Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

राज्य

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई होत नसल्याने लोकशाहीदिनातच आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्हाधिकाऱ्यांचा ठपका जि़ प़ मुख्याधिकाऱ्यांवर
जयंत धुळप
अलिबाग, १ जून

पनवेल तालुक्यातील कोयनावेळे ग्रामपंचायतीमधील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही सरकारी यंत्रणा हलत नसल्याने संतप्त झालेल्या रामचंद्र कदम या जागरूक नागरिकेने आजच्या लोकशाही दिनाचे कामकाज सुरू असलेल्या सभागृहातच अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वत:स पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. सभागृहात उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील गंभीर अनर्थ टळला़

चार दिवसांत १२ हाणामाऱ्या वाडा तालुक्यात गाव तंटामुक्तीचा बोजवारा
वाडा, १ जून/वार्ताहर

वाडा तालुक्यात गाव तंटामुक्त योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून, गेल्या चार दिवसांत शेतजमीन, पूर्ववैमनस्य अशा वादांतून १२ ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या आहेत. या हाणामाऱ्यांत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. वेगवेगळ्या हाणामारी प्रकरणात २५ हून अधिक जणांना पोलिसांनी गजाआड केले असून, अनेक जण फरार झाले आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील अलीकडेच सात ग्रामपंचायतींना तंटामुक्त पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले.

गस्त घालणाऱ्या पोलिसावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला
नाशिकरोड, १ जून / वार्ताहर

रविवारी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या टोळक्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवून त्यांच्याकडील शासकीय पिस्तुल पळवून नेल्याची घटना शहरातील जेलरोड परिसरात घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची अवस्था अतिशय नाजूक आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.कृष्णकांत विनायक बिडवे (४५) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

‘आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसी भूलथापांना बळी पडू नका’
उद्धव ठाकरे यांचे आवाहन
कर्जत, १ जून/वार्ताहर
‘राज्याच्या विधानसभेसाठी येत्या सुमारे शंभर ते सव्वाशे दिवसांत होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारकडून दिल्या जाणाऱ्या भूलथापांना बळी पडू नये. त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे गाफील राहू नये’, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आरोग्य सेवा अधिकारी महासंघाचा आंदोलनाचा इशारा
धुळे, १ जून / वार्ताहर

केंद्र शासनाच्या धोरणानुसार वेतन आणि अन्य भत्ते देण्याचे धोरण राज्य शासनाने यापूर्वीच अंगीकारले असले तरी त्याची अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, जिल्हा शल्यचिकीत्सक संवर्ग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मागणीसाठी आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचा गर्भित इशारा आरोग्य सेवा अधिकारी महासंघाच्या धुळे शाखेने दिला आहे. शासनाने सहावा वेतन आयोग आणि भत्ते द्यावेत तसेच वैद्यकीय अधकारी गट, एमबीबीएस यांना अपेक्षित वेतन श्रेणी नाही, महागाई भत्ता, अन्य अनुषंगिक भत्ते नाहीत, केंद्र शासनाने खास डॉक्टरांसाठी मंजुर केलेली डीएसीपीएस योजना मान्य झालेली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ३० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले तर येत्या ४ जून रोजी जिल्हा रुग्णालयात द्वारसभा तसेच काळ्या फिती लावून काम केले जाईल, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात खताची टंचाई
सावंतवाडी, १ जून/वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्यात समर्थ आणि संपूर्णा खताची मागणी असूनही तुटवडा जाणवत आहे. जिल्हा परिषद कृषी अधिकारी मात्र कागदी घोडे नाचविण्यात दंग असल्याचे बोलले जात आहे. संपूर्णा खताची सर्वाधिक मागणी असूनही पुरवठा होण्याची शक्यता कमीच असल्याने पर्याय म्हणून समर्थ, संपत्ती खतांचा पुरवठा करण्यात येईल. मात्र खरीप हंगामाला प्रारंभ होऊनही संपूर्णा, समर्थ, संपत्ती खताचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगण्यात येते. सम्राट खताचा या सर्वांना पर्याय म्हणून पुरवठा सर्वाधिक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कृषी आढावा बैठका होऊनही खतपुरवठय़ाबाबत जिल्हा प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकरी- कष्टकरी समाजाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी
चिपळूण, १ जून/वार्ताहर

केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या चांगल्या योजनांपासून शेतकरी- कष्टकरी समाज वंचित राहिला आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मागण्या मंजूर कराव्यात, असे निवेदन शेतकरी संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष अशोक जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. नव्याने केलेल्या दारिद्रय़रेषेखालील लोकांची यादी गेली तीन वर्षे झाली तरी अजूनही प्रसिद्ध झाली नाही. ही यादी तातडीने एक महिन्याच्या आत प्रसिद्ध करावी. ज्या दारिद्रय़रेषेखालील यादीमध्ये ज्यांची नावे आली आहेत, त्यांना तातडीने बीपीएलचे रेशनकार्ड मिळावे, यादीत खऱ्या अर्थाने ज्यांची नावे असणे आवश्यक आहेत, अशी कित्येक लोक त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे यादी सव्‍‌र्हे परत करावा, कोकणातील आंबा- काजू बागायतदारांना कलमामागे पाच हजार रुपये तातडीने द्यावेत, शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करण्याची घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली होती, परंतु अद्यापही थकित व चालू कर्ज पूर्णपणे माफ झालेली नाहीत. त्यामुळे ही कर्जे माफ करावीत, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.