Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

यंदा एप्रिल आणि मेमध्ये उष्णतेचा दाह एरवीपेक्षा काहीसा अधिकच सहन केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जनतेला जून महिना सुरू होताच वेध लागले आहेत ते मान्सूनचे. त्यानुसार जूनच्या पहिल्याच दिवशी आकाशात काळ्या ढगांचे दर्शन झाल्याने मान्सूनची चाहूलही लागली, पण सकाळनंतर आकाश निरभ्र झाले आणि दुपारी पुन्हा रोजच्यासारखाच उकाडा जाणवू लागल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला.

.. आता पोलिसही असुरक्षित !
गस्तीवरील पोलिसांवर प्राणघातक हल्ला
वाढत्या गुंडगिरीने पोलीस यंत्रणा अस्वस्थ

वार्ताहर / नाशिकरोड

शहरातील वाढती गुन्हेगारी व चोऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर रविवारी रात्री जेलरोड परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुंड प्रवृत्तीच्या २० ते २५ जणांच्या सशस्त्र टोळक्याने प्राणघातक हल्ला चढविल्याने सर्वसामान्यांसह पोलीस यंत्रणाही अस्वस्थ झाली आहे. या भीषण हल्ल्यात संबंधित पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्वाची बाब म्हणजे, तीक्ष्ण हत्यारे, लाकडी दांडुक्यांनी हल्ला चढविणाऱ्या या टोळक्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे पिस्तुलही लांबविले. एवढेच नव्हे तर मोठमोठे दगड घालून त्याच्याजवळ असणाऱ्या शासकीय वाहनाची अक्षरश: मोडतोड करण्यात आली.

औषधी कंपन्यांच्या धोरणाविरोधात वैद्यकीय प्रतिनिधींचा मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

औषधे उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी अनुचित कामगार प्रथांचा अवलंब करून महिला कर्मचाऱ्यांसह सर्वाना अडचणीत आणण्याचे धोरण ठेवले असल्याचा आरोप करतानाच या कंपन्यांच्या दडपशाही विरोधात सोमवारी महाराष्ट्र सेल्स अ‍ॅण्ड रिप्रेझेंटेटीव्ह संघटनेच्या स्थानिक शाखेतर्फे येथील कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुकुंद रानडे, युनिट सरचिटणीस समीर तुळजापूरकर, मुकुंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात वैद्यकीय प्रतिनिधींच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

वेतनवाढ प्रश्नी जिल्हा बँकेचे कर्मचारी संपावर
खरिप हंगाम कर्ज, कृषी अनुदान वाटप ठप्प

प्रतिनिधी / नाशिक

वेतनवाढीच्या प्रश्नावरून नाशिक जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनने सोमवारपासून अखेर संप पुकारला असून त्यामुळे सर्व शाखांचे कामकाज पूर्णत ठप्प झाल्याचे चित्र होते. व्यवस्थापनाने दरवर्षी तीन कोटीची वेतनवाढ देण्याची तयारी दर्शविली असली तरी सव्वा चार कोटीची वेतनवाढ गेल्या २८ महिन्यांच्या फरकासह मिळाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर, सुरू झालेल्या या संपामुळे खरिप कर्ज वाटप प्रक्रिया, कृषी अनुदान वाटप अशी विविध कामे प्रभावित झाली असून त्याचा एकूणच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

नाशिक बाजार समितीविरुद्ध कारवाईसाठी उपोषण
प्रतिनिधी / नाशिक

भ्रष्टाचाराने पोखरली गेलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करावी, आर्थिक गैरव्यवहारांची जबाबदारी निश्चित करून दोषी संचालकांकडून निधीचे नुकसान वसूल करावे आणि बाजार समितीचे व्यवस्थापन निवडण्याचा अधिकार बाजार क्षेत्रातील शेतकऱ्यांना द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी बाजार समिती बचाव समितीच्यावतीने सोमवारपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

राजलक्ष्मी बँकेची शैक्षणिक कर्ज योजना
नाशिक / प्रतिनिधी

वाढत्या फीमुळे होणारी पालकांची गैरसोय टाळण्यासाठी येथील राजलक्ष्मी अर्बन बँकेने अभिनव शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली असून कर्ज वितरणही सुरू करण्यात आले आहे. जून महिन्यात पालकांना पाल्याच्या शाळा, महाविद्यालयांमधील प्रवेश, देणग्या, वह्य़ा, पुस्तके, गणवेश, फी इत्यादी खर्चाची चिंता भेडसावत असते. राजलक्ष्मी बँकेने पालकांना या चिंतेतून मुक्त करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गेल्या तीन वर्षांपासून हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या योजनेतंर्गत ५० हजार पर्यंतची कर्ज सुलभरितीने कमीत कमी कागदपत्रांवर व त्वरित दिले जात आहे. सदर कर्जासाठी तीन वर्षांची परतफेडीची मुदत आहे. तसेच दर हजारी फक्त ३६ रूपये मासिक हप्ता आहे. कर्ज वितरण पंधरवडय़ामध्ये शैक्षणिक खर्चाच्या गरजेबरोबरच टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, डीव्हीडी, फर्निचर, वाहन आदी गृहोउपयोगी वस्तुंकरिता सुलभ कर्ज योजना उपलब्ध केली आहे. या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त पालकांनी व सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर यांनी केले आहे.

‘छत्रे हायस्कूलचा निकाल शासन नियमानुसार’
मनमाड / वार्ताहर

येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल हा शासन नियमानुसारच तयार करण्यात आला आहे, अशी माहीती विद्यालय प्रशासनाने दिली आहे. या शैक्षणिक वर्षांत इयता पाचवी ते नववीच्या परीक्षेस बसलेल्या एकूण २,१४९ विद्यार्थ्यांपैकी २८२ विद्यार्थी नापास झाले. त्यामुळे माधव शेलार या पालकाने नापास विद्यार्थ्यांसंदर्भात तक्रार केली होती. शेलार यांच्या मागणीनुसार नापास असणाऱ्या २८२ विद्यार्थ्यांची माहिती नावासह त्यांना दिली आहे. तसेच सदरची माहीती गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडेही सादर करण्यात आली आहे. असे असतांना शाळेने ४०० ते ५०० विद्यार्थी नापास केल्याचा खोटा आरोप करून संस्थेची व शाळेची बदनामी केली जात आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. आजपर्यंत शालेय प्रशासनाकडे कोणत्याही पालकाने नापास विद्यार्थ्यांबाबत लेखी वा तोंडी तक्रार केलेली नाही. असा खुलासा श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे न्यू इंग्लिश स्कूलतर्फे करण्यात आला आहे. हेतू पुरस्सर किंवा आकसाने छत्रे हायस्कुलने कोणालाही नापास केलेले नसून तसे करण्याचे काही एक कारण नाही. तरी पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्रीराम एज्युकेशन सोसायटीतर्फे सचिव पी. जी. धारवाडकर व मुख्याध्यापक एस. एन. देवकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.