Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

आठवडेबाजार समान हिशेब लेखनाचा ‘नंदुरबार पॅटर्न’
वार्ताहर / धुळे

वैद्यनाथन् समितीच्या शिफारशीनुसार एप्रिल २००८ पासून राज्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे समान हिशेब लेखन पद्धतीप्रमाणे दप्तर नोंदविणे गरजेचे झाले आहे. या योजनेंतर्गत आठवडेबाजार समान हिशेब लेखन पद्धती कार्यक्रमात नंदुरबार हा जिल्हा एकमेव ठरला आहे. नंदुरबार सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक अजित मुठे यांच्या संकल्पनेतून राज्यात नंदुरबार जिल्ह्य़ाने विशेष कार्यक्रम राबविला आहे. मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्य़ातील सर्व सहकारी सेवा संस्थांमध्ये आठवडे बाजार समान हिशेब लेखन पद्धती अवलंबण्यात आली. असा कार्यक्रम राबविणारा नंदुरबार हा पहिला जिल्हा आहे. राज्याचे प्रधान सचिव, सहकार आयुक्त आणि निबंधक तसेच लेखा परीक्षण विभागाच्या नाशिक विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या सूचनांनुसार या योजनेची रुपरेषा ठरविण्यात आली. ३१ मेपर्यंत या सर्व संस्थांचे समान हिशेब लेखन पद्धतीने दप्तर लिहिण्याचे काम पूर्ण करावयाचे होते. त्यानुसार जिल्ह्य़ातील १५९ विविध कार्यकारी सहकारी संस्था व १४३ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे समान हिशेब लेखन पद्धतीने दप्तर लिहिण्याचे काम आठवडेबाजार समान हिशेब लेखन पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. शासनाचा खर्च वाचविण्याच्या दृष्टीने या योजनेंतर्गत सर्व घटक एकत्र येतील आणि त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यात येईल. यामुळे सर्वच संस्थांची दप्तरे एकसारखी असतील. यात लेखा परीक्षकांचे मोठे योगदान असणार आहे. नंदुरबार जिल्ह्य़ात ३०२ विविध कार्यकारी व आदिवासी विविध कार्यकारी संस्था आहेत तर १५ लेखा परीक्षक आहेत. मुठे यांनी प्रत्येकी २० अशा सेवा संस्थांचे कामकाज एका परीक्षकाकडे सोपविले आहे. यासाठी दैनिक भत्ता आणि प्रवास भाडे असा एकूण ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र मुठे यांनी राबविलेल्या योजनेमुळे हा खर्च केवळ चार हजार ५०० रुपये एवढाच होणार आहे. याशिवाय कामांच्या तासांचीही मोठी बचत होणार असल्याने अशा प्रकारची योजना राबविणारा हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी लेखा परीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सारेच परीश्रम घेत आहेत.

पदोन्नतीच्या कारणावरून जळगाव पालिका कर्मचाऱ्याचा उपोषणाचा इशारा
वार्ताहर / जळगाव

महापालिकेत शिपाई म्हणून कार्यरत एका कर्मचाऱ्याने शैक्षणिक पात्रता व ओबीसी प्रवर्गात असतानाही पदोन्नतीत सतत डावलण्यात येत असल्याच्या कारणावरून २२ जून रोजी महापालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. आपणावर झालेल्या अन्यायास तत्कालीन व विद्यमान आस्थापना अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. अनिल प्रभाकर नाटेकर यांच्या निवेदनानुसार फेब्रुवारी १९९३ पासून ते शिपाई या एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांना एकदाही पदोन्नती मिळालेली नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज केले, पण दखल घेतली गेली नाही. आपल्यासोबत असलेल्या परंतु नंतर रुजू झालेल्या तसेच समान शैक्षणिक पात्रता असलेल्या काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. निवेदनात नाटेकर यांनी अन्य कर्मचाऱ्यांचा दाखला दिला असून ते रुजू केव्हा झाले, त्यांची शैक्षणिक पात्रता काय व त्यांना पदोन्नती कधी मिळाली याचे विवरण दिले आहे. माहितीच्या अधिकाराखाली आपण ही माहिती घेतल्याचे नाटेकर यांचे म्हणणे असून या कर्मचाऱ्यांना आपणास डावलून पदोन्नती देण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ज्या कर्मचाऱ्यांना सेवेत सलग बारा वर्षे पूर्ण झाली त्यांना शासन निर्णय आश्वासीत प्रगती योजनेंतर्गत कालबद्ध पदोन्नती लागू करण्याचा राज्य शासनाचा स्पष्ट आदेश असताना आपणावर अन्यायच झाला आहे. अन्यायास वाचा फोडण्यासाठी आपण शांततापूर्ण मार्गाने उपोषणाचे शस्त्र हाती घेत आहोत, असे नाटेकरने म्हटले आहे.