Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सर्वच महापालिकांना मंदीचा फटका!
जकात उत्पन्नात मोठी घट
ठाणे/प्रतिनिधी

जगभरात सुरू झालेल्या मंदीची झळ राज्यातील प्रमुख महापालिकांना देखील बसली असून, पालिकांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या जकातीच्या उत्पन्नात घट आली आहे. राज्यातील जकात रद्द करावी, अशी मागणी एकीकडे होत असताना त्याच्या उत्पन्नात घट झाल्याने उत्पन्नाच्या

 

अन्य मार्गाचा महापालिकांना विचार करावा लागत आहे.
निवडणूक आचारसंहिता संपल्याने सगळ्याच पालिकांचे अर्थसंकल्प मंजुरीचे काम आता सुरू झाले आहे. जकातीचे घटते उत्पन्न ही मुख्य बाब या महापालिकांना चिंतेत टाकत आहे. जागतिक मंदीची झळ राज्यात खऱ्या अर्थाने ऑक्टोबरपासून बसायला सुरुवात झाली. सर्व महापालिकांचे उत्पन्न ऑक्टोबरपासून कमी होत गेले. त्यातच या वर्षभरात मनसेचे झालेले आंदोलन, २६ नोव्हेंबरचा मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला, वाहतूकदारांचा संप, अशा अनेक गोष्टींचा परिणाम जकातीच्या उत्पन्नावर झाला. याबरोबर लोकसभेच्या निवडणुकांसाठी अनेक महापालिकांचे कर्मचारी मार्च महिन्यापासून जुंपले गेले, त्यामुळे कमी कामगारांना सोबत घेऊन जकात वसुलीचे उद्दिष्ट साध्य करावे लागले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात टेल्को कंपनीच्या जकातीचा मोठा वाटा आहे. मंदीचा फटका या महापालिकेला बसला आहे. सन २००७-०८ साली ७७८ कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न पिंपरी-चिंचवडला मिळाले होते, तर २००८-०९ साली या उत्पन्नात ६१ कोटींची घट आली. ७१७ कोटी ६८ लाख रुपये या वर्षांत जकात खात्याला मिळाले. शेजारील पुणे महापालिकेलाही मंदीचा फटका बसला आहे. २००७-०८ साली ७६२ कोटी ७७ लाख रुपयांचे जकातीचे उत्पन्न पुण्याला मिळाले होते. ऑक्टोबरपासून त्यांच्याही उत्पन्नात घट झाली आणि मार्च २००९ अखेर ३१ कोटींची घट आली. आता ७५९ कोटी ६० लाख रुपयेच पुणे महापालिकेला मिळू शकले. नाशिक महापालिकाही मंदीच्या तडाख्यातून वाचलेली नाही. मार्च २००८ अखेर ३७० कोटी २० लाख रुपये नाशिक महापालिकेला मिळाले. यावर्षी ६७ लाखांची उत्पन्नात घट आली. ठाणे महापालिकेने जकातीतून २००७-०८ साली ३३६ कोटीचे उत्पन्न मिळवले, तर यावर्षी ३६५ कोटींचे उद्दिष्ट जकात विभागाला देण्यात आले होते. मंदीच्या काळात ही उद्दिष्टपूर्ती होणे अशक्य होते. मार्च २००९ अखेर जकातीचे उत्पन्न ३४२ कोटींपर्यंत पोहचू शकले. वास्तविक २००७-०८ पेक्षा २००८-०९ चे उत्पन्न दीड टक्क्याने जास्त आहे. ठाणे महाापलिकेने १३९ कंपन्यांना कच्चा मालावरील जकातीत सवलत दिली आहे. नवीन बायपास झाल्याने पालिकेच्या मार्गस्थ दाखल्यात तूट येऊ लागली आहे. जकातीसाठी स्वतंत्र उपायुक्त नेमला, मात्र पूर्ण वेळ जकातीचे काम त्याला सहा महिन्यांपूर्वी देण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या जकातीच्या उत्पन्नाची आकडेवारी सर्व महापालिकांपेक्षा मोठी असते. २००७-०८ साली चार हजार २१४ कोटींचे उत्पन्न मुंबई महापालिकेला जकातीमधून मिळाले. मार्च २००९ अखेर उत्पन्नात २९ टक्क्यांची तूट आली.
मुंबई महापालिकेला इंडियन पेट्रोकेमिकल्स, बीपीसीएलसारख्या तेल कंपन्यांकडून पावणेदोन हजार कोटींचे उत्पन्न दरवर्षी मिळते. ठाणे जिल्ह्णाातील मीरा-भाईंदर, भिवंडी तसेच उल्हासनगर या महापालिकांनी जकातीचे खासगीकरण केले आहे.
जकात खासगीकरणाने तेथील व्यापारी, व्यावसायिक नाराज असून, जकातीची सक्ती त्यांच्यावर होत आहे. मंदीच्या काळात जकातीचे उत्पन्न घटत असताना खासगी कंत्राटदार जकातीचा ठेका चालवण्यासाठी पुढे कसे येणार, हादेखील प्रश्न आहे.