Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेवटी आमदारांना आली जाग..
सॅटिसला मुहूर्त जूनअखेरचा
ठाणे/प्रतिनिधी

आधी जानेवारी, मग मार्च.. कालांतराने मे अन् आता जूनअखेर. सॅटिस प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे मुहूर्त

 

अनेकवेळा पुढे गेले. कामाच्या ढकलपंचीमुळे ठाणेकरांच्या त्रासात भर पडली. त्यातच या प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. शेवटी आमदार एकनाथ शिंदे यांना एकदाची जाग आली आणि त्यांनी आज या प्रकल्पाची पाहणी केली. सॅटिस प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून जूनअखेर हे काम पूर्ण होईल, असा दावा आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर स्मिता इंदुलकर यांनी आज केला.
ठाणे रेल्वे स्टेशन परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प अर्थात सॅटिस प्रकल्प कधी खुला होणार, याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पालिका आयुक्तांनी यापूर्वी जानेवारी, मार्च व मेअखेर अशा तारखा जाहीर करूनही प्रकल्पाचे काम अद्याप सुरू आहे. त्यातच या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर स्मिता इंदुलकर आणि पालिका विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी आज सॅटिस प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सभागृह नेते पांडुरंग पाटील, स्थायी समिती सभापती चंद्रगुप्त घाग, नगरसेवक अशोक वैती आदी उपस्थित होते.
माणसांची सततची वर्दळ, फेरीवाल्यांचा उच्छाद आणि आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांकडून रात्रीच्या कामात येणारे अडथळे, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे प्रकल्पाचे काम करण्यात अनंत अडचणी येत आहेत. मात्र या महिनाभरात उर्वरित काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, अजरामजी चौक परिसरातील काम पूर्ण करण्यास तीन आठवडे लागतील, तर स्टेशन परिसरात स्लॅब टाकण्याचे व काही पार्ट जोडण्याचे काम बाकी असून हे पाच टक्के काम जूनअखेपर्यंत पूर्ण होईल, असे नगर अभियंता के. डी. लाला यांनी सांगितले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा प्रकल्प जूनअखेर पूर्ण होईल आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा आमदार शिंदे यांनी केला. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना तेथून हटविण्यासाठी आणि ते पुन्हा बसणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी उद्याच आपण आयुक्तांशी चर्चा करणार असून, या ठिकाणी प्रभाग अधिकारी कायमस्वरूपी नियुक्त केला जाईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच दर आठवडय़ाला आपण स्वत: या कामाच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.