Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हायटेक स्वप्न.. हायटेक गाडी
कल्याण/प्रतिनिधी -
मी हायटेक, माझी गाडी हायटेक आणि माझ्या महापालिका हद्दीतील जनता अधिक हायटेक कशी होईल, त्यांना हायटेक सुविधा कशा मिळतील, यादृष्टीने मी महापालिकेला हायटेक करण्याचा संकल्प सोडला आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत शहरातील १३ लाख लोकांना

 

त्याचे चित्र पाहण्यास मिळेल, असे स्थायी समितीचे सभापती वामन म्हात्रे यांनी सांगितले.
कर्नाटकात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्य विकासाची हायटेक स्वप्ने पाहिली म्हणून त्यांचे शहर, राज्य आज हायटेक म्हणून ओळखले जाते. काही बदल, सुधारणा करायच्या असतील तर खर्च असतो, टीका ही सहन करावीच लागते. त्यामुळे ती सहन करत आपण शहर विकासाची स्वप्ने पाहात आहोत. पण त्यासाठी आपणही सुसज्ज असणे आवश्यक आहे, म्हणून मी माझ्या गाडीत देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी माझ्या शहरात, महापालिकेत काय चालले आहे हे पाहण्याची सुविधा बसवून घेतली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी काही पेचप्रसंग उपलब्ध झाल्यास पोलिसी सायरन, अनाऊन्समेंट सिस्टीम मी गाडीत बसून घेतली आहे. सुमारे ५०० ते ६०० चॅनलची व्यवस्था असलेला टीव्ही गाडीत आहे. आपल्या गाडीच्या पाठीमागे काय चालले आहे किंवा गाडीमागून कोणी पाठलाग वगैरे करत आहे का, कोणी अपघात करून पळत असल्यास त्याचा पाठलाग करण्यासाठी याचा इशारा देणारे कॅमेरे, माहिती देणारी यंत्रणा आपण गाडीत बसून घेतली आहे. ही यंत्रणा माझ्या गाडीत असली तरी नागरिकांची सोय, नागरी हिताचा विचार करून मी माझ्या गाडीत बसून घेतली आहे. यामध्ये माझा कोणताच स्वार्थ नाही. सुमारे दोन ते अडीच लाखांची ही यंत्रणा आहे.
माझ्या सभापतीपदाच्या कारकीर्दीत पालिका अधिकाधिक हायटेक करण्याचे माझे स्वप्न आहे. लॅपटॉप हा त्यामधील एक प्रकार आहे. टीकाटिप्पणी, काहींचे उघड, लपून जोडे खात, वर्तमानपत्रांचा पाठलाग सहन करत मी कोणत्याही परिस्थितीत अल्पावधीत का होईना, माझे शहर विकासाचे स्वप्न शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीत उतरविणार आहे. गाडी हायटेक हा त्यामधील एक भाग आहे.