Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

मासुंदा तलाव सुशोभीकरण
हेरिटेज समितीने केला होता सुशोभीकरणास विरोध
मनसेकडून सह्यांची मोहीम

ठाणे/प्रतिनिधी

शिवसेना नेत्यांच्या आग्रहाखातर सुमारे चार कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या मासुंदा तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली धूळफेक केली जात असून, त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मासुंदा तलावावर सह्यांची मोहीम राबवून या कामातील घोटाळ्याबाबत मनसेने जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान, तलावाच्या सुशोभीकरणाच्या काही भागास हेरिटेज समितीने विरोध दर्शविल्यामुळे मूळ प्रस्तावात बदल करण्यात आल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे.

शेवटी आमदारांना आली जाग..
सॅटिसला मुहूर्त जूनअखेरचा

ठाणे/प्रतिनिधी

आधी जानेवारी, मग मार्च.. कालांतराने मे अन् आता जूनअखेर. सॅटिस प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे मुहूर्त अनेकवेळा पुढे गेले. कामाच्या ढकलपंचीमुळे ठाणेकरांच्या त्रासात भर पडली. त्यातच या प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. शेवटी आमदार एकनाथ शिंदे यांना एकदाची जाग आली आणि त्यांनी आज या प्रकल्पाची पाहणी केली. सॅटिस प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून जूनअखेर हे काम पूर्ण होईल, असा दावा आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर स्मिता इंदुलकर यांनी आज केला.

शुक्ल यांच्या अटकेवरून भाजप पदाधिकाऱ्यांची झाडाझडती
डोंबिवली/प्रतिनिधी -
भाजपचे नगरसेवक मोहन शुक्ल यांना पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी रविवारी रात्री अटक करण्यात आल्याने भाजपच्या प्रदेश नेत्यांनी काल रात्री साडे अकरा वाजता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची झाडाझडती केल्याचे समजते. सोमवारी जबाबदार पदाधिकाऱ्यांना प्रदेश नेत्यांनी मोहन शुक्ल अटकेप्रकरणी चर्चेसाठी बोलाविले आहे. गेल्यावर्षी मोहन शुक्ल हे नेहरू मैदान प्रभागातून पोटनिवडणुकीतून विजयी झाले आहेत.

सर्वच महापालिकांना मंदीचा फटका!
जकात उत्पन्नात मोठी घट

ठाणे/प्रतिनिधी

जगभरात सुरू झालेल्या मंदीची झळ राज्यातील प्रमुख महापालिकांना देखील बसली असून, पालिकांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या जकातीच्या उत्पन्नात घट आली आहे. राज्यातील जकात रद्द करावी, अशी मागणी एकीकडे होत असताना त्याच्या उत्पन्नात घट झाल्याने उत्पन्नाच्या अन्य मार्गाचा महापालिकांना विचार करावा लागत आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्याने सगळ्याच पालिकांचे अर्थसंकल्प मंजुरीचे काम आता सुरू झाले आहे.

मराठी शाळा वाचविण्याची सरकारचीच इच्छा नाही
ठाणे / प्रतिनिधी

इंग्रजी, हिंदीच्या आक्रमणामुळे मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले असून, या शाळा वाचविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या कृती आराखडय़ावर नजर टाकायलाही राज्याच्या शालेय शिक्षण सचिवांना वेळ नाही. परिणामी, मराठीविषयी आस्थाच नसलेल्या अधिकाऱ्यांकडून मातृभाषेच्या कल्याणाची अपेक्षा कशी धरायची, असा सवाल मराठी अभ्यास केंद्रातील तज्ज्ञांनी केला आहे. विद्यार्थी मिळत नसल्याच्या सबबीखाली एकीकडे मराठी शाळांना टाळे लावले जात आहे, तर दुसरीकडे इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. मराठी शाळांच्या या दयनीय अवस्थेबद्दल अधूनमधून चिंता व्यक्त केली जात असली, तरी ठोस उपाययोजना केली जात नाही.

रेल्वेमार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध
भिवंडी/वार्ताहर

तालुक्यातील पाये ते पिंपळास दरम्यान रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामासाठी शेतजमिनी संपादित करण्यास सुरुवात केल्याने खारबांव परिसरात अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी जमिनी मोजण्यास विरोध करीत आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. वसई-दिवा रेल्वे मार्गाचे काम १९७६ साली सुरू करण्यात आले होते. रेल्वेमार्गासाठी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने आश्वासन देऊनही एकाही शेतकऱ्याच्या घरातील सदस्याला नोकरीत सामावून घेतले नाही. आता वाढती रहदारी लक्षात घेऊन पाये ते पिंपळास दरम्यान तिसरा मार्ग टाकणे अनिवार्य झाल्याने खारबांव ते पाये दरम्यानच्या १८५ शेतकऱ्यांना भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटिसा बजाविल्या. कालवार, डुंगे गावाच्या ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध केला. भूसंपादन करण्यास आलेल्या अधिकाऱ्यास शेतकरी संघर्ष समितीने तीव्र विरोध केला. योगेश पाटील, शिवसेना विभागप्रमुख विजय म्हात्रे, खारबांव गावचे सरपंच रमेश कारभारी यांनी जमिनीस बाजारभावाप्रमाणे किंमत द्यावी, प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी, प्रकल्पग्रस्त दाखला, बाधित घराची वाजवी किंमत व पर्यायी जागा द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले.

प्रलंबित मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे उपोषण
बदलापूर/वार्ताहर:
अंबरनाथ नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसंदर्भात न्याय मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र मुक्त प्रवर्ग कर्मचारी संघटनेचे युनिट अध्यक्ष अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पालिकेतील कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती देणे, १२ वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांची कुंठितता घालविणे, कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविणे, पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळण्याबाबत, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करणे, पालिका कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची त्वरित भरती करणे या व इतर मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिनेश गायकवाड, श्रीधर भवार, भोला लेवे, कृष्णा कावंडर आदी २३ जण उपोषणात सहभागी झाले आहेत.

खूनप्रकरणी दोघे गजाआड
ठाणे /प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाचे पर्यवसाण सलिम येडा याच्या हत्येमध्ये घडली असून, याप्रकरणी प्रमुख दोन आरोपींना राबोडी पोलिसांनी आज गजाआड केले. राबोडीतील सलिम येडा याच्यावर दोन दिवसांपूर्वी ४२ वार करण्यात आले. त्यापैकी नवाब रेहमत उल्ला शेख (क्रांतीनगर) आणि गुलाम अली मोहम्मद युसुफ शहा या दोघांना राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

‘आओअ’ एकांकिकेस प्रथम पुरस्कार
बदलापूर/वार्ताहर

वांगणी येथील शांतीनगर विचार मंचच्या वतीने यंदाही आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या अंकुर नाटय़ संस्थेने सादर केलेली ‘आओअे’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातील २२ हौशी नाटय़ संस्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश ताम्हाणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. नगराध्यक्ष राम पातकर, बदलापूर कोमसापचे अध्यक्ष मनोज वैद्य, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार, पंचायत समिती सभापती गीता भुरबडा आदी याप्रसंगी उपस्थित होते. वसईच्या आर्या थिएटर्सच्या क्लॉक एक टाइम मशिनने द्वितीय आणि मॅन अधिक वुमन बरोबर ड्रामा (कल्याण) या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक आणि प्रसिद्ध लेखक राजन खान, नाटय़लेखक व दिग्दर्शक कश्युम खान यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. प्रिया शेलार, प्राची तावडे, जितेंद्र फराड, मिलिंद मोहिते, दयानंद घाडगे, संदीप पाटील आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

रोहित-सोनल मोरे यांची रेल्वे बॅडमिंटन संघात निवड
ठाणे :
येन स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या रोहित आणि सोनल मोरे या भाऊ-बहिणीची ओलोमाऊ (झेक प्रजासत्ताक) येथे होणाऱ्या सहाव्या जागतिक रेल्वे अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. रेल्वेच्या संघातून खेळणारा रोहित यावर्षीच्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक लढतीत उपविजेता ठरला होता, तर सोनलने वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. रोहित आणि सोनल दोघेही प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत. रोहित आणि सोनल दोघे राजीव गणपुले आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता अमरिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडिमटनचा सराव करतात.

सिडकोवर मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर गुन्हा
बेलापूर/वार्ताहर :
नवी मुंबईतील गावठाणालगत झालेली अतिक्रमणे उद्ध्वस्त करणाऱ्या सिडकोविरुद्ध बेकायदेशीररीत्या जमाव जमवून मोर्चा काढणाऱ्या चार नगरसेवकांसह ४० जणांवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीडी-बेलापूर काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष सुधीर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सिडकोने मागील आठवडय़ात गोठीवली, रबाळे व त्यानंतर चालू सप्ताहात वाशी गावालगत अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरविला. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नगरसेवक रमाकांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक संतोष शेट्टी, दशरथ भगत, प्रकाश माटे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटील व अन्य ४० जणांनी बुधवारी सिडकोला ‘लक्ष्य’ केले होते. अनधिकृत बांधकामे तोडण्याअगोदर प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित भूखंड वितरित करण्यात यावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती.

जातीच्या दाखल्यांकडे विद्यार्थी व शिक्षकांनी फिरविली पाठ
शहापूर/वार्ताहर

दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर जातीचे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची तहसील कार्यालयात होत असलेली दमछाक टळावी, याकरिता शाळांमध्येच दाखले देण्याच्या चांगल्या योजनेकडे शहापुरातील शाळांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. त्यामुळे आता जातीचे दाखले मिळविण्याकरिता विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. जातीचे दाखले शाळेतच मिळावेत, याकरिता २००७-०८ पासून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी संकल्पना दाखविली होती. त्यासाठी तहसील कार्यालयामार्फत माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्याच्या बैठका घेऊन जनजागृतीही केली होती. मात्र पहिल्या वर्षीचा उत्साह यावर्षी ओसरला आहे. यावर्षी शाळांनी व विद्यार्थ्यांनी निरुत्साह दाखविल्याने शहापुरात फक्त २५ टक्के विद्यार्थ्यांनाच शाळांमधून जातीचे दाखले मिळू शकले. शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या निरुत्साहापणामुळेच एका चांगल्या योजनेला घरघर लागली.
विद्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले मिळावेत याकरिता तहसील कार्यालय ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यातच मुख्याध्यापकांकडे अर्ज वितरित करतात. जातीच्या दाखल्यांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रही शाळेमध्येच भरून घेऊन त्यावर तहसीलचे सर्कल व मुख्याध्यापकांना सही करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांनी फक्त पुरावे गोळा करून घ्यावयाचे आहेत. मात्र विद्यार्थी व पालक यांनी हे पुरावे वेळेत सादर न केल्यानेच तहसील कार्यालयाकडे फॉर्म भरू शकले नाहीत, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

आव्हाडांचे केवळ आरोपांचे बुडबुडे -महापौर
ठाणे/प्रतिनिधी

ठाण्यात विकासकामे वेगाने व्हावीत यासाठी शिवसेना-भाजप युती सातत्याने प्रयत्न करीत आहे. विकासकामे झाली नाहीत, तर विकासकामे होत नाहीत असे आरोप करायचे आणि विकासकामे केली की त्यात भ्रष्टाचार झाला अशी ओरड करायची, ही जितेंद्र आव्हाड यांची जुनी सवय असून आरोपांचे नुसते बुडबुडे ते सोडत असतात, अशी टीका ठाण्याच्या महापौर स्मिता इंदुलकर यांनी केली. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार होत असून, ही पालिका बरखास्त करावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना महापौरांनी आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले. आत्तापर्यंत आम्ही केलेली कामे पारदर्शक असल्याने कोणत्याही ऑडिटला, चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. सॅटिस प्रकल्प पूर्ण होत आल्याने त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल या भीतीने या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा खोटा आरोप आव्हाड करीत असल्याचे महापौरांनी सांगितले. करदात्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजप युती सर्वतोपरी दक्षता घेत आहे. मात्र आव्हाडांसारखे नेते विनाकारण त्याचे काम रखडले की, प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याची ओरड करतात, अशी टीका महापौरांनी केली.