Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मासुंदा तलाव सुशोभीकरण
हेरिटेज समितीने केला होता सुशोभीकरणास विरोध
मनसेकडून सह्यांची मोहीम
ठाणे/प्रतिनिधी

शिवसेना नेत्यांच्या आग्रहाखातर सुमारे चार कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या मासुंदा तलाव

 

सुशोभीकरणाच्या नावाखाली धूळफेक केली जात असून, त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मासुंदा तलावावर सह्यांची मोहीम राबवून या कामातील घोटाळ्याबाबत मनसेने जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान, तलावाच्या सुशोभीकरणाच्या काही भागास हेरिटेज समितीने विरोध दर्शविल्यामुळे मूळ प्रस्तावात बदल करण्यात आल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे.
‘जुन्या दगडांची नवी धूळफेक’ या मथळ्याखाली ‘ठाणे वृत्तांत’ने मासुंदा तलाव सुशोभीकरणातील गडबडींचा भांडाफोड केल्यानंतर अनेक त्रुटी बाहेर येऊ लागल्या आहेत. ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता नितीन पवार यांनी पालिकतर्फे केलेल्या खुलाशात सुशोभीकरणाच्या मूळ प्रस्तावास हेरिटेज समितीने विरोध दर्शविला होता. मात्र हा प्रस्ताव शिवसेना नेत्याच्या आग्रहाखातर मंजूर करण्यात आल्याने, समितीचे म्हणणे ऐकून मूळ प्रस्तावात बदल करण्यात आले. त्यानुसार कोलोनेड्स व कमानी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने नागरिकांसमोर दाखविलेले सुशोभीकरणाचे मूळ चित्र बदलणार आहे. ही माहिती जनतेसमोर उघड करण्यात आली नव्हती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने सारवासारव करण्याच्या प्रयत्नात कामातील त्रुटी उघड केल्या आहेत. या तलावाभोवताली असलेल्या भिंतीचा लाल रंगाचा (कुंभारहळ) दगड हा मौल्यवान दगड असल्याने व वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून सुंदर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मात्र हा दगड किती मौल्यवान व जुना आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. वास्तविक नवा कठडा बांधताना तो मुळापासून बांधणे आवश्यक असताना केवळ वरचेवर का बांधला जात आहे, याचे उत्तर दिलेले नाही. असे वादग्रस्त प्रश्न उपस्थित झाले असताना, प्रशासनाने तीन कोटी ९६ लाख रुपयांच्या खर्चाला कात्री लावली असल्याचे म्हटले आहे. मग स्थायी समितीने तीन कोटी ५५ लाख रुपयांना मंजुरी दिली असता, सर्वसाधारण सभेत या योजनेची किंमत तीन कोटी ९६ लाखांपर्यंत कशी काय पोहचली, असा प्रश्न अनुत्तरित आहे. मूळ प्रस्तावातील काही कामे कमी झाल्यानंतर खर्चात कपात अपेक्षित असताना, खर्चाची रक्कम कायम ठेवण्यात आलेली आहे. हा तलाव भाडेतत्त्वावर खासगी संस्थेला दिला असताना, त्याच्या सुशोभीकरणावर सुमारे चार कोटी रुपये खर्च कशासाठी केले जात आहेत? हे काम शिवसेनेच्या एका नगरसेवकाने घेतले असल्याने उघडपणे विरोध केला जात नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. सॅटिसच्या प्रकल्पाप्रमाणे तलाव सुशोभीकरणामधील सदोष कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रसने आवाज उठविला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनजागृतीसाठी सह्णाांची मोहीम हाती घेतली आहे. मनसेच्या रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभागाचे शहर संघटक पी.जी. पवार यांनी रविवारी प्रशासनाचा निषेध नोंदवीत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला जाब विचारला आहे. यात राजन राजे, राजेश गडकर, सुरेश कोलथे, जयेश धनावडे, राजा वाघ, संतोष भोसले, राजेश बागणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.