Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

येऊरच्या विवेकानंद बालकाश्रमातील मुलांचे भविष्य अंध:कारमय?
ठाणे/प्रतिनिधी :
येऊर येथील सद्गुरू सेवा मंदिर संचालित विवेकानंद बालकाश्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शासन मालकीची ही जमीन परस्पर विक्री करण्यात आली

 

असून, राजकीय दबावापोटी पालिकेनेही हा आश्रम अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई केली आहे, त्यामुळे या आश्रमातील मुलांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनाथ आदिवासी मुलांचा उत्कर्ष व्हावा यासाठी सद्गुरू सेवा मंदिराच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक विश्वस्थ भ.कृ. पटवर्धन, श्री. सिनकर व तारे आदींनी येऊर येथे विवेकानंद बालकाश्रमाची स्थापना केली. ही जागा प्रॉव्हिडंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या मालकीची असून, यातील सव्र्हे नं. ७/१८ या जमिनीवर मालक म्हणून महाराष्ट्र शासनाचे नाव लावले आहे. पालिका स्थापन होण्यापूर्वी सन १९८०-८१ मध्ये या बांधकामास माजिवडा ग्रामपंचायतीने कर आकारणी केली असून, पालिकाही या बांधकामास अधिकृत कर आकारणी करीत आहे. असे असतानाही गेल्याच आठवडय़ात अचानक हे बांधकाम अनधिकृत ठरवून पालिकेने तोडले. ही कारवाई राजकीय दबावापोटी करण्यात आली असून, त्यामागे राष्ट्रवादीचे मनोज प्रधान असल्याचा आरोप आश्रमाचे कार्यकारी विश्वस्त प्राची कसबेकर व मनीष राहाणे यांनी केला आहे.
या जमिनीचा काही भाग सरकारच्या नावावर असतानाही ती परस्पर विकण्यात आली आहे. सुमारे ४२ लाखांना ही जमीन विलास पाटील यांना विकण्यात आली असून, त्याचा करारनामाही झाला आहे. पाटील हे प्रधान यांचे जिवलग मित्र असून, तेच हा आश्रम बंद पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोपही कसबेकर यांनी केला.
यासंदर्भात मनोज प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता, या आश्रमाच्या वादाशी आपला कसलाही संबंध नसून, मी कोणताही व्यवहार केलेला नाही. कसबेकर आणि राहाणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा आरोपही प्रधान यांनी केला, तर सदर जागा कोणाच्या नावावर आहे हे आम्हाला माहीत नाही, शहर विकास विभागाने सव्र्हे करून अनधिकृत बांधकामांची जी यादी आम्हाला दिली, त्यात या आश्रमाचे नाव होते, म्हणून आम्ही कारवाई केली, असे वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मनीष जोशी यांनी सांगितले.