Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शुक्ल यांच्या अटकेवरून भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती
डोंबिवली/प्रतिनिधी -
भाजपचे नगरसेवक मोहन शुक्ल यांना पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी रविवारी रात्री अटक करण्यात आल्याने भाजपच्या प्रदेश नेत्यांनी काल रात्री साडे अकरा वाजता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची झाडाझडती केल्याचे समजते. सोमवारी जबाबदार

 

पदाधिकाऱ्यांना प्रदेश नेत्यांनी मोहन शुक्ल अटकेप्रकरणी चर्चेसाठी बोलाविले आहे.
गेल्यावर्षी मोहन शुक्ल हे नेहरू मैदान प्रभागातून पोटनिवडणुकीतून विजयी झाले आहेत. ते अबकारी विभागातून निवृत्त झाले आहेत. एक जुने डोंबिवलीकर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शुक्ल यांना अन्य पक्षांनीही आपल्या पक्षात या म्हणून ऑफर दिल्या होत्या, पण त्या ऑफर धुडाकावून भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मोहन शुक्ल हे गेल्यावर्षी भाजपमध्ये दाखल होऊन पक्षाचे नगरसेवक झाले होते. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून पालिकेत त्यांनी अल्पावधीत प्रतिमा तयार केली होती.
भाजपच्या ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोहन शुक्ल यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना शुक्ल यांची पाठीमागची माहिती नव्हती का? त्यांच्यावर काही आरोप आहेत, याची कुणकुण पक्ष पदाधिकाऱ्यांना कशी नव्हती, अशी भूमिका भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मोहन शुक्ल यांच्या अटकेमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते, अशी भूमिका प्रदेश पदाधिकाऱ्यांनी घेऊन, अशाप्रकारची माणसे तुम्ही जर पक्षाला जोडत असाल, तर पक्षाचे खच्चीकरण तुम्हीच करीत आहात, असे प्रदेश पदाधिकाऱ्याने एका स्थानिक पदाधिकाऱ्याला सुनावल्याचे समजते.
दरम्यान, जे पदाधिकारी मोहन शुक्ल यांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यास पुढे होते, तेच आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. शुक्ल यांच्या अटकेमुळे या इच्छुकांचे पत्ते कट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत या इच्छुकांचा शुक्ल प्रकरणात नाहक बळी जाण्याची शक्यता पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्ल अटक प्रकरण घडल्याने स्थानिक पदाधिकारी गप्प बसले आहेत. खासगीत एका स्थानिक पदाधिकाऱ्याने नेत्यांनी आम्हाला झापल्याचे मान्य केले आहे.