Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

क्रीडा

विश्वचषकातील सत्तेसाठी भारताला ‘डाव्यां’चा पाठिंबा
लंडन, १ जून/पी.टी.आय.

ट्वेन्टी-२० किंवा मर्यादित षटकांच्या सामन्यांचा गत इतिहास पाहता या खेळावर डाव्यांचेच वर्चस्व दिसते. त्यामुळेच पुढील आठवडय़ात येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेवर डावखुऱ्या खेळाडूंचा अधिक भरणा असणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेचेच वर्चस्व राहील असे दिसते आहे. कारण या दोन्ही संघांमध्ये १५ पैकी ८ खेळाडू हे डावखुरे आहेत. पहिली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा तसेच आय.पी.एल. स्पर्धावर एक दृष्टीक्षेप टाकल्यास या स्पर्धा डावखुऱ्या खेळाडूंनीच गाजविल्याचे दिसते.

इंग्लंडमधील बदलते हवामान भारतीय संघाच्या पथ्यावर?
लंडन, १ जून / वृत्तसंस्था

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आजवरच्या कारकीर्दीत दैवाने नेहमीच साथ दिली आहे. चारच दिवसांनी चालू होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतही दैव धोनी याला नेहमीप्रमाणे साथ देणार असल्याचे दिसते. सध्या इंग्लंडच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. गेले दोन आठवडे येथे प्रखर सूर्यप्रकाश पडतो आहे. या बदलत्या हवामानाचा धोनीच्या संघाला चांगलाच फायदा होईल, असे बोलले जात आहे. इंग्लंडमध्ये नेहमी ढगाळ हवामान असते. अशा ढगाळ हवामानाचा मध्यमगती गोलंदाजांना फायदा होतो, असे नेहमीच दिसून आले आहे. या वेळी इंग्लंडमधील ढग गायबच झाले आहेत.

पेस-ड्लौही उपान्त्य फेरीत; भूपतीचे आव्हान संपुष्टात
पॅरिस, १ जून / पीटीआय

भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत आपला सहकारी ल्युकास ड्लौही याच्यासह उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. एकीकडे महेश भूपती व मार्क नोल्स यांना पराभव सहन करावा लागलेला असताना पेस-ड्लौहीच्या रूपात या स्पर्धेतील भारताचे आव्हान अद्याप जिवंत आहे. तृतीय मानांकित पेस व ड्लौही यांनी ब्रुनो सोरेस व केव्हिन उलिट यांना ६-२, ७-६ (५) असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

संघर्षपूर्ण लढतीनंतर फेडरर उपान्त्यपूर्व फेरीत दाखल
पॅरिस, १ जून / एएफपी

पहिले दोन सेट गमाविल्यानंतर राफेल नदालच्या वाटेवर जात असलेल्या रॉजर फेडररला नंतरच्या तीन सेटमध्ये सूर गवसला आणि जर्मनीच्या टॉमी हासला पराभूत करीत त्याने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टॉमी हासविरुद्धच्या या संघर्षपूर्ण सामन्यात फेडररने ६-७ (४-७), ५-७, ६-४, ६-०, ६-२ असा विजय मिळविला. आपल्या कारकीर्दीत इतर तीन ग्रॅण्डस्लॅम विजेतीपदे मिळविणारा मात्र फ्रेंच ओपन विजेतेपदापासून अद्याप दूर असलेल्या फेडररला उपान्त्यपूर्व फेरीत अँडी रॉडिक व गेल मॉनफिल्स यांच्यापैकी एकाशी झुंजावे लागेल.

या संघांना कमी लेखू नका!
लंडन, १ जून/ पीटीआय

क्रिकेट म्हटलं की डोळ्यासमोर येतात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे काही ‘दादा’ संघ. यांच्यामधूनच कोणीतरी ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावेल, अशी भाकीते सारेजण करीत आहेत. त्यामुळे र्आयलंड, स्कॉटलंड किंवा नेदरलॅंडसारख्या संघांकडे बऱ्याच जणांचे दुर्लक्ष होत आहे. या छोटय़ा संघांना मोठे संघ साखळी फेरीतच गारद करतील असे म्हटले जात आहे.

पदकविजेत्या मुष्टियोद्धय़ांना अनोखी भेट
शालान्त परीक्षेस न बसता उत्तीर्ण
नवी दिल्ली, १ जून/ पीटीआय
कनिष्ठ गटाच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या भारतीय खेळाडूंना संबंधित शिक्षण मंडळाने अनोखी भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेस न बसता त्यांना शालान्त परीक्षा उत्तीर्ण जाहीर केले आहे. रौप्यपदक विजेता संदीप सिंग (४६ किलो), ब्रॉन्झपदक विजेते शिव थापा (५२ किलो), नमित बहादूर (५० किलो), विकास खत्री (५४ किलो) या खेळाडूंचे आज येथे आगमन झाले.

हरिश तावडे, लता पांचाळ आणि अनिल पाटील यांनी गाजविला दुसरा दिवस
राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी
पनवेल, १ जून /क्री.प्र.
हरिश तावडे, संदीप पाटील यांच्या तुफानी चढायांना संदीप घुरगेच्या भक्कम बचावाची मिळालेली साथ यांच्या बळावर महाराष्ट्र पोलिस संघाने आज आर्मी दिल्ली संघाचा ४०-१८ असा पराभव केला आणि राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेत मोठीच खळबळ उडवून दिली. हरिश तावडेने अफलातून चढाया केल्या.

बाद फेरी गाठणे हे बांगलादेशचे उद्दीष्ट
ढाका, १ जून/ वृत्तसंस्था

ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत बाद फेरी गाठणे हे आमच्या संघाचे पहिले लक्ष्य असेल, असे बांगला देश संघाचे व्यवस्थापक जेम सिडन्स यांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत दोन वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी २० विश्वचषक स्पर्धेत बांगला देश संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळविला होता. त्या स्पर्धेत बांगला देशला मिळालेला तो एकमात्र विजय होता. त्याआधी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगला देश संघाने सुपर सिक्स गटात धडक मारुन सर्वानाच आश्चर्यचकित केले होते. या पाश्र्वभूमीवर दुसऱ्या ट्वेन्टी २० विश्वचषक स्पर्धेत बांगला देश संघाबाबतच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ट्वेन्टी -२० सामन्यांत कोणत्याही बलाढय़ संघाला पराभूत करण्याची आमच्या संघात क्षमता आहे, असे सिडन्स यांनी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

तायक्वांदोपटू अविनाश पांचाळला सुवर्णपदक
बीड, १ जून/ वार्ताहर

राष्ट्रीय ज्युनियर व सिनियर खुल्या तायक्वांदो स्पर्धेत तायक्वांदोपटू अविनाश पांचाळ याने चमकदार कामगिरी करून सिनियर गटात पहिल्यांदाच राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले असल्याची माहिती राष्ट्रीय प्रशिक्षक अविनाश बारगजे यांनी दिली. बीडचा तायक्वांदोपटू अविनाश पांचाळ याने नांदेड येथे गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम येथे सहाव्या राष्ट्रीय ज्युनियर व सिनियर खुल्या तायक्वांदो स्पर्धेत फीन वजनी गटात ३६० स्पर्धकांमध्ये सर्वप्रथम स्थान पटकावून महाराष्ट्राला सुवर्णपदक पटकावून दिले. तसेच कृष्णा उगलमुगले याने रौप्यपदक तर जेशल बुद्धदेव व अनिल गायकवाड यांनी कांस्यपदके जिंकली. अविनाशने यापूर्वी व्हिएतनाम व इराण या दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर त्याने यापूर्वी शालेय स्पर्धेत दोन वेळा तर ज्युनियर स्पर्धेत एक असे तीन सुवर्णपदके पटकाविलेले आहेत.

न्यूझीलंडचे भारतापुढे १७१ धावांचे आव्हान
लॉर्ड्स, १ जून/ वृत्तसंस्था
येथे सुरु असलेल्या ट्वेन्टी-२० सराव सामन्यात न्यूझीलंडने भारतापुढे १७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने नाणेफक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि इशांत शर्माने ब्रॅन्डन मॅक्यूलम (३१) आणि जेसी रायडर (२) यांना तंबूत धाडून कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले, त्याने सामन्यात २५ धावांमध्ये चार विकेट्स घेतल्या. पण त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि याचाच फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी उचलला. रॉस टेलरने दोन षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर सर्वाधिक ४१ धावा फटकाविल्या. त्याला स्कॉट स्टायरीस (२९), नॅथन मॅक्यूलम (१८) आणि जेम्स फ्रॅन्कलीन (२७) यांनी जलदगतीने धावा जमवत चांगली साथ दिली. सराव सामन्यात प्रयोग करण्याचे भारतीय संघाने ठरविले असून चार मध्यमगती गोलंदाज, तसेच रवींद्र जडेजा आणि प्रज्ञान ओझा यांना संधी देण्यात आली. तर सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाची बांगलादेशवर मात
नॉटिंगहॅम, १ जून/वृत्तसंस्था

येथे झालेल्या आयसीसी वर्ल्ड ट्वेन्टी-२० सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ३८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद २१९ धावा काढल्या. बांगलादेशने २० षटकांत ७ बाद १८१ धावसंख्येपर्यंत मजल मारली. वॉटसन (२३ चेंडूत ५२ धावा) आणि ब्रॅड हॅडीन (२९ चेंडूत ४७ धावा) यांनी ऑस्ट्रेलियाला ८.१ षटकांत १०० धावांची सलामी दिली. क्लार्कने १८ चेंडूत ३५ धावा फटकावून या शतकी सलामीवर २१९ धावांचा डोंगर उभा केला. सायमंडसने ३ षटकारांसह १४ चेंडूत २७ धावा फटकाविल्या. प्रत्युत्तर देताना शकिब अल हसनने २९ चेंडूत ५४ धावा फटकावून बांगलादेशचे आव्हान जिवंत ठेवले होते. महतदौल्लाने २५ चेंडूत ३१ धावा काढून त्याला साथही दिली. पण ऑस्ट्रेलियाचे २२० धावांचे आव्हान त्यांच्यासाठी मोठेच ठरले.