Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९


‘स्वराधिराज’-अपेक्षापूर्ती झाली नाही
डॉ. सुलभा पंडित

‘युवा सांस्कृतिक मंडळ’ आणि ‘स्वरमधुरा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वराधिराज’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन झाले होते. कार्यक्रमाचे एकूण स्वरूप पाहू जाता त्यासंबंधी बऱ्याच सूचना करण्याची नाईलाजाने वेळ आली आहे, हे सुरुवातीलाच सांगायचे आहे. या सर्वाचा हेतू, स्थानिक आयोजक आणि कलावंत यांना नाराज वा नाउमेद करण्याचा नसून भविष्यात त्यांच्याकडून उत्तम, शिस्तबद्ध आणि सांगीतिकदृष्टय़ा सुद्धा किमान दर्जाचे कार्यक्रम सादर व्हावेत ही मन:पूर्वक इच्छा आहे.

वलनी नाल्याजवळ बिबटय़ाच्या कुटुंबाचा मुक्काम
चंद्रपूर, १ जून/ प्रतिनिधी

बिबटय़ाचे चार सदस्यांच्या कुटुंबाने चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी नाल्याशेजारी मुक्काम ठोकला आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना नर, मादी व दोन पिलांचे दर्शन होत आहे. बिबटय़ाच्या कुटुंबाला बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली असून वन खात्याने बंदोबस्त वाढवला आहे.
चिचपल्ली वन परिक्षेत्रातील वलनी कंपार्टमेंटमध्ये चार दिवसापूर्वी एका मादी बिबटय़ाने दोन पिल्लांना जन्म दिला. रविवारी नर व मादी बिबटे दोन पिल्लांना घेऊन वलनीच्या मुख्य नाल्याशेजारी आले.

प्राध्यापकाचा भाव १८ लाख रुपयांवर
चंद्रपूर, १ जून / प्रतिनिधी

सुखाची नोकरी अशी ओळख असलेल्या प्राध्यापकाच्या नियुक्तीचा भाव आता तब्बल अठरा लाख रुपयांवर पोहोचला आहे. या नियुक्त्यांमध्ये होणारा गैरव्यवहार थांबावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक प्रयत्न करूनही संस्थाचालक वेगवेगळय़ा युक्तीचा अवलंब करीत असल्याने दरवर्षी या भावात वाढ होत चालली आहे. उच्चशिक्षण घेतलेल्या प्रत्येक तरुणाला प्राध्यापकाची नोकरी मिळावी असे वाटत असते. ही नोकरी मिळवण्यासाठी आता शैक्षणिक पात्रता हा एकच निकष राहिला नसून संस्थेला देणगी देण्यासाठी लाखो रुपये असतील तरच अशी नोकरी मिळते हा अनुभव आता सार्वत्रिक झाला आहे.

जनतेशी संपर्क कायम ठेवणारा लोकप्रतिनिधी
सुरेश सरोदे

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार मारोतराव कोवासे हे तीन वेळा गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्याच उमेदवारीवर निवडून आले होते. काँग्रेसच्या या गडाला १९९१ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार अशोक नेते यांनी प्रथमच खिंडार पाडले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांचा पराभव करून निवडून आले. २००४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीतही मतदारांनी अशोक नेते यांच्या बाजूनेच कौल दिला.

‘बँका बचत गटांना आधारभूत ठराव्यात’
भंडारा, १ जून / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ातील ४०७५ हजार बचत गटांपैकी केवळ १३०० गटांचाच व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे त्वरित कर्ज देऊ म्हणणाऱ्या बँकांचे पितळ उघडे पडले आहे. ग्रामीण गरीब व अल्पशिक्षित महिलांसाठी स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना १ एप्रिल १९९९ ला सुरू करण्यात आली. महिलांना स्वयंरोजगारातून समृद्धीकडे नेण्याच्या या योजनेत विविध बँकांकडून वित्त पुरवठय़ाची तरतूद केली आहे.

ऑटोची मोटारसायकलला धडक, तीन ठार
गोंडपिंपरी, १ जून/ प्रतिनिधी

गोंडपिंपरी-बल्लारपूर मार्गावरील आक्सापूर वळणावर एका प्रवासी ऑटोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. मृतांमध्ये मोटारसायकल चालक शंकर श्रावण भांडेकर (४०), संदीप राजेश्वर पिपरे (२०) व प्रवासी संजय बबनराव बंडीवार (३०) यांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यातील इटोली येथील शंकर भांडेकर व संदीप पिपरे मोटारसायकलने (एम.एच.३४-क्यू-४०५४) कामानिमित्त आष्टी येथे गेले होते. तिथून परत येत असताना आक्सापूर वळणावर वेगात येत असलेल्या प्रवासी ऑटोने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की मोटारसायकलस्वार शंकर भांडेकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर संदीप पिपरे व ऑटोमधील प्रवासी संजय बंडीवर, रा. राजोली गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना प्राथमिक उपचारासाठी गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच संजय बंडीवार याची प्राणज्योत मालवली. संदीपची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंडपिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रवासी ऑटोचा शोध सुरू आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना यवतमाळात श्रद्धांजली
यवतमाळ, १ जून/ वार्ताहर

‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशप्रेम, त्याग आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर केलेला अतुलनीय संघर्ष देशवासीयांना प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यवीरांच्या ऋणातून देश मुक्त होऊ शकत नाही, एवढे अफाट कर्तृत्व सावरकरांचे आहे’, या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना यवतमाळकरांनी श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीनिमित्त येथील हनुमान आखाडा चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, ‘लोकदूत’चे ज्येष्ठ संपादक शरद अकोलकर, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणलाल खत्री, विजय बुंदेला, व्यापारी महासंघाचे दासभाई सूचक, सेनेचे राजेंद्र गायकवाड आदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. हिंदू महासभेचे प्रदेश संघटन सचिव लक्ष्मणलाल खत्री यांनी अथक परिश्रम घेऊन स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीनिमित्त केलेल्या आयोजनाबद्दल सर्व वक्तयांनी खत्री यांना धन्यवाद दिले. चंद्रशेखर मोहरकर यांनी संचालन केले.

मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांची तिवसा पंचायत समितीला भेट
तिवसा, १ जून/ वार्ताहर

तिवसा पंचायत समितीला मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी भेट दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. सपत्नीक आलेले मुख्यकार्यपालन अधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांना कर्मचाऱ्यांनी आधी ओळखले नाही. कार्यालयीन वेळ झाल्यावरही अनेक कर्मचारी उपस्थित नसल्याने ओमप्रकाश बकोरिया संतप्त झाले. लेट लतिफ कर्मचाऱ्यांना त्यांनी कारणेदाखवा नोटीस दिली. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर व विभागाची पाहणी केली. तिवसा पंचायत समिती मधील जास्तीत जास्त कर्मचारी ये-जा करीत असल्यामुळे वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना त्रास होतो. अनेक गावात पाणी टंचाई असताना आज कर्मचारी केवळ कागदोपत्री सोपस्कार करतात. यामुळे पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.

आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने हृदयरुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत
गोंदिया, १ जून/ वार्ताहर

राज्य शासनाच्या जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत समाजातील गरजू नागरिकांना आरोग्य उपचारासाठी शासनातर्फे आर्थिक मदत पुरवली जाते. त्याच अनुषंगाने दवनीवाडा येथील द्वारकाप्रसाद कानाजी पारधी हे हृदयरुग्ण असून त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना या योजनेत समाविष्ट करून आमदार गोपालदास अग्रवाल यांनी त्यांच्या उपचारासाठी १ लाख १० हजार रुपये मंजूर करवून घेतले. पारधी यांची आर्थिक परिस्थिती उपचार करण्याइतपत नसल्याने त्यांना अनेक दिवसांपासून हृदयाचा विकार असल्याने यावर त्यांचा अतोनात पैसा खर्च झाला. शेवटी त्यांनी आमदार अग्रवाल यांच्याकडे धाव घेतली. आमदार अग्रवाल यांनी या योजनेच्या माध्यमातून पारधी यांना उपचारासाठी पैसे मिळावे याकरिता पुढाकार घेतला व त्यांच्याच परिश्रमाने उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर झाली. हा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या सहाय्यता निधीतून देण्यात येतो. याशिवाय आमदार अग्रवालांच्या प्रयत्नाने सोनेगाव येथील संतोष रहांगडाले हे सुद्धा हृदयविकाराने त्रस्त असल्याने त्यांनाही उपचारासाठी १ लाख १० रुपयांची मदत मंजूर झाली आहे.

यंदा ४ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड
मेहकर, १ जून / वार्ताहर

रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड या योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्य़ात ४ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे.फळबाग लागवड योजनेंतर्गत यावर्षी ६०० हेक्टर क्षेत्रावर आंबा, संत्रा ७५०, मोसंबी ९००, सीताफळ १ हजार ४००, कागदी लिंबू ४५०, आवळा ४०० व २०० हेक्टर क्षेत्रावर पेरू अशा ४ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत १५० हेक्टर क्षेत्रावर चिकू, डाळींब १००, जॅट्रोफा ८० आणि अंजीर २० हेक्टर असे ३५० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. फळबागेची लागवड करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतीचा सातबारा, नमुना ८ अ, शेतीचा नकाशा यासह विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. लिंबूवर्गीय फळपिकाच्या लागवडीसाठी माती परीक्षण करणे बंधनकारक आहे. फळबाग कार्यक्रम योग्यरीतीने राबवण्यासाठी खड्डे खोदणे, १० जूनपर्यंत कलम-रोप लागवड, तसेच १५ ऑगस्टपर्यंत लागवड करणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

गटसचिवांच्या मागण्या पूर्ण करा- फुंडकर
बुलढाणा, १ जून / प्रतिनिधी

गटसचिवांचा संप तात्काळ मिटवून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. गटसचिवांच्या संपाबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, खरिपाचा हंगाम तोंडावर आला असताना व कर्जवाटप सुरू असताना राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेचे सचिव संपावर गेल्याने कर्जवाटप थांबले आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध होत नसल्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होणार आहे. जमीन तारण ठेवून देखील निकडीच्या वेळी कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरदेखील पेरणीपूर्व मशागत, बी-बियाणे, खते यासाठी लागणारा खर्च कोठून करावा, या विवंचनेत शेतकरी त्रस्त झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाच्या धुंदीतून राज्य सरकार अद्याप जागे झालेले नाही. राज्य शासनाने गट सचिवांच्या संपामध्ये त्वरित हस्तक्षेप करून हा संप मिटवावा व येत्या दोन, चार दिवसात शेतकऱ्यांना कर्ज, बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी फुंडकर यांनी केली.

बंधाऱ्यांची दयनीय अवस्था
बुलढाणा, १ जून / प्रतिनिधी

खामगाव तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने बांधण्यात येणारे सिमेंट बंधारे अतिशय दयनीय अवस्थेत असून येणाऱ्या पावसाळ्यात हे बंधारे फुटणार आहे. तालुक्यात जास्तीत जास्त नाल्याची संख्या आहे. अशा गावांमध्ये बंधाऱ्याची संख्या अधिक आढळते. सिमेंट बंधारे आता पावसाळ्याची सुरुवात होताच त्या वर्षी ते फुटले होते. पाणी अडवणे दूरच मात्र, शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान या बंधाऱ्यामुळे होत असल्याची ओरड त्या संबंधित शेतकरी करीत आहेत. ज्या शेताजवळ कृषी विभागाकडून सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या शेतांची उंची खूप कमी आहे. बंधाऱ्याच्या दोनही भिंतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या भिंतींना मोठाले भगदाड पडून त्याद्वारे बंधाऱ्यामध्ये अडवले जाणारे पाणी त्या भगदाडमधून सरळ शेतात येते. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकाची व शेताचे नुकसान होते. शेतातील माती मोठय़ा प्रमाणामध्ये वाहून जाते. अशा प्रकारात एक सव्वा एकराचे वर शेत वाया जाते. शेतकऱ्यांसाठी सिमेंट योजना केवळ निकृष्ट कामे करून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तरुण सागर महाराजांचे उत्साहात स्वागत
िहगणघाट, १ जून / वार्ताहर

कडवे प्रवचनकार तरुणसागर महाराज यांचे येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
येथे भारत विद्यालयाच्या प्रांगणात ५ ते ७ जून दरम्यान तरुणसागर यांच्या कडव्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी स्थानिक रा.सु. बिडकर महाविद्यालयाच्या प्रांगणातून मुनिश्रींची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्यासमोर बँड पथक, लेझीम, दिंडी तसेच कलश घेतलेल्या महिला होत्या. चौकाचौकात स्वागत फलक उभारण्यात आले होते. मुनिश्री पालखीत विराजमान होते. तसेच त्यांच्यामागे शेकडो महिला व पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी नागरिकांसाठी ठिकठिकाणी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली. कारंजा चौकात खासदार दत्ता मेघे यांनी मुनिश्रींचे स्वागत केले. त्यांच्या सोबतच आमदार राजू तिमांडे, आयोजक अॅड. सुधीर कोठारी इत्यादी मान्यवर शोभायात्रेत सहभागी झाले. शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गावरून फिरून महाविर भवन येथे विसर्जित झाली.

वढव येथे रासायनिक खतांचा साठा जप्त
बुलढाणा, १ जून / प्रतिनिधी

लोणार तालुक्यातील वढव येथील तोतया दुकानदार अवैधरीत्या रासायनिक खताची जास्त भावाने विक्री करीत असल्याच्या तक्रारीवरून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरवजा दुकानावर छापा टाकून २९५ बॅग खतांचा साठा जप्त केला. अधिकाऱ्यांच्या धडक कारवाईमुळे जास्त भावाने खताची विक्री करणाऱ्या तसेच तोतया दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वढव येथील गजानन ग्याणुजी मुंढे हा रासायनिक खताची अवैध विक्री करीत आहे. या अगोदरही त्याने जवळपास एक हजार बॅग अव्वाच्या सव्वा भावाने विकून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे. तसेच बाजारात निर्माण झालेल्या टंचाईचा फायदा घेऊन जादा भावाने खतांची विक्री करीत आहे. अशी निनावी तक्रार जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी स्थानिक पं.स.चे कृषी विस्तार अधिकारी एस.बी. गायकवाड, एस.आर. सोनुने, विस्तार अधिकारी एस.बी. दळवी, सदस्य गोविंद वठारे यांनी धाड टाकून विविध कंपनीच्या रासायनिक खतांच्या बॅगा जप्त केल्या. त्यामध्ये डीएपी सरदार २६ बॅग, सम्राट ६५, बलवान ३४, १०:२६:१८ १८ बॅग, २०:२०:० १३ बॅग, सरदार ३०, एसएसपी गिरणार ३०, संजीवनी १६, आयपीएल १६, इफको ३०, १०:२६:२६ नवरत्न ३० अशा एकूण २९५ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गजानन मुंढे यांच्या घराचा व जप्त खतांचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा
अकोला, १ जून / प्रतिनिधी

पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या भौरदच्या नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाजल पाणीपुरवठा योजना एक वर्षांपासून बंद पडल्यामुळे भौरदमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अकोला शहरालगतच असलेल्या भौरद या गावात अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. महाजल पाणीपुरवठा योजना एक वर्षांपासून बंद पडली असून, यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच उग्र झाले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही उपयोग न झाल्यामुळे येथील गावकऱ्यांनी सेामवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी मुथ्थुकृष्णन यांची भेट घेऊन पाणीटंचाईची समस्या दूर करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

आदिवासी खासदारांचा फोरम; कोवासेंचा निर्धार
नागपूर, १ जून/ प्रतिनिधी

देशभरातील आदिवासी खासदारांना संघटित करून आदिवासी फोरम तयार करण्यात येणार असून आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन गडचिरोलीचे नवनिर्वाचित खासदार मारोतराव कोवासे यांनी दिले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे नुकताच आमदार निवास येथे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते मारोतराव कोवासे यांचा सत्कार करण्यात आला. अमरावतीचे जिल्हा अध्यक्ष मधुकरराव भादिकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भाचे अध्यक्ष मणिराम मडावी, आर.यू केराम, नारायणराव सिडाम, घनश्याम मडावी, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, सुरेश कुमरे, जनार्दन पंधरे उपस्थित होते. खासदार म्हणून निवडून आलो असलो तरी आदिवासी विकास परिषदेशी आपली बांधीलकी कायम राहणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी संधी देऊन आपल्यावर विश्वास टाकला असून त्याला तडा जाऊ देणार नाही. सरकार दरबारी आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी आदिवासी खासदारांचा फोरम तयार करण्याची योजना असून लवकरच देशभरातील आदिवासी खासदारांच्या भेटी घेणार आहे. बोगस आदिवासी जर खोटे प्रमाणपत्र बळकावून नोकरीत लागले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारवर दडपण आणण्यात येईल. शासनाने बोगस आदिवासींना संरक्षण देऊ नये, अशी मागणी कोवासे यांनी केली. कार्यक्रमाला आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी नामदेवराव किरसान, नारायणराव मडावी, वसंतराव ससाने, अजाबराव उईके, विठोबा मसराम, कुसुम आत्राम, ज्ञानेश्वर आहाके, श्याम धुर्वे, अंजना मडावी, मधुकरराव उईके उपस्थित होते.