Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

अग्रलेख

लालूंची ममतादीदी!

 

बिहारमध्ये सोमवारी काही रेल्वे गाडय़ा पेटवून दिल्या गेल्या. एक दोन स्टेशन्सही जाळण्याचा प्रयत्न झाला. बिहार हे कसे निर्नायकी व बेबंद राज्य आहे, यावर लगेच टिकाटिप्पणीही झाली. परंतु हा ‘बिहारी राडा’ का झाला यावर फारशी चर्चा झाली नाही. सुदैवाने रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने पावले उचलली आणि सर्व परिस्थिती मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या मदतीने नियंत्रणाखाली आणली. ज्या गावकऱ्यांनी गाडय़ा पेटवून दिल्या होत्या, त्यांचा असंतोष होता तो आकस्मिकपणे त्यांच्या परिसरातील स्टेशन्सवर गाडय़ा न थांबविण्याच्या निर्णयाच्या विरोधात. सार्वजनिक मालमत्तेची अशी नासधूस करणे हे सर्वथा अयोग्य असले तरी या प्रकरणाची पाश्र्वभूमी समजून घेण्यासारखी आहे. संबंधित स्टेशन्सवर गाडय़ा न थांबविण्याचा निर्णय काही अतिशहाण्या व अतिउत्साही नोकरशहांनी ममता बॅनर्जींच्या वा त्यांच्या कार्यालयाच्या संमतीशिवाय घेतला होता. जाळपोळ होईपर्यंत दिल्लीतील मंत्रालयाला व ममतादीदींना त्या निर्णयाचा पत्ताच नव्हता. रेल्वे मंत्रालयाने तातडीने त्या गाडय़ा पूर्वीप्रमाणे त्या स्टेशन्सवर थांबतील, असे जाहीर केले. या थांब्यांचा निर्णय लालूप्रसाद यादव यांच्या कारकीर्दीत झाला होता. ज्या अतिशहाण्या नोकरशहांनी स्वत:च्या अखत्यारीत हा निर्णय घेतला होता, त्यांची आता चौकशी होणार आहे. या निर्णयामागे स्थानिक राजकारण होते, हे उघड आहे. ममतादीदी बंगाली आहेत. लालूप्रसाद बिहारचे. शिवाय रेल्वेमंत्रीपद ममता बॅनर्जींकडे गेल्यामुळे व एकूणच राष्ट्रीय जनता दलाला फटका बसल्यामुळे लालूप्रसाद नाराज आहेत. त्यांच्या टीव्ही पडद्यावरचा बिनधास्त ( व बरेचवेळा विदुषकी) वावर आता थांबला आहे, त्यांच्या समर्थकांनी आपल्या ‘हिरों’च्या बाजूने हे आंदोलन ‘पेटविले’ असण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जींनी परिस्थिती लगेच आटोक्यात आणली व बिहार-बंगाल असे स्वरूप त्या संघर्षांला येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे ममता, लालू दोघेही यूपीए या सत्तारूढ आघाडीचे सदस्य आहेत, आणि हा वाद अधिक चिघळला असता, तर त्या आघाडीत तणाव निर्माण झाला असता. सुदैवाने ममता बॅनर्जींनी समंजसपणाने प्रश्न हाताळला. असा समंजसपणा हे त्यांच्या स्वभावाचे लक्षण मानले जात नाही. अजून तरी लालूजींनी कोणतीही अतरंगपणाची कृती केलेली नाही. खरे तर लालूंकडे कर्तबगारी आहे, समज आहे आणि लोकाभिमुखताही आहे. परंतु आत्मप्रेमामुळे व बाष्कळपणामुळे त्यांनी त्यांची प्रतिष्ठा कमी करून घेतली होती. काँग्रेसलाही कोंडीत पकडण्याचे डावपेच सरकारच्या शेवटच्या टप्प्यात खेळून त्यांनी स्वत:चे अवास्तव अस्तित्त्व दाखविण्याचा प्रयत्न केला होता. पंधराव्या लोकसभेसाठी बिहारमध्ये लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी लालू सज्ज झाले, तेव्हा त्यांनी रामविलास पासवान या आपल्या एकेकाळच्या विरोधकाला बरोबर घेतले. पास्वानांच्या लोकजनशक्ती पक्षासह मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षालाही त्यांनी बखोटीला मारले आणि काँग्रेससाठी बिहारमधल्या लोकसभेच्या तब्बल तीन जागा सोडायचे ‘औदार्य’ त्यांनी दाखवले. काँग्रेसला आपल्याबरोबर यायचे असेल तर ते या जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतात, असे लालूंनी सांगितले, तेव्हा त्यांना काँग्रेस हा राष्ट्रीय राजकारण करणारा मोठा पक्ष आहे, याचा विसर पडला. त्यांनी हे कृत्य कुणाच्या सांगण्यावरून केले किंवा कुणाचा आदर्श ठेवून केले, हे कळायला मार्ग नाही. लालूंनी ही खेळी बहुधा मुलायमसिंगांच्या डावपेचांप्रमाणे खेळली असावी. पासवानांचे या खेपेला नेमके काय बिनसले होते, ते कळायला मार्ग नाही. धर्माधतेचे विष कालवणाऱ्या भाजपला खडय़ासारखे वगळायची आवश्यकता आहे, असे म्हणणारे पासवान प्रत्यक्षात काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करून भाजपलाच मदत करत होते. लालू असोत वा पासवान, दोघांनाही नीतिशकुमारांचे बिहारमधले प्राबल्य डाचत होते. नीतिशकुमारांचे सरकार बिहारमध्ये भाजपबरोबरच सत्तेत आहे. त्यातच काँग्रेस पक्षाचे तरुण सरचिटणीस राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या आपल्या पहिल्याच जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना नीतिशकुमारांच्या प्रशासनाचे कौतुक केले. त्यांनी जयललितांविषयीही दोन शब्द चांगले काढले. नीतिशकुमारांनी केंद्रातल्या सरकारला पाठिंब्यासाठी ज्या अटी घातल्या, त्या खूपच उशिरा. पण नंतर काँग्रेसला नीतिशकुमारांच्या पक्षाची अजिबातच गरज उरली नाही. पण लालूंचेही गाडे तेव्हापासून बिथरले होते. आपण ‘तिसऱ्यां’बरोबर आहोत, असे ते सांगू लागले. शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणाऱ्यांमध्ये लालू आणि मुलायम हे दोघेही होते. त्यांना मतदारांचा कल काय असेल, याचा अंदाज आलाच नाही. पासवान हे स्वत:च पंतप्रधानपदासाठी उत्सुक असल्याने त्यांनी मात्र पवारांचे प्यादे पुढे करण्यापेक्षा त्या विषयावर बोलायचे टाळले. तिसरे- चौथे एकत्र आले की काय घडेल ते पाहा, असे सांगणारे लालू प्रत्यक्षात स्वत: बिहारमध्ये दोन जागांवर उभे राहून एका ठिकाणीच निवडून येऊ शकले. त्यांच्या या तथाकथित चौथ्या आघाडीचे तीनतेरा तर वाजलेच, पण बिहारमधून लढवलेल्या चाळीस जागांपैकी त्यांचे जेमतेम चौघेच निवडून आले, त्यात एक लालू. पासवानांना स्वत:चा परंपरागत हाजीपूर मतदारसंघही टिकवता आलेला नाही. तरीही पासवानांना मंत्रिमंडळात प्रवेश हवा होता. काँग्रेसने ३७ जागा लढवल्या, तीन जागा लालू-पासवान आघाडीला सोडल्या, पण ते निवडून दोनच जागांवर आले. असे असले तरी लालूंनी आपले वेगळेपण तूर्त तरी दाखवले आहे. नाही मिळाला मंत्रिमंडळात प्रवेश, आकाश तर काही कोसळत नाही ना? लालूंचा हा सगळा प्रवास हा असा जगावेगळा आहे. आधी चित्रविचित्र बोलण्याने त्यांनी स्वत:कडे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्रिपदी राहिल्यावरही गोठय़ात जाऊन म्हशीची धार काढण्यात कमीपणा न मानणाऱ्या या यादवकुलोत्पन्नाने चारा घोटाळय़ातूनही सहीसलामत सुटका करवून घेतली. केंद्रात २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर यावे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जावे, यासाठी सर्वाधिक प्रयत्न करणाऱ्यांमध्ये लालूच होते. आताही ते या निवडणुकांमध्ये काँग्रेसशी फटकून वागले तरी त्यांनी डॉ. मनमोहनसिंग वा सोनिया गांधी यांच्याविषयी वाईट मत व्यक्त केले नाही. लालूंनी पाच वर्षांच्या रेल्वेमंत्रिपदाच्या काळात बिहारच्या प्लॅटफॉर्मवर देशभरातून सर्वाधिक गाडय़ा नेऊन ठेवल्या, हा अनेकांनी टीकेचा विषय केला, पण याच लालूंनी रेल्वेला वक्तशीरपणा दिला, जमेल तेवढी स्वच्छता दिली, तिला कार्यक्षम बनवले. रेल्वे एवढी गुणवान झाल्याचे पाहून व्यवस्थापन विषय शिकवणाऱ्या जगातल्या मोठमोठय़ा विद्यापीठांनाही आश्चर्य वाटले. लालूंना जगभरातून निमंत्रणे आली. त्यांनी तरुणांच्या वर्गावर तास घेतले आणि आपल्या कौशल्याचे इंगित त्यांना सांगितले. लालू हा खरे तर राजकारणातला चमत्कार ठरला. रेल्वेची भाडेवाढ न करताही तिला फायद्यात आणता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी आधुनिकतेलाही आत्मसात केले. त्यांनी स्वत:चा ‘ब्लॉग’ इंटरनेटवर सुरू केला. अमिताभ बच्चन ही त्यांची याबाबतीतली प्रेरणा असावी. त्यांच्यावर मग प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. ते त्यात म्हणतात, ‘मला आलेल्या बहुसंख्य पत्रांमध्ये रेल्वेविषयीचेच प्रश्न आहेत, त्याची योग्य ती उत्तरे शोधली जातीलच, पण जरा दुसरे काहीतरी विचारले तरी चालेल.’ मग त्यांच्या प्रतिमेविषयी विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपले दोन चेहरे असल्याचे मान्य केले आहे. ‘मेकअप’ उतरवल्यावर माणूस नाही का वेगळा दिसतो, तसे आपले आहे, असे ते स्वत:च सांगून टाकतात. ‘आपली प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करण्यात आली असली तरी त्याबद्दल आपली तक्रार नाही’, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी एका ‘ब्लॉग’मध्ये म्हटले आहे, की तुम्ही जोपर्यंत ताजमहाल पाहात नाही, तोपर्यंत ती एक इमारत असते. ताजमहाल प्रत्यक्ष पाहिल्यावर तुम्हाला जगातले एक मोठे आश्चर्य म्हणून त्याची भव्यता उमजते. तुमच्या त्याविषयीच्या साऱ्या कल्पना गळून पडतात. थोडक्यात काय, तर लालूंना आपला स्वत:चाही एक ताजमहाल मनामनांमध्ये उभा करायचा आहे. शाहरूख खानला त्यांनी सांगितले आहे, की ‘तुझ्या चित्रपटात तुला एखाद्याची राजकारणाच्या भूमिकेकरता गरज भासेल तेव्हा तू मला आधी विचार, मी त्यासाठी तयार होईन.’ असे हे हरहुन्नरी लालू, मंत्रिमंडळात नसले, तरी त्यांच्याविषयी म्हटले गेल्याप्रमाणे ‘जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक रहेगा बिहार में लालू’ ही वस्तुस्थिती काही प्रमाणात तरी आहेच. परंतु ती वस्तुस्थिती रेल्वे गाडय़ा जाळून लोकांच्या निदर्शनास आणण्याची आवश्यकता नव्हती. संबंधित स्थानकावर गाडय़ा न थांबविण्याचा आदेश निघाला तेव्हा लगेच हा विषय लालूंनी ममतादीदींकडे, अगदी मोबाइल फोनवरून काढला असता, तरी ताबडतोब तोडगा निघू शकला असता. जाळपोळीला लालूंची फूस नसेलही, पण भाजून निघाली ती त्यांचीच प्रतिमा!