Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गंभीरराव यांच्या मनमानीला कंटाळून नाराज शिवसैनिक मनसेच्या वाटेवर!
डोंबिवली/प्रतिनिधी

शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख शरद गंभीरराव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पेंडसेनगर परिसराचे विभागप्रमुख राजेश तोंडापूरकर यांनी पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. तोंडापूरकर यांच्या राजीनाम्यामुळे अन्य नाराज शिवसेनेचे कार्यकर्ते,

 

पदाधिकारी मनसे व अन्य पक्षांच्या वाटेवर असल्याचे समजते.
तोंडापूरकर यांनी म्हटले आहे, कोणत्याही निर्णयप्रक्रियेच्या वेळी आम्हाला सामावून घेतले जात नाही. शहरप्रमुख हे फक्त मनमानी पद्धतीने कारभार पाहात आहेत. त्यांच्या या कारभारामुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन होत आहे. पक्षाची ताकद कमी करण्याचे काम शहरप्रमुख करीत आहेत. शहरप्रमुख एकदम निष्क्रिय झाल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे अवघड झाल्याने मी विभागप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. अन्य विभागप्रमुखही अन्य पक्षांच्या वाटेवर असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
दरम्यान, शहरातील शिवसैनिक, नगरसेवकांच्या चर्चेतून समजते, गंभीरराव हे फक्त विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळते की नाही, एवढाच ध्यास घेऊन काम करीत आहेत. त्यांचे आता पदाकडे अजिबात लक्ष नाही. फक्त त्यांची ही भूमिका अजून पक्ष नेतृत्वाच्या कशी लक्षात येत नाही, याविषयी शिवसैनिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. फक्त जयंत्या, होर्डिग्ज लावून प्रसिद्धी मिळवणे हा एकमेव कार्यक्रम शहरप्रमुखांनी हाती घेतला आहे. कोणतेही लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्याची त्यांची इच्छा नाही. शाखेशी निष्ठा असणारी चांगली माणसे त्यांनी आपल्या स्वभावामुळे तोडल्याने शाखेकडे आता पहिल्यासारखे कोणी फिरकत नाही. त्यामुळे शाखेतील कुरबुरी दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. त्याचे दुष्परिणाम लवकर शिवसेना पक्षाला भोगावे लागणार आहेत. अशाच प्रकारचा शहरप्रमुखांचा कारभार सुरू राहिला तर बालेकिल्ला एकदम ढासळल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसैनिकांनी सांगितले.
गंभीरराव यांच्याशी सोमवारी दुपारी सतत संपर्क साधून त्यांचा मोबाइल बंद आहे, असे उत्तर मिळत होते. परंतु मिळालेली माहिती अशी की, गंभीरराव यांनी आपणास अजून कोणाचेही राजीनाम्याचे पत्र मिळालेले नाही. त्यामुळे कोणाचा राजीनामा हा प्रश्न निर्माण होत नाही. तसेच जे उदासीन, निष्क्रिय आहेत, त्यांच्यावर कारवाई करणारच येणार होती, अशी भूमिका व्यक्त केली आहे.