Leading International Marathi News Daily

बुधवार, ३ जून २००९

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेसह पाश्चात्त्य जगतात आलेल्या नैराश्याच्या तीव्र झटक्याने तिथल्या लोकांमध्ये जीवनाबद्दलची निर्थकता, कमालीची विषण्णता, ‘उद्याचा भरवसा काय? तेव्हा आजच काय ते उपभोगून घ्या!’ अशा वृत्तीतून आलेली वखवख, अस्थैर्य व अनिश्चिततेतून निपजलेली भयंकर अस्वस्थता, बेचैनी, कंटाळवाणेपण असं सगळं वातावरण होतं. याचं दाहक चित्रण त्यावेळच्या पाश्चात्त्य नाटक, चित्रपट, संगीतादी कलांमध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं. या निर्थकतेचाच वेध सॅम्युअल बेकेटनं त्याच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ नाटकात घेतला आहे. मात्र, त्याच्या अ‍ॅब्सर्ड शैलीमुळे व त्यातल्या आशयामुळे नेहमी आशावादी असलेल्या भारतीय मानसिकतेला हे नाटक अपील होणं तसं अवघडच होतं. ‘गोदो’चे अनेक प्रयोग भारतीय रंगभूमीवर झालेतही, परंतु ते भारतीय प्रेक्षकांच्या फारसे पचनी पडले नाहीत. याचं कारण- हे नाटक ज्या परिस्थितीत जन्माला आलं, त्याचा अनुभव भारतीयांनी कधीच घेतलेला नाही. किंवा असंही असेल की, आपल्या आध्यात्मिक जडणघडणीत अशा प्रकारच्या निर्थकतेला स्थान नाही. आपण विरक्ती, स्थितप्रज्ञता मानतो, ती मनाची एक प्रगल्भ, परिपक्व अवस्था म्हणून! तिचा जीवनाच्या कंटाळ्याशी संबंध नाही. म्हणूनच आज पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर- तेही व्यावसायिक- ‘गोदो’ येतंय, म्हटल्यावर साहजिकच भुवया उंचावल्या. भूतकाळात जमा झालेलं ‘गोदो’चं भूत आता पुन्हा का उकरून काढलं जातंय, असा प्रश्न पडला. यामागचं वास्तव जाणून घेण्यासाठी या नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर यांनाच मग गाठलं. त्यांनी या साऱ्यामागची पाश्र्वभूमी विस्तारानं विशद केली..
‘‘वेटिंग फॉर गोदो’ आज करण्याला अनेक कारणं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे की, दुसऱ्या महायुद्धसदृश्य परिस्थिती आज पुन्हा जगभर निर्माण झालेली आहे. जागतिक मंदी, त्यातून निर्माण झालेली प्रचंड बेकारी, रिकामपण, त्यातून आलेलं नैराश्य, जगभरातील वाढता दहशतवाद आणि या सगळ्याच्या परिणामी लोकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची, अस्थैर्याची भावना- ही त्यावेळच्या परिस्थितीसारखीच आहे. ‘कशाचंच काही खरं नाही’ हा सार्वत्रिक भयगंड साऱ्यांनाच सतावतो आहे. मीही एक व्यावसायिक आहे. त्यामुळे मीही ही परिस्थिती जवळून अनुभवतो आहे. आणि म्हणूनच यासदृश्य परिस्थितीत जन्माला आलेलं ‘गोदो’ हे नाटक मला आज पुन्हा एकदा संदर्भित (रेलेव्हन्ट) वाटतं आहे.
‘आणखी एक कारण म्हणजे- आज जगात कुठे कुठे हे नाटक खेळलं जातंय, याचा मी शोध घेतला असता असं आढळून आलं की, लंडन, अमेरिका, अरब कंट्रीज्, नेपाळ असे सर्वत्र आज ‘गोदो’चे व्यावसायिक प्रयोग होत आहेत. त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. मला ‘नाटय़संपदे’च्या माध्यमातून काहीएक अर्थपूर्ण नाटकं आता करायची आहेत. तीही व्यावसायिक रंगभूमीवरच! गेली कित्येक वर्षे मी पाहतो आहे की, आपल्याकडे अनेक गुणी व्यक्ती आणि संस्था आहेत, परंतु त्यांना आर्थिक वा अन्य कारणांमुळे त्यांना कराव्याशा वाटणाऱ्या उत्तम कलाकृती वा प्रयोग करता येत नाहीत. त्यामुळे आम्ही ठरवलं की, आमची ‘नाटय़संपदा’ संस्था आणि अशा व्यक्ती- संस्था यांनी एकत्र येऊन सहयोगानं काम करायला हवं. याचाच एक भाग म्हणजे ‘गोदो’ हे नाटक! दिग्दर्शक अरुण होर्णेकर हा माझा जुना मित्र. तो व मी अमृत नाटय़भारतीत एकत्र होतो. तेव्हा (कमलाकर) सोनटक्के सरांनी ‘गोदो’ बसवलं होतं. त्यात अरुण काम करायचा. मी जेव्हा असं काहीतरी वेगळं करायचं ठरवलं तेव्हा मला अरुणचीच प्रथम आठवण झाली. त्यानं मला त्याचं वेगळ्या धाटणीचं एक नाटक वाचूनही दाखवलं. पण मी त्याला आधी आपण ‘गोदो’ करूयात, असं सुचवलं. याला तो कबूल झाला. मग आम्ही अशोक शहाणेंना जाऊन भेटलो. त्यांनी ‘गोदो’चं मराठी रूपांतर केलं होतं. पहिल्यांदा माझ्या डोक्यात होतं की, पाच भाषांतले वेगवेगळे कलाकार घेऊन त्यांनी विविध भाषांतलं मिळून एकत्रित ‘गोदो’ करावं. परंतु अशोक शहाणेंनी मला त्यातली घोडचूक लक्षात आणून दिली. त्यांचं म्हणणं, मुळात एकच भाषा बोलत असूनही यातल्या पात्रांना एकमेकांची ‘भाषा’ कळत नाहीए, तिथं वेगवेगळ्या भाषांतला हा ‘गोदो’ करण्यानं नाटकाचा मूळ हेतूच निकालात निघेल. मलाही ते पटलं. मग संपूर्णपणे मराठीच नाटक करायचं ठरलं. मात्र, त्यासाठी आकर्षण म्हणून कुणीतरी अन्यभाषिक कलाकार घ्यायचं असं ठरवलं. टॉम ऑल्टर हा अरुणचा मित्र. त्यानं याआधी इंग्रजीत ‘गोदो’ केलेलं होतं. त्याला विचारलं. तो लगेचच तयार झाला. त्याच्याशिवाय दिलीप खांडेकर, शेखर नवरे, अद्वैत शुक्ल, अरुण होर्णेकर यांनीही कधी ना कधी ‘गोदो’ केलेला होता. टीम निश्चित झाली. अरुण होर्णेकर हा जबरदस्त टॅलेन्ट असलेला रंगकर्मी आहे. त्यानं नाटकाचं दिग्दर्शन करायचं मान्य केलं.
‘‘गोदो’ व्यावसायिक रंगभूमीवर करायचं, पण त्याचा निर्मितीखर्च मात्र आटोक्यात ठेवायचा, हे मनाशी पक्कं केलेलं होतं. याचा अर्थ दरिद्री नाटय़निर्मिती करायची, असा नव्हे, तर शक्य त्या ठिकाणी ‘नाटय़संपदा’तील उपलब्ध साधनसामुग्रीचाच वापर करून खर्च आटोक्यात ठेवायचा; मात्र आवश्यक त्या खर्चाला बिलकूल मागेपुढे बघायचं नाही. नाटकाची जाहिरात व मार्केटिंग व्यवस्थित करायचं. त्यात कसलीही कसूर सोडायची नाही. टॉम ऑल्टरच्या नावामुळे नाटक येण्याआधीच त्याच्याबद्दलची एक हवा निर्माण झाली. ज्याचा उपयोग आम्हाला प्रारंभीच्या प्रतिसादासाठी झाला. सुदैवानं ‘गोदो’च्या पहिल्या तीन प्रयोगांना प्रेक्षकांचा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटर या एकाच थिएटरमध्ये तीन टप्प्यांत ‘गोदो’चे लागोपाठ प्रयोग लावायचे, असं मी ठरवलं. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात ५, ६ व ७ जूनला इथेच पुढले प्रयोग व्हायचे आहेत. त्यानंतर लगेचच १२, १३ व १४ जूनला प्रयोग लावले आहेत. हाही आमचा एक ‘प्रयोग’च आहे. ज्याला सुरुवातीला तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यातही तरुणांची या प्रयोगाला झालेली गर्दी मला जास्त महत्त्वाची वाटते. त्यांना ‘गोदो’मध्ये रुची आहे, ही मला सकारात्मक बाब वाटते. आजचा प्रेक्षक बहुश्रुत आहे. आणि आज तो स्वत: ज्या परिस्थितीचा सामना करतो आहे, त्यामुळे हे नाटक त्याला आपलं वाटेल, अशी आशा आहे. तरीही छोटय़ा नाटय़गृहांतून मर्यादित प्रेक्षकांसाठी याचे प्रयोग लावण्याचा सध्या तरी आमचा मानस आहे. भोपाळच्या भारत भवनमध्ये तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा फेस्टिव्हलमध्ये वगैरे ‘गोदो’चे प्रयोग होणार आहेत. देशभरातील वेगवेगळ्या फेस्टिव्हल्समधील प्रयोगांतून ‘गोदो’चा निर्मितीखर्च काही अंशी भरून निघेल अशी अपेक्षा आहे. यातून प्रॉफिटची अपेक्षा आम्ही केलेली नाही. पण कर्जाचा बोजाही करून घ्यायचा नाहीए. त्यादृष्टीनं प्रयोगांची आखणी सुरू आहे. सगळ्या कलावंतांचं यासाठी उत्तम सहकार्य मिळतं आहे. आम्हाला आशा आहे की, आमचा हा ‘प्रयोग’ लोक उचलून धरतील आणि आशयघन नाटकं देण्याचा आमचा संकल्पही तडीस जाईल.’
रवींद्र पाथरे