Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

व्यक्तिवेध

अनेक मराठी घरांमध्ये घरटी एक जण सैन्यात जाण्याची परंपरा आहे. मात्र मराठी माणसे सैन्यात जातात, असे म्हणतो तेव्हा ते लष्करात म्हणजेच पायदळ किंवा तोफदळात कार्यरत असतात, असेच आपल्याला अपेक्षित असते. कारण हवाई दल किंवा नौदल असा विचार फारच कमी मराठी मंडळी करतात. त्यातही नौदलामध्ये जाणाऱ्या मराठी मंडळींची संख्या काही वर्षांत वाढली असली तरी हवाई दल मात्र तसे अजूनही दूरच राहिले आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून प्रदीप वसंत नाईक यांनी एअर चीफ मार्शलपदाची सूत्रे

 

स्वीकारणे या घटनेला वेगळे महत्त्व आहे. मराठी तरुण हवाई दलाकडे अत्यल्प संख्येने जात होते, त्यावेळेस म्हणजेच तब्बल ४० वर्षांंपूर्वी त्यांनी असा निर्णय घेणे याला एक वेगळेच महत्त्व होते. त्यांच्या त्या निर्णयाचे आता या नियुक्तीच्या निमित्ताने चीज झाले. प्रदीप नाईक यांच्या नियुक्तीला एक वेगळेच महत्त्व आहे. लढाऊ विमानाच्या वैमानिकाने (फायटर पायलट) हवाई दलाच्या प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारण्याची परंपरा आजवर हवाई दलात होती आणि त्याचा हवाई दलाला रास्त अभिमानही होता. गेल्या खेपेस मात्र हेलिकॉप्टर पायलट असलेल्या फली मेजर यांची नियुक्ती झाल्याने ती परंपरा खंडीत झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा नाईक यांच्या रूपाने फायटर पायलट हवाईदल प्रमुखपदी विराजमान झाला आहे. २२ जुलै १९४९ साली नागपूरला जन्मलेल्या नाईक यांनी महाविद्यालयीन जीवनातच हवाई दलात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे शिक्षण सातारच्या सैनिकी शाळेत आणि नंतर पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) झाले. २१ जून १९६९ साली ते फायटर पायलट म्हणून रुजू झाले. त्यांना सुमारे तीन हजाराहून अधिक तास हवाई उड्डाणाचा अनुभव आहे. ‘इन्स्ट्रक्टर पायलट’ ही हवाई दलाच्या संदर्भात महत्त्वाची बाब समजली जाते. अतिशय तरबेज असलेल्या पायलटलाच केवळ हा दर्जा मिळतो. १९७१च्या युद्धातही ते सहभागी होते. अलाहाबाद येथील सेंट्रल एअर कमांडचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. जंगल व स्नो सव्‍‌र्हेअर आणि त्या संदर्भातील युद्धाचे हवाई डावपेच हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे भारतीय हवाई सैनिकांना अशा प्रकारच्या युद्धात तरबेज करण्यासाठीचे प्रशिक्षण देणाऱ्यांमध्येही त्यांचा समावेश आहे. भारतामध्ये वाळवंटापासून ते हिमालयापर्यंत विविध पातळ्यांवर हवाई दलाला कार्यरत राहावे लागते. ईशान्येकडची राज्ये ही देखील वैमानिकाची परीक्षा पाहणारी आहेत. हिमालय आणि ईशान्येकडचा जंगल आणि दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश हा जगातील अवघड प्रदेश समजला जातो. या दोन्ही प्रदेशांमध्ये भारतीय हवाई दल शिताफीने काम करते. त्याचे श्रेय प्रदीप नाईक यांच्यासारख्या लढाऊ वैमानिकांकडे जाते. या दोन्ही प्रदेशातील केवळ चलनवलन कठीण समजले जाते, त्या ठिकाणी युद्ध लढणे हे तर अतिशय कठीण. या प्रदेशातील युद्धांच्या डावपेचामध्ये नाईक वाकबगार आहेत. त्यांच्या नियुक्तीचा त्यामुळे भारतीय हवाई दलाला अधिक फायदा होईल, असे मानले जाते. यापूर्वी पठाणकोठ येथील मिग-२१ व मिग २३ बायसनच्या ताफ्याचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. श्रीनगर, बरेली, बिदर अशा वेगवेगळ्या हवाई तळांवर प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आजवरच्या सेवेबद्दल विशिष्ट सेवा मेडल, परम विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. तिन्ही दलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींचे एडीसी म्हणूनही त्यांची नियुक्ती २००७ साली करण्यात आली होती. येणारा काळ हा भारतीय हवाई दलासाठी महत्त्वाचा कालखंड असणार आहे. मिग विमानांचा ताफा कालबाह्य ठरला आहे आणि नवीन विमानांसाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. भारतीय हवाई दल आधुनिकीकरणाच्या वळणावर उभे आहे. अशा वेळेस पुन्हा एकदा फायटर पायलट या पदावर आल्याने हवाई दलातही आनंदाचे वातावरण आहे. महत्त्वाचे म्हणजे या निमित्ताने मराठी तरुण अधिक संख्येने हवाई दलाकडे वळतील, अशी आशा निर्माण झाली आहे.