Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाळी अपघात रोखणारी नऊ सूत्रे
ठाणे/प्रतिनिधी

पावसाळा आला की वाहने घसरून होणाऱ्या अपघातात वाढ होत असते. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी नऊ सूत्रांवर लक्ष देऊन वाहन हाकण्याचे आवाहन

 

वाहन चालकांना केले आहे; अन्यथा विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्याची तयारी केली आहे.
पावसाळ्याच्या कालावधीत अनेक कारणांमुळे रस्त्यावरून वाहनांच्या घसरण्याचे प्रमाण वाढत असते. ते टाळण्यासाठी वाहन चालकांनीच दक्षता घेणे अत्यंत गरजेचे ठरते. पावसाळ्यात रस्त्यावर होणारा वंगणमिश्रित चिखल, रस्त्यावर पडणारे खड्डे, तुंबणारे पाणी या कारणांमुळे गाडी घसरते. समोरील वाहन न दिसल्याने टक्कर होण्याचे प्रकार वारंवार होऊन अपघात होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून वाहन चालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याची नऊ सूत्रे वाहतूक पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी सांगितली आहेत.
त्यात सर्वप्रथम वाहनांचे सर्व टायर सुस्थितीत आहेत का याची खात्री करावी, ब्रेक व ब्रेक लायनर तपासावे, वाहनांना वायपर लावून घ्यावेत, वाहनाचे हेड लाईट, ब्रेक लाईट, टेल लाईट तपासावे, लाईट कव्हर्स स्वच्छ करावा, शक्य असल्यास फॉग लाईट लावून घ्यावेत. महामार्गावरून वाहने जास्तीत जास्त ४० कि.मी. ताशी या वेगाने चालवावीत, दुचाकीस्वारांनी आवर्जून हेल्मेटचा वापर करावा, पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये वाहन चालविताना सायलेन्सरमध्ये तसेच इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने रस्त्यात बंद पडतात. हे होऊ नये याकरिता शक्यतो साचलेल्या पाण्यात वाहने चालवू नयेत. त्याऐवजी पर्यायी रस्ता वापरावा आणि शक्यच नसेल तेथे वाहन लो गिअरमध्ये ठेवून अॅक्सिलेटरचा वापर करत वाहन चालवावे. या सूत्रांची माहिती व्हावी म्हणून सूचना फलक अपघातप्रवण भाग, महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर लावण्यात येणार आहेत.
या नऊ सूत्रांचे वाहन चालकांनी योग्य पालन केल्यास अपघात होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. याकरिता पावसाळ्याच्या कालावधीत वाहतूक शाखेकडून विशेष मोहिमा आखून ज्या वाहनांस वायफर, हेड लाईट, टेल लाईट, ब्रेक लाईट, रिफ्लेक्टर नसेल, त्याचप्रमाणे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.