयांसाठी घरपोच सेवा
५०४ क्रमांकाची बस जल-वायूविहारपर्यंत

नवी मुंबई प्रतिनिधी :
खारघर रेल्वे स्थानकापासून थेट उपनगराच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता बेस्टने खुशखबर दिली असून, वडाळ्यापासून खारघर रेल्वे स्थानकापर्यंत धावणारी बेस्टची बस आता थेट जल-वायूविहापर्यंत धावणार आहे. बेस्टने या उपनगरात अंतर्गत बससेवा सुरू करावी, यासाठी येथील रहिवासी कमालीचे आग्रही होते. अखेर सोमवारपासून बेस्टची ५०४ क्रमांकाची बस खारघरच्या गल्लीबोळात दिसू लागल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

काँग्रेसमधील तू तू-मैं मैं सुरूच!
नामदेवरावही विरोधकांवर बरसले

नवी मुंबई/प्रतिनिधी :
नवी मुंबईतील गावांलगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर झालेल्या कारवाईनंतर येथील काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू झालेली सुंदोपसुंदी दिवसागणिक वाढू लागली असून, पक्षातील बहुतेक नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या विरोधात थेट प्रातांध्यक्षांकडे धाव घेतल्यानंतर या नगरसेवकांविरोधात आता भगत समर्थकांनी बाहू सरसावले आहेत. सिडको संचालकपदावर कार्यरत असलेले नामदेव भगत निष्क्रिय असल्याचा टाहो काही काँग्रेस नगरसेवकांनीच फोडल्यानंतर भगत यांनीही शुक्रवारी सायंकाळी त्यांनी केलेल्या कामांचा पाढा पत्रकारांपुढे वाचून दाखविला.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा टळला
पनवेल/प्रतिनिधी :
पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पळस्पे फाटा येथील एका गोदामावर दरोडा टाकण्याचा तीन चोरटय़ांचा प्रयत्न फसला. खार आणि कल्याण येथील काही गुन्हेगार विशिष्ट गाडीतून येऊन पळस्पे फाटा येथील म्हात्रे गोडाऊनवर दरोडा टाकणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश भोसले यांना मिळाली. त्यानंतर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टेळे आणि अन्य पोलीस या गोदामाबाहेर सापळा रचून बसले. रात्री आठच्या सुमारास एका गाडीतून पाच व्यक्ती उतरल्या आणि एकमेकांना इशारे करीत ते सर्वजण गोदामाच्या दिशेने जाऊ लागले. त्यांचा हेतू स्पष्ट होताच पोलिसांनी चपळाई दाखवीत त्यातील तिघांना पकडले. अन्य दोघे मात्र अंधाराचा फायदा उठवत पळून गेले. सुनील कन्हैयालाल शर्मा (२१), दीपक रमाकांत उपाध्याय (२२) आणि जितेंद्र श्यामनारायण पांडे (२४) अशी या तिघांची नावे असून त्यांच्या गाडीतून दोन सुरे, दोन पकडी, हेक्सॉब्लेड, पान्हे, तीन ड्रिल मशिन्स, मिरचीची पूड, चार मोबाइल फोन्स आदी साहित्य जप्त करण्यात आले.

राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित ‘मुशायरा-काव्यसंध्या’
पनवेल/प्रतिनिधी

महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेतर्फे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित ‘मुशायरा-काव्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ७ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता गोखले सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात मराठी, हिंदी, उर्दूतील अनेक नामवंत कवी सहभागी होणार आहेत. या काव्यसंमेलनासाठी प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस एन. डी. खान यांनी केले आहे.