Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

डॉ. करीर, बंड यांच्याविरोधात याचिका
पीएमपीतील हस्तक्षेपास प्रतिबंध करा

पुणे, १ जून/प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. नितीन करीर आणि विभागीय आयुक्त दिलीप बंड हे खासगी वाहतूकदारांच्या हितासाठी नियमबाह्य़ पद्धतीने पीएमपी प्रशासनाला आदेश देत असून या दोघांना पीएमपीच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध करावा, अशी याचिका राज्याच्या लोकायुक्तांकडे आज दाखल करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी ही याचिका दाखल केली असून डॉ. करीर आणि बंड यांचा पीएमपीत सुरू असलेला बेकायदेशीर हस्तक्षेप आणि त्यांच्या नियमबाह्य़ निर्णयांच्या कार्यपद्धतीबाबतची अनेक सरकारी कागदपत्र पुरावा म्हणून याचिकेसोबत जोडण्यात आली आहेत.

दोघेही ऐंशी-८०
पुणे, १ जून / खास प्रतिनिधी

हार-तोरणांची सजावट, आकर्षक रांगोळ्या, बॅन्ड-ढोलीबाजा आणि अनेक उत्साही प्रवाशांमुळे आज पुणे स्टेशनच्या एक क्रमांकाच्या फलाटावर उत्सवी वातावरण होते. कारण हजारो प्रवाशांची लाडकी ‘दख्खनची राणी’ ऐंशीव्या वर्षांत प्रवेश करणार होती, ती सुद्धा डॉ. बाबा आढाव या तिच्याच समवयस्क कार्यकर्त्यांच्या साक्षीने.. सर्व प्रवाशांच्या जल्लोषात बाबांनी केक कापला अन् दख्खनच्या राणीबरोबरच बाबांनीही ऐंशीव्या वर्षांत प्रवेश केला!

आंदोलकांनी ठोकले पालिकेला टाळे
पिंपरी, १जून / प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने गेले पाच दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची बिलकूल दखल घेतली नाही म्हणून संतप्त झालेल्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वराला आज टाळे ठोकले. त्यामुळे अधिकारी, नगरसेवकांसह सर्व नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दुपारी बारा वाजता ठोकलेले टाळे सायंकाळी पाच वाजता काढण्यात आले. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहर अध्यक्ष सुधीर जगताप यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर २८ मे पासून उपोषणाला बसले आहेत.

रस्ते, पदपथांवर व्यवसायाला बंदी; ‘फूड प्लाझा’साठी टीडीआर
विनायक करमरकर, पुणे, १ जून

महापालिका क्षेत्रात रस्ते व पदपथांवर स्थिर फेरीवाल्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाला कायमस्वरूपी बंदी करण्याबरोबरच फेरीवाल्यांच्या व्यवसाय नियोजनलाही राज्य शासनाने महत्त्व दिले आहे. विशेषत: ‘फूड प्लाझा’ साठी जागा देणाऱ्या मालकांना टीडीआर किंवा प्रोत्साहनात्मक एफएसआय देण्याचाही शासनाचा प्रस्ताव आहे.
फेरीवाला व्यवसायाच्या नियोजनाच्या दृष्टीने राज्य शासनाने धोरण निश्चित करून आदर्श उपविधी (मॉडेल बायलॉज) तयार केले आहेत. त्याची कार्यवाही सुरू करण्याबाबत सर्व महापालिका व नगरपालिकांना कळविण्यात आले आहे.

शहरातील वीजकपात महिनाभर टळली
पुण्याच्या अतिरिक्त वीजपुरवठय़ास अखेर एक महिन्याची मुदतवाढ
पुणे, १ जून/ प्रतिनिधी

पुणे व िपपरी- चिंचवड शहरात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर कंपनीकडून पुरविण्यात येणाऱ्या अतिरिक्त वीजपुरवठय़ाच्या करारास राज्य वीज नियामक आयोगाने अखेर एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. मात्र, पुढील काळात अतिरिक्त वीजपुरवठय़ासाठी कायमस्वरूपी पुरवठादार नेमावा, असे आदेश आयोगाने ‘महावितरण’ला दिले आहेत. या निर्णयामुळे शहरातील वीजकपात एक महिनाभर तरी टळली आहे. अखंड वीजपुरवठय़ासाठी लागणारी वीज घेण्यासाठी टाटा पॉवर कंपनीशी एक वर्षांचा करार करण्यात आला होता. या कराराची मुदत ३१ मे रोजी संपली. मात्र, करार संपण्यापूर्वी नव्या कराराबाबा दोन महिन्यांपासून हालचाली सुरू करणे आवश्यक असतानाही ‘महावितरण’ने केवळ १५ दिवसांपूर्वी अतिरिक्त वीजपुरवठय़ाच्या निविदा काढल्या. टाटा पॉवर कंपनीच्या कराराची मुदत संपत असल्याने नवी व्यवस्था होईपर्यंत जुन्या कराराच्या मुदतवाढीस मान्यता द्यावी, अशी मागणी ‘महावितरण’ने आयोगाकडे केली होती. मात्र, अतिरिक्त वीजपुरवठा करण्याबाबतची नवी व्यवस्था करण्यास झालेला विलंब व कायमस्वरुपी वीजपुरवठय़ाची व्यवस्था आदी गोष्टींवर चर्चा करताना आयोगाने ‘महावितरणला’च फटकारले होते. त्या वेळी करारास मुदतवाढ देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. अतिरिक्त वीज नसल्याने होणारी वीजकपात टाळण्यासाठी आज अखेर या करारास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता यापुढे तात्पुरती व्यवस्था नव्हे, तर वीज पुरवठय़ाबाबत कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे नियोजन करावे व त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश आयोगाने दिले आहेत. एकूणच या प्रक्रियेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. आता १ जुलैला टाटा पॉवर कंपनीच्या कराराची मुदत संपणार आहे. मात्र, त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजेचा वापर कमी होत असल्याने सप्टेंबरअखेपर्यंत तरी पुणेकरांना विजेची समस्या जाणवणार नसल्याचे बोलले जाते.

मिळकतकर संकलन विभागाचे दोन नवे विक्रम
पुणे, १ जून/प्रतिनिधी

मिळकत कराची रक्कम ३१ मे पर्यंत भरणाऱ्या नागरिकांना सवलत योजना जाहीर झाल्यामुळे या योजनेला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून ३१ मे अखेर १०१ कोटी आठ लाख रुपये इतका विक्रमी मिळकत कर गोळा झाला आहे. महापालिकेचे उपायुक्त आणि करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी आज ही माहिती दिली. एप्रिल व मे या दोन महिन्यांत एक लाख ९८ हजार मिळकतधारकांनी १०१ कोटी इतका कर भरला असून हा महापालिकेच्या इतिहासातील विक्रम ठरला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६१ कोटी रुपये कर गोळा झाला होता. मे अखेपर्यंत कर भरणाऱ्यांना सवलत जाहीर झाल्यामुळे शनिवारी, ३० मे रोजी एकाच दिवशी साडेसहा कोटी रुपये इतका कर गोळा झाला. एकाच दिवशी कर गोळा होण्याचा देखील विक्रम त्या दिवशी झाला. तर रविवारी, ३१ मे रोजी देखील सर्व कार्यालये कर संकलनासाठी सुरू ठेवण्यात आली होती. त्या दिवशी आठ हजार २१५ मिळकतधारकांनी चार कोटी २६ लाख कर भरला.

झाडांच्या पूजेबरोबरच त्यांचे संवर्धन आवश्यक - पुरंदरे
पुणे, १ जून / प्रतिनिधी

वडाच्या झाडापासून दुवार्ंपर्यंत सर्व झाडांची पूजा करणारा आपला समाज त्यांचे संवर्धन मात्र करीत नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज व्यक्त केली. वसुंधरा महोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे व डॉ. रोहिणी डांगे यांना आज पुरंदरे यांच्या हस्ते वसुंधरा सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वसुंधरेची मूर्ती, शाल, श्रीफळ, मानचिन्ह व तलवार असे पुरस्काराचे स्परूप आहे. यावेळी पोलीस सहआयुक्त राजेंद्र सोनवणे, जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता अॅड. सदानंद देशमुख, पोलीस उपायुक्त सतीश खंदारे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय येवले आदी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘आपल्याकडे वडाच्या झाडापासून ते दुर्वापर्यंत सर्व झाडांची पूजा केली जाते. कवितेतही झाडांचे महत्त्व सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र जंगलांविषयी समाजात अनास्था आहे. झाडांवर प्रेम केले नाही तर भविष्यात अनेक समस्या निर्माण होतील. त्यामुळे झाडे जगवण्यावर भर दिला पाहिजे. डांगे, सोनवणे, देशमुख यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. नरेंद्र निकम यांनी केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

कर्तव्य फाऊंडेशनचा दीड लाख वृक्षारोपणाचा संकल्प
पिंपरी, १ जून / प्रतिनिधी

चिंचवड येथील कर्तव्य फाऊंडेशनतर्फे शहर परिसरात दीड लाख नवीन झाडे लावण्याच्या उपक्रमाचा आज शुभारंभ क रण्यात आला. निरामय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. दिलीप कामत यांच्या हस्ते कामदा सोसायटीमध्ये चिंच व वडाची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास भाजपाचे शहर महामंत्री अॅड.सचिन पटवर्धन, महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक सुरेश साळुंखे,माजी नगरसेविका उमा खापरे, राजू दुर्गे तसेच मोरेश्वर शेडगे, प्रशांत हरहरे, माधव खोत, संजय भंडारी, संजय उपासनी, शशांक इनामदार, नानासाहेब पवार, लता खंडागळे, प्रिया पाटोळे, वंदना औटी, नंदु भोगले आदी उपस्थित होते. डॉ.कामत यांनी आपल्या भाषणात पर्यावरणाचे महत्त्व विशद करून सर्वानी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. घागरे सिडस् कंपनी मार्फ त या उपक्रमासाठी सहकार्य क रण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी साबदे यांनी तर आभार प्रदर्शन अपर्णा मणेरीकर यांनी केले.

ट्रकच्या धडकेने एक ठार
बेल्हे, १ जून/वार्ताहर

बेल्हेगावाजवळ मालवाहू ट्रकचालकाच्या बेफिकिरीमुळे झालेल्या अपघातात एकजण जागेवर ठार होऊन ट्रक खड्डय़ात उलटला. ट्रकचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. ही घटना वाडेकर वस्तीलगत घडली. या अपघातात बेल्हे येथील हलाखीचे जीवन जगणाऱ्या एका गरीब कुटुंबातील कुटुंबप्रमुखच ठार झाल्याने या कुटुंबाला जीवनसंघर्षांसाठी सावरण्याची गरज आहे. अपघातात मृत पावलेल्या या व्यक्तीचे नाव पोपट दगडू बोऱ्हाडे (वय ४८, रा.बेल्हे) असे असून, त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. पोपट दगडू बोऱ्हाडे हे त्यांच्या वाडेकरवस्ती येथील घरातून सकाळी सातच्या सुमारास बेल्हे आठवडेबाजारात रोजीरोटीच्या निमित्ताने निघाले होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर-कल्याण महामार्गालगतच्या रस्त्याने ते बेल्हेकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (एमएच-०४ सीयू-७९३०) त्यांना धक्का दिला व ते ट्रकखाली चिरडले गेले व ट्रक रस्त्यालगत असलेल्या खड्डय़ात उलटला. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची खबर संतोष दिगंबर राऊत यांनी दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, या अपघातामुळे बोराडे कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रांजणी येथे बिबटय़ाची मादी जेरबंद
मंचर, १ जून/वार्ताहर

रांजणी (ता. आंबेगाव) येथील वाकोबा मळय़ात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री दीडच्या सुमारास मादी जातीचा बिबटय़ा जेरबंद झाला. या परिसरातील दोन कुत्री बिबटय़ाने फस्त केली होती. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण पसरले होते. बिबटय़ा जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रांजणी गावाच्या दक्षिणेला वाकोबा मळा आहे. येथे उसाचे क्षेत्र अधिक आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी येथील दोन कुत्री बिबटय़ाने फस्त केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाला केली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील परिसराची पाहणी केली. तेव्हा शेतामध्ये बिबटय़ाच्या पावलाचे ठसे आढळून आले. रविवारी दुपारी वन खात्याने उसाच्या शेतात पिंजरा लावला. सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमाराला बिबटय़ा जेरबंद झाला. येथील शेतकरी पांडुरंग बाळकृष्ण वाघ यांनी ताबडतोब वन विभागाला दूरध्वनीवरून कळविले. पूर्ण वाढ झालेला, अंदाजे साडेतीन वर्षे वयाचा, मादी जातीचा बिबटय़ा असून शेपटीसहित त्याची लांबी पाच फूट असून उंची अडीच फूट असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मुरलीधर रामगुडे, वन कर्मचारी संपत भोर, सूर्यकांत खोल्लम, सावकार खिलारी यांनी बिबटय़ाला सुरक्षितपणे अवसरी घाटातील वनोद्यानात हलविले आहे.

आमदार ढमालेंच्या सचिवाविरुद्ध खुनाच्या धमकीची तक्रार
पुणे, १ जून / प्रतिनिधी

मुळशीचे आमदार शरद ढमाले यांच्या पौड येथील सभामंडप कामाच्या निधीबाबत बांधकाम विभागाकडून माहिती अधिकाराचा वापर करून माहिती घेत असल्याच्या कारणास्तव आमदार ढमाले यांचे खासगी सचिव आशुतोष जोशी यांनी पत्रकार विनायक गुजर यांना खुनाची धमकी दिली आहे. या बाबत गुजर यांनी जोशी यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुळशी तालुका पत्रकार संघाच्यावतीने याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी - पत्रकार विनायक गुजर हे पौड ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांच्या प्रभागात आमदार शरद ढमाले यांच्या निधीतून सभामंडपाचे काम चालू आहे. या निधीबाबत विनायक गुजर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून एकात्मिक बांधकाम पुणे विभागाकडे अर्ज करून माहिती मागितली होती. पुणे विभागाने गुजर यांचा तो अर्ज मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्याचवेळी जोशी यांना ही माहिती समजल्याने त्यांनी गुजर यांना भ्रमणध्वनीवरून धमकावले,‘‘ तू माझ्या कामात अडथळा का आणतो? ती माझी जागा आहे. मी काहीही करेन, तू जर माझ्या मध्ये आला तर तुला संपवून टाकीन, तुला मारेन, जिवंत सोडणार नाही’’. या घटनेचा मुळशी तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच माहिती अधिकाराच्या या अर्जाची माहिती आमदारांचे सचिव जोशी यांना ज्या अधिकाऱ्याने दिली त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे.

बारामती ते मुरुम मुक्कामी गाडी बंद झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय
सोमेश्वरनगर, १ जून/वार्ताहर

गेल्या ३० वर्षांपासून चालू असलेली बारामती ते मुरुम ही मुक्कामी गाडी बंद झाल्यामुळे येथील प्रवाशांची गैरसोय होत असल्याने सदर गाडी पुन्हा चालू करावी अशी मागणी मुरुमचे सरपंच दिनकर कदम, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी केली आहे. बारामती येथून रात्री ८.१५ ला गाडी सुटून मुरुमला येत असे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५० ला मुरुमहून गाडी बारामती जातला असे. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस बंद केल्यामुळे अपंग, वयोवृद्ध प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत लेखी निवेदन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडे दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुधीर कदम यांनी दिली. मुरुम भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बारामती येथे राहत आहेत. ही गाडी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डब्याची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळ नवनवीन उपक्रम आखून प्रवाशांना आकर्षित करीत असताना दुसरीकडे थोडे प्रवासी कमी मिळतात असे कारण सांगून प्रवाशांची जनतेची अडवणूक करीत असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.