Leading International Marathi News Daily

मंगळवार, २ जून २००९

विविध

बिहारमधील खुश्रूपूर स्थानक व दोन रेल्वेगाडय़ा संतप्त जमावाने पेटवल्या
पाटणा, १ जून/पीटीआय

राजगीर-नवी दिल्ली दरम्यान धावणारी श्रमजीवी एक्स्प्रेस खुश्रूपूर येथे थांबणार नसल्याची उद्घोषणा होताच संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज खुश्रूपूर रेल्वेस्थानकाला तसेच दोन रेल्वेगाडय़ांना आग लावली तसेच रेल्वेरुळही उखडले.पूर्व-मध्य रेल्वेच्या दाणापूर विभागामध्ये खुश्रूपूर स्थानक येते. यासंदर्भात पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. के. चंद्रा यांनी सांगितले की, संतप्त झालेल्या जमावाने खुश्रूपूर स्थानकानजिक बैकतपूर गावापाशी दाणापूर-जयनगर इंटरसिटी एक्स्प्रेस व राजगीर-दाणापूर पॅसेंजर या दोन गाडय़ांना आग लावली.

निदर्शने करणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना अटक;
आता भारतीय टॅक्सीचालकावर हल्ला
मेलबर्न, १ जून/पी.टी.आय.
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वर्णद्वेषाचे शिकार होण्याच्या घटना थांबण्याची चिन्हे नसून, आता हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या टॅक्सीचालकाला एका मद्यपीने मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जावी, या मागणीसाठी काल भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘शांतता रॅली’तील निदर्शकांना थोपविण्यासाठी पोलिसांनी मारहाण केली. त्याचप्रमाणे यातील १८ जणांना पोलिसांनी अटक केली असून अद्याप त्यांना सोडण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभेत प्रणवदा व अडवाणींसह नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी
नवी दिल्ली, १ जून/खास प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात आज नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीने झाली. लोकसभेचे नेते प्रणव मुखर्जी, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेस-युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य तसेच २८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. खासदारांचा शपथविधी सोहळा उद्याही सुरु राहील.

पाकिस्तानमध्ये बसस्थानकात स्फोट; चार ठार, १३ जखमी
इस्लामाबाद, १ जून/पीटीआय

पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील कोहात शहरातल्या तीरा बाजार येथे एका बसस्थानकात आज झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये चार ठार व १३ जण जखमी झाले. वायव्य सरहद्द प्रांतामधील तालिबानी दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने धडक कारवाई सुरू केली. त्याचा सूड उगविण्यासाठी या भागामध्ये दहशतवादी गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोट घडवीत आहेत. कोहात येथे घडविण्यात आलेला बॉम्बस्फोट हा याच मालिकेतील होता. पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत तालिबानींचे मोठे नुकसान झाले आहे. कोहात येथे बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून कोणत्याही संघटनेने अद्याप या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी या बॉम्बस्फोटाचा निषेध केला आहे.

बैलाने उकरलेल्या मातीतून मिळाले १६५ तोफगोळे!
गुवाहाटी, १ जून/पीटीआय

आपल्या शिंगांनी माती उकरण्याच्या एका बैलाच्या उद्योगाने आसामच्या मध्ययुगीन इतिहासावर प्रकाशझोत पडल्याची विलक्षण घटना गुवाहाटी येथे गेल्या शुक्रवारी घडली. बैलाने उकरलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातून १७ व्या शतकातील सुमारे १६५ तोफगोळे सापडले. गुवाहाटी शहर परिसरात काजोली चौकी भागामध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीनजिक टेकाडामध्ये शिंग खुपसून तेथील माती उकरण्याचा उद्योग एका बैलाने आरंभला होता. या मातीच्या ढिगाऱ्यातून सुमारे १६५ तोफगोळे सापडले. १६७१ साली सराईघाट येथे अहोम व मुघलांमध्ये जी लढाई झाली त्यातील हे तोफगोळे असावेत असे इतिहासकारांचे मत आहे. हे तोफगोळे पोलिसांनी आसाम राज्य वस्तुसंग्रहालयाच्या ताब्यात दिले आहे. हे तोफगोळे विविध आकाराचे असून ते १६ व्या किंवा १७ व्या शतकात तयार करण्यात आले असावेत असे या वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. शरहरउद्दीन अहमद यांनी सांगितले. अहोम यांनी १३ व्या शतकात आसाममध्ये आपले राज्य स्थापन केले. त्यांची रणनीती व शस्त्रास्त्रे कशी होती यासंदर्भात या तोफगोळ्यांच्या अभ्यासातून काही निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे.

वांशिक हल्ल्यांचा आमिर खानकडूनही निषेध
नवी दिल्ली, १ जून/ वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधासाठी ‘बीग बी’ अमिताभ यांच्यानंतर आता आमिर खानही सरसावला आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले ही लाजिरवाणी बाब असल्याचे त्याने आपल्या नव्या ‘ब्लॉगपोस्ट’मध्ये म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहत असणाऱ्या भारतीय नागरिकांवर वर्णद्वेषातून हल्ले होत आहेत, ही मोठी धक्कादायक बाब आहे. याबाबत ठोस कारवाईची अपेक्षा आमिर याने व्यक्त केली. भारतीयांवर हल्ले होत आहेत, याचा अर्थ सर्व ऑस्ट्रेलियन नागरिक वर्णद्वेष्टे नाहीत. मात्र हल्ल्यांचे प्रमाण आणि गांभीर्य पाहता ऑस्ट्रेलिया प्रशासनाने त्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. दरम्यान, हल्ल्यांबाबत कारवाईची मागणी प्रशासनाकडून करतो, त्याचप्रमाणे भारतात येणाऱ्या पर्यटकांना सामोरे जावे लागणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांचाही आपण विचार करणे गरजेचे असल्याचे आमिरने म्हटले आहे. रुग्णालयात मृत्युशी झुंज देत असलेल्या श्रवण कुमार या हल्ल्याचा शिकार झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत त्याने चिंता व्यक्त केली. श्रवण कुमार लवकरच बरा व्हावा यासाठी प्रार्थना करुया, असेही आमिरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिंदे, पटेल, कामत यांनी मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली
नवी दिल्ली, १ जून/खास प्रतिनिधी

ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, नागरी उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल आणि दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी आज आपापल्या खात्यांची सूत्रे स्वीकारली. श्रमशक्ती भवनात शिंदे यांनी, तर राजीव गांधी भवनात पटेल यांनी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, तर इलेक्ट्रॉनिक निकेतन येथे ए. राजा आणि सचिन पायलट यांच्यासोबत कामत यांनी पदभार स्वीकारला. अकराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ७७ हजार मेगावॅट वीजेच्या उत्पादनाची भर पडेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. १ लाख १८ खेडय़ांपर्यंत वीज पोहोचविण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. कॅबिनेट मंत्री ए. राजा आणि सहकारी सचिन पायलट यांच्यासोबत कामत यांनी सायंकाळी सूत्रे स्वीकारली. काँग्रेस पक्षात ३७ वर्षे काम केल्यानंतर राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना कामाचे वाटप झाल्यानंतर पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशांचे पहिल्या शंभर दिवसात पालन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दूरसंचार खात्यातील अनेक वादग्रस्त मुद्यांवर फेरविचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. एअर इंडियाचे समभाग विक्रीला आणून शेअर बाजारात नोंदणी करण्याचा इरादा प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. मात्र, समभाग विक्रीमुळे एअर इंडियाच्या सार्वजनिक स्वरुपात बदल होणार नाही तसेच या कंपनीचे खासगीकरण होणार नाही, असेही पटेल यांनी सूत्रे स्वीकारताना स्पष्ट केले.